RSS

पहिल्या महायुद्धादरम्यान मोठ्या उठावाची तयारी

लेखमाला – विश्वगुरु भारत – संघाचे अंतिम ध्येय – 5

कलकत्त्याच्या नॅशनल मेडीकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. हेडगेवार नागपुरात परतले. क्रांतिकारक संघटना अनुशीलन समितीमधील त्यांचा सहभाग मात्र कायम होता. नागपुरात आले आणि त्यांच्याकडे नोकऱ्या व विवाहोत्सुक स्थळांचा ओघ सुरू झाला. त्यांना डॉक्टर म्हणून स्वतंत्र व्यवसायही करणे शक्य होते. पण आपण आजन्म अविवाहित राहून जीवन राष्ट्रासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉक्टरांनी आपल्या कुटुंबियांना व परिचितांना सांगितले. त्यामुळे नंतर स्थळे येणे बंद झाले व आपले खडतर जीवन मातृभूमीकरिता वेचण्यासाठी त्यांना मोकळीक मिळाली.

डॉक्टरांचा कृतिपूर्ण आराखडा

कलकत्त्यात असताना अनुशीलन समितीच्या नेत्यांशी १८५७च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धापेक्षाही मोठ्या अशा युद्धाच्या योजनेवर डॉक्टरांची प्रदीर्घ चर्चा झाली होती. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात राजकीय ध्येयाच्या अपयशाची कारणे आणि अशा चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे मार्ग यावर विस्तृत संवाद होत असे. नागपुरात परतल्यानंतर त्यांनी शस्त्रखरेदी आणि मनुष्यबळाची जमवाजमव सुरू केली. डॉ. हेडगेवारांच्या क्रांतिकारक मित्रमंडळींमध्ये तरुणांना मोठ्या संख्येने सैन्यात दाखल होण्यासाठी आवाहन करण्याची चर्चा झाली. त्यांचे प्रशिक्षण झाले की सशस्त्र लढ्यास सुरुवात करता येईल.

पहिल्या जागतिक महायुद्धाचे ढग जमू लागले. जगभरात विस्तारलेले आपले साम्राज्य टिकवण्याचे आव्हान ब्रिटिश राज्यकर्त्यांपुढे उभे राहिले. भारतातही त्यांची अवस्था दयनीय झाली होती. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात क्रांतिकारी उठावांना झालेली सुरुवात, जहालमतवादी राष्ट्रीय नेत्यांनी सुरु केलेली स्वदेशी चळवळ आणि नागरिकांच्या मनात परकीय राज्यकर्त्यांच्या उफाळून आलेला राग यामुळे ब्रिटिशांच्या मनात भीती, असुरक्षिततेची भावना तयार झाली होती. या परिस्थितीत आपल्याला काही भारतीयांचाच पाठिंबा मिळवावा लागेल याची जाणीव त्यांना झाली. जहालमतवाद्यांकडून कोणतीही मदत मिळणार नाही हे व्यावसायिक दृष्टिकोनाच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना चांगलेच माहिती होते. त्यांना आशा होती ती त्यांनीच(ऍलन ओक्टाव्हिअन ह्यूम) सुरू केलेल्या काँग्रेस पक्षाची. राज्य चालविण्याचे अधिकार भारताकडे देण्याचा प्रस्ताव ब्रिटीश राज्यकर्त्यांनी मांडला. त्यांची कल्पना यशस्वी झाली आणि काँग्रेसचे दोन्ही समूह त्यांच्या जाळ्यात अडकले.

ब्रिटिशांच्याच सैन्यात काम करता करता त्यांच्याच विरोधात सशस्त्र क्रांतीचा लढा देशभर सुरू झाला पाहिजे असे डॉ. हेडगेवार यांचे मत होते. काँग्रेसच्या दोन्ही गटांबरोबर डॉक्टरांनी अनेक दिवस या प्रस्तावावर चर्चा केली होती. पण दोन्ही गट  ब्रिटिशांकडून काहीतरी ठोस फायदा मिळेल याच भ्रमात राहिले. अर्थातच ब्रिटिशांना देशाबाहेर हाकलण्याची एक ऐतिहासिक संधी आपण गमाविली. ब्रिटिशांनी नियमात कोणतीही सूट देण्याऐवजी उलट महायुद्धानंतर नियम अधिक कडक केले तेव्हा काँग्रेसमधील नेत्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला.

संघटित सशस्र क्रांतीचा निर्णय

काँग्रेसच्या जहाल आणि मवाळ अशा दोन्ही गटांकडून मिळालेल्या प्रतिसादाचे डॉ. हेडगेवार यांना वैषम्य वाटले. पण ते निराश झाले नाहीत. राष्ट्रव्यापी सशस्त्र क्रांतीचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या दृष्टीने तयारीही सुरू केली. जाज्ज्वल्य क्रांतिकारक, बालमित्र भाऊ कांवरे यांनी त्यांच्या या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला.  परदेशात उठावाची मशाल हाती घेणारे रासबिहारी बोस हे प्रस्तावित  योजना यशस्वी व्हावी यासाठी त्यात सहभागी झाले. डॉ. हेडगेवार यांनी मध्यप्रदेशचा दौरा केला आणि सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी लागून असलेल्या राज्यांतील सर्व स्रोतांना एकत्र करण्यात सुरूवात केली. 

मध्य प्रांत, बंगाल आणि पंजाबातील क्रांतिकारकांशी डॉक्टरांचे चांगले संबंध होते. सशस्त्र लढ्यात सहभागी होण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी पावले उचलण्यास सुरूवात केली. अनेक ठिकाणी क्रांतिबाबत जनजागृती करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. व्यायामशाळा आणि वाचनालयांमध्ये युवकांना सशस्त्र क्रांतिकरिता प्रशिक्षत करण्यात येत होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोंधळात टाकण्यासाठी ही पावले उचलण्यात आली होती. तरुणांची त्यांच्या गुणधर्म, धाडस आणि क्षमतेचा वापर या निकषांवर निवड केली जात असे. १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी गोष्टी, शिवाजी महाराजांचे चरित्र आणि अनुशीलन समितीमधील धाडसी घटना सांगून युवा क्रांतिकारकांना प्रेरणा दिली जात असे.

डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रवाद आणि देशप्रेम यांची पेरणी करून थोड्याच दिवसांमध्ये २०० क्रांतिकारकांचा चमू तयार केला. अन्य राज्यांमधील क्रांतिकारी गटांचे संघटन करण्याचे काम हे तरुण करीत होते. २५ तरुण क्रांतिकारकांचा एक गट डॉ. हेडगेवार यांनी गंगा प्रसाद यांच्याकडे पाठविला. गंगाप्रसाद हे डॉक्टरांचे वर्ध्यातील परिचित पण मूळचे उत्तर भारतीय होते. नागपुरात डॉक्टरांनी आवश्यक निधी गोळा केला. ते काही बुद्धिमान आणि ग्रंथप्रेमींना ओळखत होते.  त्यांच्या कपाटांचा आणि खोक्यांचा वापर बंदुका आणि दारूगोळा ठेवण्यासाठी केला.

ब्रिटिश साम्राज्यवादाकडे पाहण्याचा डॉक्टरांचा दृष्टीकोन आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांना गुडघे टेकायला लावण्याचा त्यांचा दृढ निश्चय यावरूनच त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची आपल्याला कल्पना येते. ब्रिटिश राज्यकर्त्यांशी प्रामाणिक राहणारे आणि तडजोड करणारे नेते यांना त्यांनी कायमच विरोध केला. डॉ. हेडगेवार यांचा प्रयत्न हे १८५७नंतर ब्रिटिशांविरोधात छेडलेल्या द्वितीय स्वातंत्र्ययुद्धापेक्षा कमी नव्हते. बाहदुरशाह जफरचे दुबळे नेतृत्व, ब्रिटिशांची दडपशाही आणि फोडा व राज्य करा हे धोरण यामुळे १८५७च्या स्वातंत्र्ययुद्ध राजकीयदृष्ट्या काही यश मिळवू शकले नाही. तर, प्रमुख काँग्रेसी नेत्यांकडून पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे १९१७-१८चा स्वातंत्र्यलढा सुरूच होऊ शकला नाही. काँग्रेसच्या या वागण्यामुळे कोसळण्याच्या वाटेवर असलेल्या साम्राज्याला जीवदान मिळाले आणि त्यांना घालवून द्यायला ३० वर्षे जावी लागली.

दुर्दम्य विश्वासाला तोटा नाही

डॉ. हेडगेवार यांनी कल्पनेतला उठाव हा १८५७च्या स्वातंत्र्यसमरापेक्षा अधिक मोठा व प्रभावी होता. तो लौकिकार्थाने प्रत्यक्षात साकारला नसला तरी त्यांच्या या जीवनध्येयाप्रती असणारा दृढविश्वास मात्र जराही कमी झाला नव्हता. ब्रिटिशांविरोधात शस्त्रास्त्रे व मनुष्यबळ गोळा करता यावे म्हणून त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, धाडस आणि डावपेच हे उठावाची तयारी नाहिशी करण्यासाठीही वापरण्यात आले. जेणेकरून त्यांच्या कोणाही सहकाऱ्याला ब्रिटिशांपासून धोका पोहोचू नये.

डॉ. हेडगेवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या क्रांतिकारकांनी उठावासाठी केलेली सगळी तयारी ब्रिटिशांच्या हाती पुरावे लागण्यापूर्वी चतुरपणे नष्ट केली. कोणीही पकडले जाऊन अडचणीत सापडू नये यासाठी या तयारीत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. पण ब्रिटिशांच्याविरोधात सुरू असलेली ही गुप्त उलथापालथ इतिहासात मात्र कोणतेही स्थान मिळवू शकली नाही हीच दुर्दैवाची बाब आहे.


(लेखक ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button