भारताच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे उद्गाता फकिरचंद कोहली यांचे निधन

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर – भारताच्या स़ॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे उद्गाता मानले जाणारे फचिंरचंद कोहली यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. आयटी क्षेत्रातले एक ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपल्याची टिका सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
स्वातंत्र्यपूर्व भारतातील पेशावर येथे १९ मार्च १९२४ रोजी जन्मलेल्या फकिरचंद कोहली यांचे महाविद्यालयीन शिक्षण लाहोर येथील पंजाब विद्यापीठात पूर्ण झाले. बीए आणि बीएस्सी या दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले होते. १९४८ साली त्यांनी कॅनडा येथील क्वीन्स विद्यापीठातून बीएस्सी ऑनर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅनडियन जनरल इलेक्ट्रिकल कंपनी येथे काम केले. दरम्यान मॅसेच्युसेट्स विद्यापीठातून एमएसची पदवीही प्राप्त केली. १९५१ साली भारतात परतल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतल्यावर त्यांनी सुप्रसिद्ध टाटा उद्योग समुहात प्रवेश केला. १९६९ साली टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस अर्थात टीसीएसचा पाया घातला जात असताना त्यांची जनरल मॅनेजरपदी नेमणूक करण्यात आली. १९९९साली भारतात आयटी इंडस्ट्रीने आपली मुळे रुजवायला सुरुवात केली. त्या काळात निवृत्तीनंतरही कोहली यांनी सल्लागार म्हणून टीसीएससाठी काम सुरू ठेवले व आयटी क्षेत्राच्या प्रगतीत लक्षणीय योगदान दिले. त्यांच्या या कार्याबद्दल भारत सरकारच्या वतीने त्यांना २००२ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.