NewsSeva

सेवा सहयोग फाऊंडेशनचा ‘समुत्कर्ष वार्षिकोत्सव’ संपन्न

मुंबई, दि. २१ फेब्रुवारी : सेवा सहयोग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या समुत्कर्ष प्रकल्पाअंतर्गत वस्त्यांमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवल्या जातात.  २०१५ सालापासून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात एकूण १६० अभ्यासिक वर्ग चालविण्यात येत असून या अभ्यासिकांचा लाभ सुमारे ८ हजारांहून अधिक विद्यार्थी घेत आहेत.

या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सशक्त व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आंतर विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी रविवार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी, यशवंत भवन,लोअर परेल येथे “समुत्कर्ष वार्षिकोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध नाट्यकर्मी गौरी केंद्रे  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.  यावेळी वर्षभर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामीण तारपा नृत्य, भरतनाट्यम, पोवाडा,  स्वरचित कवितावाचन, कथाकथन आणि  अनुभवकथनही केले. उत्कृष्ट विभागांना फिरता चषक देऊन गौरविण्यात आले.

समुत्कर्ष वार्षिकोत्सवास २०२१ पासून प्रारंभ करण्यात आला. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या आंतर विभागीय स्तरावरील  कथाकथन, कविता वाचन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन, प्रार्थना गायन, आर्ट क्राफ्ट या स्पर्धांमध्ये ११ विभागांतील एकूण १९३ विद्यार्थी सहभागी झाले होते.  

समुत्कर्ष वार्षिकोत्सवामुळे अभ्यासिकेतील विद्यार्थांमध्ये आत्मविश्‍वास, नेतृत्वगुण व संवाद कौशल्य वाढीस लागले आहेत.  यामुळे त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाला गती मिळत आहे. विद्यार्थ्यांचा प्रगतीचा चढता आलेख पाहून अभ्यासिकेला पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. सेवा सहयोग च्या “अभ्यासिका” केवळ अभ्यासापुरत्या सीमित न राहता, एक सशक्त पिढी घडविण्याचे सामर्थ्यशील व्यासपीठ आहे असा विश्वास या कार्यक्रमातून प्रकर्षाने अनुभवास येत आहे.

सेवा सहयोग फाऊंडेशन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे. सन २००९ पासून महाराष्ट्रातील विविध गरजू शाळांमध्ये शैक्षणिक आणि भौतिक स्वरूपातील मदत सेवा सहयोग च्या माध्यमातून करण्यात आलीआहे.त्याचबरोबर शिक्षण, महिला सबलीकरण, पर्यावरण, ग्राम विकास, कौशल्य विकास, किशोरी विकासअशा विविध विषयांवर संस्थेतर्फे प्रकल्प राबवले जातात.  शहरी वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरात स्वयंअध्ययनासहित कला, क्रीडा, इतिहास, विज्ञान, गणित आणि इंग्रजी आदी विषयांवर अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात.

Back to top button