News

संजीवनी रायकर कालवश

मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : वात्सल्य ट्रस्ट या अनाथलयाच्या संस्थापक-सदस्य व राज्य शिक्षक परिषदेच्या कार्याध्यक्षा आणि माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षांच्या होत्या.

१९८८ मध्ये राज्य महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेतृत्व त्यांनी केले होते. 15 वर्षे त्यांनी विधान परिषदेत काम केले. शिक्षक परिषदेच्या विस्तारात त्यांचा मोठा वाटा होता. या माध्यमातून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर शिक्षकांच्या प्रश्नांवर केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय होते. शिक्षकांच्या प्रश्नांसोबत इतर सामाजिक कामात त्या अग्रेसर असत. त्यांनी शिक्षकांसाठी मुंबईत चार ठिकाणी शिक्षक वसाहती म्हाडाकडून करुन घेऊन शिक्षकांच्या घरांचा प्रश्न सोडवला. दत्तक मुलाच्या आईलाही प्रसूती रजेच्या धर्तीवर संगोपन रजा मिळावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर अशी रजा मंजूरही झाली.  

‘वात्सल्य’ अनाथालयाच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. या संस्थेतून शेकडो अनाथांना हक्काचे घर मिळाले. त्यांच्या निधनाने मूल्यांशी कधीही तडजोड न करणारे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

Back to top button