NewsPolitics

भाजपा नेते किरिट सोमैया यांचा गौप्यस्फोट, रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून घेतली जमीन

मुंबई, दि. ११ नोव्हेंबरअर्णब गोस्वामी (ARNAB GOSWAMI) यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात संयुक्तरित्या जमिनीचे व्यवहार केले असल्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा(BJP) नेते डॉ. किरिट सोमैया यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत  डॉ.सोमैय्या यांनी ही माहिती दिली. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे या प्रसंगी उपस्थित होते.

या संदर्भात डॉ. सोमैया (SOMAYYA)यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राची प्रत रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकानांही पाठवण्यात आली आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी एकत्रित जमीन खरेदी केल्याची कागदपत्रे डॉ.सोमैय्या यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM UDHHAV THAKRE) यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आणि अन्वय नाईक यांचे आर्थिक व अन्य कोणत्या प्रकारचे संबंध होते याचा खुलासा होण्याची गरज आहे. रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील नऊ जमीन व्यवहारांचे सात बारा उतारे आम्ही सादर केले आहेत. त्याच बरोबर ठाकरे परिवाराचे आणखी कोणा कोणाबरोबर अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार आहेत हेही जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्यात असलेल्या आर्थिक व्यवहारांची माहितीही जाहीर होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात खुलासा करावा, अशी आमची मागणी आहे, असेही डॉ. सोमैय्या यांनी नमूद केले.

रेवदंड्याच्या पलीकडे असलेल्या किल्ल्यापासून काही अंतरावर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन(LAND) खरेदी केली. २१ मार्च २०१४ रोजी यासाठी व्यवहार झाला. २ कोटी २० लाख रुपयांचा हा व्यवहार होता. ठाकरे आणि वायकर यांनी नाईक कुटुंबाकडे सदर जमीन खरेदी केली. नाईक कुटुंबासोबत असे आणखी किती व्यवहार झाले? अशा किती जमिनी घेण्यात आल्या?, असे सवाल सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत.

Back to top button