NewsOpinion

शाही इमामांचे नासके वैचारिक शाही पनीर

ईमामाचे विषारी फुत्कार

शाही ईमामांचे कुविचार म्हणजे मुस्लिम धर्मांधतेचा कळस

अहमदाबादमधील(ahmedabad) जामा मशिदीचे शाही इमाम (shahi imam)शब्बीर अहमद सिद्दीकी (Shabbir Ahmed Siddiqui) यांनी मतदानापूर्वी आपल्या बेताल वक्तव्याने वाद निर्माण केला आहे. शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी निवडणुकीत मुसलमान महिलांना तिकीट देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यांनी मुस्लिम महिलांनी निवडणूक लढवणे ही इस्लामविरोधात असल्याचे सांगितले आहे. या इमामाने मुस्लिम महिलांच्या राजकारणातील सहभागाचा निषेध केला आहे. मुस्लिम महिलांना निवडणुकीचे तिकीट देणे इस्लामच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. त्यांना मते मागण्यासाठी हिजाब परिधान न करता दारोदार भटकावे लागेल, यातून या महिला आपला इस्लाम धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी मुक्ताफळे त्यांनी यावेळी उधळली. शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी तिकीट देण्यासाठी पुरुष शिल्लक नाही का? असा अतार्किक सवालही केला.मुस्लिम महिलांना आम्ही मशिदीत देखील येऊ देत नाही,निवडणूका तर लांबच राहिल्या अशी ही फुशारकी इमामाने मारली.

काय म्हणावे या विकृत मानसिकतेला ? सिद्धीकी सारख्या धर्मांध शाही इमामांनी इस्लामला(islam) पार खुंटीवर अडकवून ठेवले आहे. हे निर्बुद्ध शाही इमाम मुसलमान स्त्रियांना आपले गुलाम समजतात आणि आपल्याच समाजातील महिलांवर अन्याय करतात. मुस्लिम स्रियांना खुलेपणाने जगण्याचा अधिकार देखील या शाही इमामांना मान्य नाही.

आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या आधारावर प्रत्येक भारतीयाला धर्म, जात, पंथ, लिंग निरपेक्ष काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यात जसा मतदानाचा अमूल्य अधिकार आहे तसाच निवडणूक लढवण्याचा देखील अधिकार बहाल केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी काही राखीव जागा देखील आपल्या निवडणूक आयोगाने ठेवल्या आहेत.

या इमाम साहेबांचा हाच नियम लावला गेला असता तर नजमा हेपतुल्ला राज्यपाल किंवा राज्यसभेच्या उपसभापती सोडा, खासदार देखील होऊ शकल्या नसत्या.

गेल्या ७५ वर्षांच्या काळात देशात नगरासेविकेपासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत लक्षणीय संख्येत मुस्लिम महिलांनी लोकप्रतिनिधी म्हणून सन्मानाची पदे भूषविली आहेत. खासदार फौजीया खान, रुबिका लियाकत अशी किती उदाहरणे द्यावीत.

भारतीय लोकशाहीचे व संविधानाचे हे वैभव, शाही इमामांच्या हे पचनी पडत नाही की त्यांना बघवत नाही?

सदर शाही इमामांचा हा दावा आणि भीती किती खोटी आहे हे आपल्या शेजारील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या एकेकाळच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या उदाहरणावरून लक्षात यावे.एका अधिकृत मुस्लिम देशात एक मुसलमान महिला हिजाब न घालता निवडणुका लढवून, आपल्या पक्षाचा प्रचार करून व त्या निवडणुका जिंकून पंतप्रधान होऊ शकते. बेनझीर भुत्तो हिजाब न घालता पंतप्रधान झाल्यामुळे इस्लाम धोक्यात आला असे पाकिस्तानातल्या देखील कोणत्याही इमामाने म्हटले नाही. मात्र हे शाही इमाम भारतात मुस्लिम महिलांनी निवडणुका लढवू नये म्हणून आदळापट करत आहेत.

मुस्लिम बहुल बांगलादेशात शेख हसीना आणि खालिदा जिया या एक नाही दोन मुसलमान महिला पंतप्रधान होऊ शकतात. हिजाब न घालता निवडणुका लढवून, प्रचार करून व निवडणुका जिंकून त्या पंतप्रधान होतात. बांगलादेशातल्या इमामांनी याला कधीच हरकत घेतली नाही. आपल्या डोळ्यांवर खरा हिजाब तर या अहमदाबादच्या शाही इमाम महाशयांनी घातलेला दिसतोय.

त्यांच्या विकृत तर्कटाला हिंदी चित्रपट सृष्टी आणि क्रीडा क्षेत्र हे अपवाद आहे का? मधुबाला, मीनाकुमारीपासून आजच्या कतरीना कैफपर्यंत कितीतरी मुस्लिम अभिनेत्रींनी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवली आहे… हिजाब न घालता.कोट्यवधी प्रेक्षक या मुसलमान अभिनेत्रींचे चित्रपट बघतात. काही वेळा तोकड्या कपड्यातले देखील. हे शाही इमाम सदगृहस्थ हिंदी चित्रपट सृष्टीतल्या या मुसलमान अभिनेत्रींना त्यांच्या विकृत निष्कर्षातून सूट देतात काय? की त्या अभिनेत्रींविरुद्ध बोलण्याची त्यांची हिंमत नाही?

न पेक्षा, हिजाब घालण्याचा सल्ला या शाही इमामांनी एकदा शबाना आजमीला देऊन बघावा. जावेद अख्तर यांची लक्तरं वेशीवर टांगेल.

या शाही इमामांनी कधी सानिया मिर्झाला हिज़ाब घालून टेनिसच्या कोर्टवर खेळताना बघितले आहे का ? पुढ्यात असलेले हजारो आणि दूरदर्शनवर तिचा खेळ बघणारे लाखो प्रेक्षक, यांच्यासमोर ती त्या खेळाला उपयुक्त आणि साजेसे असे तोकडे कपडे घालून टेनिस खेळत असते. कधी या शाही इमामाला त्या सानिया मिर्झाला, आता तू इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची सून झाली आहेस म्हणून तरी हिजाब घालून टेनिस खेळ,अन्यथा आपला इस्लाम कमकुवत होईल असा सल्ला देण्याचे धाडस झाले नाही का?

सानिया मिर्झा हे केवळ वानगी दाखल दिलेले उदाहरण आहे. इस्लामिक रिपब्लिक पाकिस्तानची महिला क्रिकेट टीम असो हॉकीचा संघ असो किंवा अन्य कोणत्याही खेळातील महिला खेळाडू असोत, त्या हिजाब घालून कधीच खेळत नाहीत. त्यामुळे शाही इमामांच्या कोणत्या मनःप्रवृत्तीची कीव करावीशी वाटते.

वरील सर्व उदाहरणे लक्षात घेतली तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते या धर्मांध शाही इमामांचा इस्लाम फक्त दीनदुबळ्या, गरीब, उपेक्षित “पसमांदा” मुसलमानांसाठी कडक इस्लामी कायदे सांगणार आहे. तैमूरच्या आईला म्हणजे करीनाला, आता तू मुसलमान झाली आहेस तेव्हा हिजाब घाल असे सांगणारा त्यांचा इस्लाम नसतो. उद्या करीना कपूरला हिजाब घाल म्हणून सल्ला द्यायला हे शाही इमाम गेले तर सैफ अली खान आणि तैमूर, दोघेही या शाही इमामाला त्याची औकात दाखवतील.

हिजाब न घालता मुस्लिम महिला पत्रकार रोज कोट्यावधी प्रेक्षकांच्या समोर येत असतात. या शाही इमामांमध्ये खरंच जर हे सांगण्याची हिंमत असेल तर त्यांनी रुबिका लियाकतच्या टीव्ही चॅनेलवरील एखाद्या चर्चेत जाऊन आपले हे दिव्य शाही ज्ञान पाजळावे. मग रूबिका आहे आणि शाही इमाम आहेत. कमी पडल्यास शाही इमामांनी बरखा दत्तला देखील हे ज्ञानामृत पाजावे… इस्लामचे इल्म् म्हणजे काय ते रुबिका आणि हिजाब त्यांना योग्य शब्दात समजवतील.

आणि जेव्हा मुसलमान महिला परदेशी जाण्यासाठी पासपोर्ट काढतात; त्या पासपोर्टवर हिजाब घातलेला फोटो चिकटवला जातो का? विदेशी भूमीवर जेव्हा या मुस्लिम महिला तिथल्या इमिग्रेशन ऑफिसरच्या समोर हिजाब न घालता उभ्या राहतात तेव्हा या शाही इमामांचा इस्लाम धोक्यात येत नाही का? मुसलमानांमधील या गर्भ श्रीमंत वर्गाला, मुसलमान महिलांच्या परदेशवारीने इस्लाम धोक्यात येतो असे सांगण्याची हिंमत या शाही इमामांमध्ये आहे का?

थोडक्यात म्हणजे, श्रीमंत अर्थात अश्रफी मुसलमानांसाठी वेगळा इस्लाम आहे आणि दिनदुबळ्या अर्थात पसमांदा मुसलमानांसाठीचा इस्लाम वेगळा आहे, हेच सदर शाही इमाम सुचवतात.

Back to top button