Opinion

सेवा सहयोगच्या मदतीने नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन

५ जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून दर वर्षी साजरा करण्यात येतो. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दर वर्षी एक विषय ठरविण्यात येतो. त्यानुसार त्यावर काम करण्याचा प्रयत्न विविध पर्यावरणवादी संस्थामार्फत केला जातो. गेल्या वर्षीचा विषय हा ‘टाईम फॉर नेचर’ म्हणजेच ‘निसर्गाकरिता वेळ देणे’ असा होता. तर यावर्षीचा विषय हा ‘नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन’ असा आहे. त्यानुसार सेवा सहयोग या सामाजिक संस्थेने पर्यावरणाचे महत्वपूर्ण घटक असलेल्या परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा.

विविध ठिकाणच्या प्रादेशिक हवामानानुसार विविध जीवसमूह विशिष्ट परिक्षेत्रात एकमेकांवर अवलंबून असतात. ही एक प्रकारची नैसर्गिक व्यवस्था असते. याला नैसर्गिक परिसंस्था असे म्हटले जाते. या परिसंस्थेमध्ये लहानातल्या लहान घटकाचे सुद्धा संपूर्ण संस्थेकरिता मोलाचे योगदान असते. लहानातल्या लहान घटकावर सुद्धा संपूर्ण परिसंस्थेचे आरोग्य अवलंबून असते. छोटे-छोटे कीटक, पक्षी, शेवाळे, गवत, झुडुपे, वेली इत्यादी घटक सुद्धा परिसंस्थेत फार महत्त्वाची कामगिरी बजावतात. मातीची धूप होऊ न देणे, जमिनीत पाणी मुरवणे इ. पासून ते अगदी हवेतील व पाण्यातील प्रदूषके शोषण्यापर्यंत अनेक कामगिरी हे घटक बजावत असतात. यातील एखादा घटक तरी कमी झाला तरीही त्याचा परिणाम संपूर्ण नैसर्गिक परिसंस्थेवर होतो परिणामी निसर्गावर होतो. मानवाचे जंगलावरचे अतिक्रमण जसजसे वाढू लागले तसतसे या परिसंस्था नष्ट होऊ लागला आणि त्याचा एकंदरीतच दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे.

या अनुषंगाने सेवा सहयोग फाऊंडेशन मार्फत पालघर जिल्ह्यातील वाडा, वसई, पालघर, डहाणू व पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमधून संस्थेशी जोडलेल्या शेतकऱ्यांसमवेत आणि विद्यार्थ्यांसमवेत परसबागेतील लागवड, शेती शाळा असे उपक्रम यावर्षी हाती घेण्यात आले आहेत. आरोग्य, पोषण आहार आणि उपजीविकेच्या दृष्टीने जितके हे उपक्रम महत्त्वाचे आहेत तितकेच कृषी अथवा गावाच्या नैसर्गिक परिसंस्थेला पुरुज्जीवित करण्याच्या दृष्टीनेही आहेत.

परसबाग तयार करताना ती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच केली जावी. म्हणून देशी वाणांच्या बियाणांमधून विविध प्रकारच्या पिकांची लागवड करण्यावर भर देण्यात येत आहे. सेंद्रिय पद्धतीमुळे एक चांगली नैसर्गिक परिसंस्था तयार होण्यास मदत होते. नैसर्गिक परिसंस्थेप्रमाणेच कृषी परिसंस्था नावाची आणखी एक संकल्पना आहे. शेतकरी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करतो. तेव्हा तो आपापल्या जमिनीसोबतच जमिनीचे बांध, मोकळी जागा अशा शक्य त्या ठिकाणी लागवड करत असतो. या शेतीमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कीटक, पशुपक्ष्यांचा वावर वाढतो. ही सुद्धा एक चांगली नैसर्गिक परिसंस्था असते. त्यामुळे आपल्या नकळतपणे या शेतीचा निसर्गालासुद्धा फायदा होत असतो. फक्त ही शेती करत असताना रासायनिक खतांचा वापर केला तर त्या परिसंस्थेला हानी पोहोचते. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करावी. जेणेकरून वेली, फळझाडे, फुलझाडांच्या लागवडीमुळे एक चांगली नैसर्गिक परिसंस्था तयार होऊ शकते. हे ध्यानात घेऊन यावर्षीपासून सेवा सहयोगने त्या दृष्टीने कार्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रत्येक महिलेने आपल्या घराशेजारी परसबाग लावावी. त्यातून आलेल्या भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करून घ्यायचा आहे. यामुळे त्यांच्या आहारात पोषणतत्वांचाही समावेश होईल. तसेच नैसर्गिक परिसंस्थांही तयार होईल, हा यामागचा दूरदृष्टीकोन आहे.

पालघर, वसई, वाडा तालुका आणि डहाणू तालुका मधील साधारपणे १५० हून अधिक शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. पुणे – मुळशी तालुक्यात वांद्रे गावातही परसबागेची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता देशी वाणांची बियाणे देखील मागवण्यात आली आहेत. अकोल्यातील पारंपरिक बियाणांची जोपासना करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील अनेक शेतकऱ्यांनी देशी वाणांच्या बियाणांचे संवर्धन केले आहे. त्यांच्याकडून देशी वाणांची बियाणे घेण्यात आली आहेत. २०० शेतकऱ्यांना पुरतील एवढ्या बियाणांचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांना या बियाणांचे वाटप करण्यात आले असून त्यांनी मांडव करणे, निगा राखण्यास सुरुवात देखील केली आहे. परसबागेसाठी जी बियाणे मागवण्यात आली आहेत त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या २२ भाज्या आणि कडधान्यांचा समावेश आहे. मुख्यत्वेकरून यात तांदूळ, उडीद, तूर, नाचणी, वरी यांचा समावेश आहे. तसेच जव्हार येथील बायफ संस्थेच्या मदतीने कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्थेमार्फतही पारंपारिक व देशी वाणाची बियाणे उपलब्ध होण्यास मदत झाली.

आज विविध प्रकारची बियाणे शेतकरी आणि विद्यार्थ्यांमार्फत खरीप हंगामातील लागवडीसाठी पोहोचले आहेत. या उपक्रमांमध्ये १५० हून अधिक शेतकऱ्यांसोबतच २०० हून अधिक विद्यार्थीही सहभागी होत आहेत. लवकरच या सर्वांच्या घराशेजारी सेंद्रिय पद्धतीने फुललेली परसबाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यावर एक चांगली नैसर्गिक परिसंस्था तयार होण्यास मदत होणार आहे. आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपली काळजी घेणारच. याचा प्रत्यय लवकरच या अशा उपक्रमांतून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Back to top button