NewsScience and Technology

शास्त्रज्ञ १९
भौतिकशास्त्रांचा निदिध्यास शिवराज रामशेषन

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…

नोबेल विजेते सर सी व्ही रमण यांचे भाचे म्हणून संशोधन क्षेत्रातील वाटचाल सुरु करणारे शिवराज रामशेषन यांनी आपल्या कामगिरीने तो लौकिक अबाधित राखला. भौतिक विज्ञानातील त्यांच्या कामगिरीचा भारताच्या अंतराळ संशोधनातील भरारीमध्ये मोठा वाटा आहे. हृदयाच्या कृत्रिम झडपांपासून कृत्रिम उपग्रहांचे विचलन कमी करणाऱ्या उपकरणांपर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या संशोधनामुळेच शक्य झाल्या.

शिवराज रामशेषन(sivaraj ramaseshan) यांचा जन्म १० ऑक्टोबर १९२३ रोजी कोलकाता येथे झाला. प्रख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांची धाकटी बहीण ही त्यांची आई. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नागपूर येथे झाले. १९४३ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या सायन्स कॉलेजमधून त्यांनी सुवर्णपदक आणि प्रथमवर्गासह बीएससी (ऑनर्स) ही पदवी मिळवली.

रामशेषन हे स्वतंत्र भारतातील एक दूरदर्शी अव्वल शास्त्रज्ञ होते. सीव्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संशोधन कारकिर्दीला सुरुवात झाली. भौतिकशास्त्रात पीएचडी झाल्यानंतर त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. तेथेच त्यांनी १९५० च्या सुमारास एक्सरे क्रिस्टलोग्राफीमध्ये संशोधनास सुरुवात केली. पुढे १९८१-८२ मध्ये ते या संस्थेचे संचालकही बनले. मधल्या काळात १९६२-६६ दरम्यान ते आयआयटी मद्रासमध्ये होते. तेथे त्यांनी भौतिकशास्त्र विभाग सुरू केला. बंगळुरू येथील नॅशनल एरॉनॉटिकल लॅबोरेटरीमध्ये भौतिकविज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. या प्रयोगशाळेने भारतातील भौतिकविज्ञानाच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

देशातल्या पहिल्या भौतिकविज्ञान प्रयोगशाळेप्रमाणेच देशातील पहिली उच्च दाब प्रयोगशाळाही त्यांनी विकसीत केली. नॅशनल एरॉनॉटिकल लॅबोरेटरीमध्ये त्यांनी विकसीत केलेल्या भौतिकविज्ञान प्रयोगशाळेचे देशातील अंतराळविज्ञान संशोधनाच्या क्षमता वर्धनात कळीचे स्थान आहे. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट याच्यासाठी परिवलन गतीतील विचलन कमी करणारी न्युटेशन डॅम्पर यंत्रणा प्रा. रामशेषन यांनी विकसित केली होती. त्याशिवाय त्यांच्या संशोधनामुळे हृदयाच्या कृत्रिम झडपा, रक्त पिशव्या आणि अंतराळ संशोधनात आवश्यक असणारी अनेक उपकरणे विकसीत करण्यात मदत झाली.

या साया व्यतिरिक्त ऑप्टिक्स, क्रिस्टलोग्राफी आणि हाय- प्रेशर फिजिक्स आदी क्षेत्रांतही त्यांनी पथप्रदर्शक संशोधन केले. या कार्याबद्दल त्यांना शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार (१९६२), भौतिक शाखातील वास्विक पुरस्कार (१९८०), आर्यभट पदक (१९८५) आणि पद्मभूषण (१९८५) असे पुरस्कार मिळाले. बंगळुरू येथील अस्त्र रिसर्च सेन्टरच्या संस्थापक संचालकांपैकी ते एक होते. १९७१ मध्ये इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

उत्तम वैज्ञानिक आणि संशोधन संस्थांचा प्रशासक असलेले रामशेषन एक अब्बल दर्जाचे विज्ञान संवादकही होते. ‘प्रमाण’ या नावाने प्रसिद्ध असलेले भौतिकशास्त्रातील नियतकालिक सुरू करण्यातही त्यांचा सहभाग होता. किंबहुना या नियतकालिकाचे ते पहिले संपादक होते. १९७७ मध्ये इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या प्रकाशनांचे पहिले संपादक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १९८९ मध्ये करंट सायन्स या मासिकाचे संपादक बनल्यानंतर त्यात त्यांनी आमुलाग्र सुधारणा घडवून आणत ते वाचकप्रिय करण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांचे नोबेल विजेते मामा सर सी व्ही रामन यांच्या सचित्र चरित्राचेही ते सहलेखक होते.

त्यांचे सहकारी आणि मित्र त्यांचे एक महान शिक्षक व उत्तम संवादपटू म्हणून वर्णन करीत. बंगळुरू येथे वयाच्या ८० व्या वर्षी २९ डिसेंबर २००३ रोजी त्यांचे निधन झाले.

लेखक :- रईस अल्ताफ

(रईस अल्ताफ है विज्ञान प्रसारमध्ये प्रकल्प सहाय्यक असून विज्ञान संवादक व लेखक आहेत)

(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)

Back to top button