NewsPoliticsWorld

‘अरे’ला ‘कारे’नेच उत्तर देणार ..!

Confronted by Chinese soldiers in Ladakh, Indian shepherds stand their ground

चिनी सैनिकांना लडाखमधील मेंढपाळांनी दाखवले अस्मान…

लेह, लडाखमध्ये चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. समाज माध्यमांवर लडाखमधील मेंढपाळ आणि चिनी सैनिकांची एक चित्रफीत व्हायरल झाल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. या चित्रफितीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लडाखमधील मेंढपाळांना मेंढ्या चरण्यापासून चिनी सैनिक रोखताना दिसत आहेत. यावेळी अत्यंत निर्भयपणे मेंढपाळांनी त्यांना उत्तर दिल्याचे दिसते. ही चित्रफीत पूर्व लडाखमधील असल्याचे दिसून येत आहे.

गलवान येथे २०२० साली भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. सध्याच्या घडीला सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत आहे.यासाठी ‘border road organisation’ चं कौतुक करावं तितकं कमी आहे.

तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन लडाखमधील मेंढपाळांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गुरे चरणे बंद केले. यानंतर प्रथमच लडाखमधील मेंढपाळ पुन्हा एकदा या भागात चराईसाठी मेंढ्या घेऊन गेले. यावेळी नेहमीप्रमाणे चीनच्या सैनिकांनी त्यांच्यावर अरेरावी करीत त्यांना माघारी फिरण्याची धमकी दिली. मात्र, लडाखमधील मेंढपाळांनी चिनी सैनिकांना प्रतिकार करीत सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांनाच माघारी जाण्यास भाग पाडले.

समाज माध्यमावरील चित्रफितीत सुमारे तीन चिनी चिलखती वाहने आणि अनेक सैनिक घटनास्थळी दिसत आहेत. वाहने अलार्म वाजवतात, मेंढपाळांना निघून जाण्याचा इशारा देतात; पण लडाखी मेंढपाळ येथेच मेंढ्यांना चराईसाठी सोडणार यावर आग्रही राहतात. ते चिनी सैनिकांना म्हणतात की, आम्ही भारतीय हद्दीत गुरे चारत आहोत. याला विरोध करणाऱ्या चीन सैनिकांना लडाखचे मेंढपाळ हातात दगड घेत प्रतिकारही करतात.

येथील लोकप्रतिनिधी कोंचोक स्टॅननिज यांनी स्थानिक मेंढपाळांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या भारतीय लष्कराचेही आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात पशुपालक आणि भटक्या लोकांना सुविधा देण्यावर भारतीय लष्कराने केलेला सकारात्मक परिणाम पाहून आनंद झाला. इतके मजबूत नागरी-लष्करी संबंध राखल्याबद्दल आणि सीमावर्ती भागातील लोकांचे हित जपल्याबद्दल मी भारतीय लष्कराचे आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.

लष्करामुळेच प्रतिकार झाला शक्य

भारतीय लष्कराच्या पाठिंब्यामुळेच मेंढपाळ चिनी सैनिकांचा धैर्याने सामना करू शकले. चराईचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे लष्कर नेहमीच नागरिकांसोबत असते यात शंका नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आमचे मेंढपाळ चिनी सैनिकांना धैर्याने तोंड देऊ शकले, असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. अलिकडेच भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी ‘एलएसी’वरील परिस्थिती स्थिर असली, तरी संवेदनशील असल्याचे म्हटले होते.

“कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच” ही म्हण चीनबाबत चपखल लागू पडते.जगावर अधिराज्य गाजवण्याच्या इर्षेने,दादागिरी, दंडेली करणाऱ्या चीनला आपल्यासमोरील सर्वांत मोठा अडथळा वाटतो तो भारताचा. कारण, भारत साधनसंपत्ती, मनुष्यबळ, तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संशोधनात चीनच्या तोडीस तोड आहे.

भारत (bharat) आपले वर्चस्व तर मान्य करणार नाहीच, पण सभोवतालच्या व जगभरातल्या छोट्या-मोठ्या देशांनाही चिनी जाळ्याविरोधात एकवटवू शकतो, याची जाणीव चीनला आहे. त्याचमुळे चीन सतत भारताविरोधात हालचाली करत असतो, कधी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला हाताशी धरून तर कधी नेपाळमध्ये घुसखोरी करून, तर कधी बांगलादेश-श्रीलंकेला आर्थिक मदतीच्या सापळ्यात अडकवून.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी (atal bihari vajpayee), “शेजारी कधी बदलता येत नसतात”, असे विधान केले होते. ते सार्वकालिक सत्य आहे हेच निश्चित…

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की,

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू
..

Back to top button