News

ग्वादर येथील जिन्नाचा पुतळा बलुच लिबरेशन फ्रंट कडून उध्वस्त

लाहोर : भारताच्या फाळणीला जबाबदार असलेले तसेच पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिन्ना यांचा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर येथील पूर्णाकृती पुतळा उध्वस्त करण्यात आला. पाकिस्तानात बंदी असलेल्या बलुच लिबरेशन फ्रंट ने रविवारी बॉम्ब टाकून हा पुतळा उडविल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा भाग सुरक्षित असल्याचे वाटल्याने या भागात हा याच वर्षी जूनमध्ये हा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याखाली स्फोटके ठेवून त्याचा स्फोट घडवून हा पुतळा उध्वस्त करण्यात आला, असे वृत्त पाकिस्तानातील दैनिक डॉनने दिले आहे.

पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान असणाऱ्या जिन्नानी स्वातंत्र्यलढ्यात ‘द्वि धर्म द्वि राष्ट्र’ ही संकल्पना मांडत त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती. पाकिस्तानात समाविष्ट होण्यास बलुचिस्तानचा पहिल्यापासून विरोध होता. बलुचिस्तानला हिंसाचाराचा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. नैसर्गिक वायू, तेल, तांबे, सोने अशा साधनसंपतीने बलुचिस्तान समृद्ध आहे. पण त्यांच्या खाणींचे काम बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे असल्यामुळे या साधनसंपत्तीचा वाटा बलुचिस्तानला मिळत नाही. त्यामुळे बलुचिस्तान अजूनही अविकसित आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही बलुचिस्तान पाकिस्तानमधील अत्यंत मागासलेला प्रांत आहे.

पाकिस्तानच्या राजकारणात आणि लष्करात कायमच पंजाबी लोकांचे आणि पंजाब प्रांताचे वर्चस्व राहिले आहे. पाकिस्तान सरकारने जाणीवपूर्वक बलुचिस्तानला प्रतिनिधित्व नाकारले आहे, अशी बलुचिस्तानची तक्रार आहे. आपण मुख्य प्रवाहापासून वेगळे गेलो आहोत, दुर्लक्षित आहोत आणि नाकारले गेलो आहोत, अशी भावना बलूच जनतेच्या मनात आहे. अशा या ऐतिहासिक आणि राजकीय संघर्षाच्या चक्रव्युहामध्ये अडकलेल्या बलुचिस्तानमध्ये सातत्याने मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्यामुळे जिथे आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळेल तिथे बलुचिस्तान आपली मागणी मांडत असतो. न्याय मागत असतो. अत्याचार थांबवून स्वातंत्र्य मागत असतो.

चीनची पाकिस्तानातील प्रचंड आर्थिक गुंतवणूक सर्वाधिक बलुचिस्तानमध्ये आहे आणि त्यातही ग्वादार शहरातून ग्वादरचे भूमिपुत्र असलेल्या बलुचांना मोठ्या प्रमाणात विस्थापित करून पाकिस्तान सरकार पंजाबी पाकिस्तानी लोकांच्या हितासाठी बलूच भूमीचा चीनसोबत सौदा करत असल्याची भावना बलुचिन मध्ये निर्माण झाली आहे.

**

Back to top button