ChristianityNewsRSSSpecial Day

कर्मयोगी एकनाथजी

Eknathji Ranade

श्री एकनाथ रामकृष्ण रानडे (Eknathji Ranade) यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१४ साली रामकृष्णराव आणि रमाबाई रानडे यांच्या पोटी अमरावती जिल्ह्यातील टिमटाला या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर मध्येच झाले. १९२५ मध्ये नागपूरात विजयादशमीच्या शुभमूहूर्तावर रास्वसंघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. Keshav Baliram Hedgewar) यांनी केली. लहानगा एकनाथ १९२६ साली रा.स्व.संघाच्या बालांच्या शाखेत जाऊ लागला. एकनाथजींनी नंतर उल्लेख केला होता की “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (Rashtriya Swayamsevak Sangh-RSS)परिसस्पर्श जर माझ्या आयुष्याला झाला नसता तर माझे आयुष्य भरकटले असते”. त्याकाळी भारत देश ब्रिटीशांच्या अंमलाखाली असल्याने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपण काहीतरी करावे हे एकनाथच्या सारखे मनात यायचे. यातूनच त्याने आपल्या शाखेतील मित्रांच्या मदतीने बॉंब बनवुन युनियन जॅकचे संरक्षण करणार्या ब्रिटीश शिपायांवर ते फेकण्याची योजना आखली होती. पण हे गुपित फुटल्यावर डॉ. हेडगेवारांनी एकनाथ आणि त्याच्या मित्रांना बोलावून घेऊन मार्गदर्शन केले.

“स्वातंत्र्य प्राप्ती हा केवळ वेळेचा प्रश्न आहे. पण मुळात आपण गुलाम का झालो याचा विचार करावयास हवा? मुठभर ब्रिटीश आपल्यावर राज्य करु शकतात कारण आपण संघटीत नाही आणि आपल्याकडे राष्ट्रीय जाणीवेचा अभाव आहे. प्रथम ही स्थिती सुधारली पाहिजे. त्यासाठी कराव्या लागणार्या कामाला प्रचंड तितिक्षेची गरज असते. बॉंबस्फोट घडवुन सगळे प्रश्न सुटणार नाहीत.” एकनाथला डॉक्टरांचे म्हणणे पटले आणि कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करायचे ही शिकवणही त्याला मिळाली.

एकनाथने नियमित व्यायामाने आपले शरीर कमावले होते. एकनाथजी जेव्हा पूर्वांचलचे प्रांतप्रचारक बनले तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड शारिरीक क्षमतेविषयी आणि ऊर्जेविषयी स्थानिक कार्यकर्ते सांगत. शारिरीक कसरतींमध्ये एकनाथजी एक वजनाने प्रचंड अशी गदा हातात घेऊन हवेत गरागरा फिरवत असत. इतर कुणाला ती गदा साधी जमिनीवर देखील हलवता येत नसे पण एकनाथजी ती गदा लिलया उचलुन हवेत फिरवत असत यातून त्यांच्या दंडांत प्रचंड ताकद होती हे लक्षात येते. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच एकनाथ हळूहळू संघ कार्याशी एकरुप होऊ लागला होता. एकदा त्याला एका विषयावर बौद्धिक देण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला एकनाथ नाही म्हणाला पण नंतर तयारीनिशी तो चांगला बोलला. त्यामुळे नंतरही त्याला बौद्धिक सत्र घेण्याची जबाबदारी दिली जात असे. यातूनच तो एक उत्कृष्ठ प्रभावशाली वक्ता बनला. तो ज्या महाविद्यालयात शिकत होता त्याचे नाव हिस्लॉप. ही ख्रिस्ती मिशनर्यांची ( christian missionaries) संस्था होती. तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला बायबलचा वर्ग अनिवार्य असे.

बायबल शिकविणारे प्रा. फिलिप्स हे बाटगे ख्रिस्ती होते. बायबल शिकविताना ते हिंदू धर्माची अत्यंत नींदा नालस्ती करत असत. एकनाथला त्यांचा प्रचंड राग येत असे पण समस्येच्या मूळाशी जाण्याची शिकवण असल्याने त्यांनी ख्रिस्ती मिशनर्यांकडुन असे का घडते हे समजुन घेतले. त्याला लक्षात आले की आपल्या लोकांना ख्रिस्ती मिशनरी लोकांचा प्रतिवाद करता येत नसे कारण हिंदूंना आपल्याच धर्माच्या बाबतीत फारसे ज्ञान नसते. एकनाथने मग उपनिषदे, वेदांत तत्वज्ञान आणि टिळकांनी लिहीलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचा अभ्यास चालू केला. अशातच त्याने स्वामी विवेकानंदांच्या जीवन आणि तत्वज्ञानाचा अभ्यासही करण्यास सुरुवात केली.

महाविद्यालयात असतानाच १९३६ मध्ये एकनाथने नागपूरच्या कामठी व अन्य भागांत विस्तारक म्हणून काम केले. शेवटी अनेक अडचणींवर मात करत १९३८ मध्ये एकनाथने संघाचा प्रचारक म्हणून काम करावयास महाकोशलमध्ये सुरुवात केली. तिथे रुजु झाल्यावर सगळेजण त्याला एकनाथजी असे म्हणावयास लागले. एकनाथजी जबलपूर मध्ये प्रचारक होते तेव्हाची गोष्ट. जबलपूरमध्ये एक बदमाष व्यापार्यांना त्रास देऊन त्यांच्याकडून खंडणी वसुल करतो असे त्यांच्या कानावर आले. एकनाथजी ठरवुन तो बदमाष खंडणी वसुल करण्यास येणार त्यावेळी दुकानात ग्राहक म्हणून पोहोचले आणि त्या गुंडाशी त्यांनी दोन हात केले. एकनाथजींच्या पुढे त्याचा काही टिकाव लागला नाही. त्यामुळे नंतर तो जो गायब झाला तो गायबच. यातून एकनाथजींनी “शरीरमाद्यं खलुधर्म साधनम” हे सिद्धच केले.

जबलपूरमधील त्यांच्या एका परिचित जोडप्याचे भांडण झाल्याने त्यातील नवरा घर सोडून इंदूरमध्ये एका धर्मशाळेत जाऊन राहीला असल्याची बातमी एकनाथजींना समजली. त्याला भेटून त्याचे मन घरी परत जाण्याविषयी वळवावे या हेतूने एकनाथजींनी त्याचा पाठालाग करावयास सुरुवात केली. हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने एकनाथजींना गाठले. तो स्वत: तर घरी जाण्यास तयार झालाच नाही पण एकनाथजींनाही तो परत जाऊ देईना कारण त्याला भिती होती की एकनाथजी त्याच्या कुटुंबियांना सगळं सांगतील. शेवटी एकनाथजींनी त्याच्या करवीच कुटुंबियांना तार करुन त्यांना इंदूरमध्ये बोलावून घेतले. सगळे इंदूरला पोहोचल्यावर आता सगळे आपोआप ठीक होईल असा विचार करत ते धर्मशाळेतून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एकनाथजींचा पाठलाग ब्रिटीश पोलीस करत होते. एकनाथजींना हे लक्षात आल्यावर त्यांनी आपणहून पोलीस चौकीत हजर होऊन पोलीसांना सत्य काय आहे ते सांगून त्यांचा संशय संपविण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस विश्वास ठेवत नव्हते. शेवटी एकनाथजींनी त्यांना कसंबसं ते सगळं पटवुन दिलं.

संघटनेत जेव्हा एखादा कार्यकर्ता काम करतो तेव्हा तो हळूहळू लोकांच्या मनात स्थान निर्माण करतो. मग त्या कार्यकर्त्याला असे वाटू लागते की आपल्या शिवाय संघटनेचे कार्य चालायचेच नाही. संघासारख्या शिस्तप्रिय संघटनेतही असे काही कार्यकर्ते होते. दिल्लीत संघाला अशाच एका कार्यकर्त्याला तोंड द्यावे लागले. त्यावेळी त्या कार्यकर्त्याचे व्यक्तीगत स्तोम बंद करण्यासाठी आणि संघटनेचे महत्व पुर्नस्थापित करण्यासाठी एकनाथजींना दिल्लीत जवळजवळ वर्षभर मुक्काम ठोकावा लागला होता. एकनाथजींनी ती परिस्थिती अत्यंत कुशलतेने नाजूकपणे आणि काळजीपूर्वक हाताळली.

हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हिंदूंना संघटीत करण्याचे काम संघाचे आहे हे त्यांनी प्रत्येक स्वयंसेवकाला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनावर बिंबवले. जेव्हा संघकार्याचे महत्व पुन्हा प्रस्थापित झाले तेव्हा, व्यक्तीगत स्तोम, अहंकार कमी झाले व संबंधित व्यक्तीही पुन्हा संघटनेत प्रामाणिकपणे काम करु लागली. १९५३ साली एकनाथजींकडे अखिल भारतीय प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. १९५६ मध्ये संघाचे तत्कालिन सरकार्यवाह श्री भैय्याजी दाणी यांना काही कौटुंबिक जबाबदार्यांमुळे घरी जावे लागले तेव्हा श्रीगुरुजींनी ही जबाबदारी एकनाथजींवर सोपवली.

संघाचा सरकार्यवाह म्हणजे आधुनिक भाषेत “मुख्य कार्यकारी अधिकारी”. आपल्या सरकार्यवाह पदाच्या कारकिर्दीत एकनाथजींनी संघाचे संघटनात्मक रुप अतिशय सशक्त बनविले. यामुळेच त्यांची ही कारकिर्द लक्षवेधी आणि संस्मरणीय ठरली. पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन यावर एकनाथजींचा भर कायम असे. गुरुवारी ते कुठेही असले तरी शक्यतो त्या दिवशी कोणतेही कार्यक्रम ठेवत नसत कारण गुरुवारी ते आपले राहीलेले कार्यालयीन काम तसेच पत्रव्यवहारांस उत्तर असे सारे अपूर्ण काम पूर्ण करत असत. त्यानंतर ते प्रचारक आणि स्वयंसेवकांसाठी वेळ देत असत. एकनाथजींना “दोन दृष्टी” होत्या. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपले अंतिम ध्येय काय आहे आणि त्यासाठी तूर्तास काय करायचे आहे. ते त्याप्रमाणे कामाची आखणी करत. एकनाथजींचे काम परिपूर्ण असे आणि इतरांकडूनही ते अशाच कामाची अपेक्षा करीत. एखादा माणूस अतिशय सामान्य असला, त्याच्या अनेक मर्यादा असल्या तरी प्रत्येकांत दैवी अंश असतोच अशी त्यांची श्रद्धा होती. समर्पित व ध्येयवादी व्यक्तीने सक्षमही असले पाहिजे आणि कठोर परिष्रमाने असाधारण उंची गाठणे शक्य आहे यावर त्यांची केवळ श्रद्धाच नवती तर आपल्या कार्यातून त्यांनी ते सिद्धही केले. त्यांच्या याच गुणांचा त्यांना विवेकानंद शीलास्मारक निर्माण करताना उपयोग झाला.

१९६२ ते १९६३ या काळात एकनाथजी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. संघामध्ये विविध जबाबदार्या सांभाळल्यामुळे ते समाजाच्या विविध स्तरांत वावरत होते. प्रतिष्ठितांशी बोलत होते. त्यांचे विचार जाणून घेत होते. ते समाजाचे अभ्यासक होते. त्यांच्यातील आदर्शवाद आनि समोर असलेल्या समस्या यांमुळे ते कधीकधी व्याकुळ होत असत. अशा परिस्थितीत त्यांचे चिंतन अजुनच सखोल झाले. कोणत्याही देशाचे पुनरुत्थान करावयाचे असल्यास त्यातील अर्ध्या जनतेकडे (स्त्रियांकडे) दुर्लक्ष करुन चालणार नाही.

देशकार्यात हातभार लावण्यासाठी स्त्रिया देखील तेवढ्याच सक्षम असतात मात्र त्यांना तशा पद्धतीचे प्रशिक्षणही देण्यात यावे हेच त्यांचे मत होते. त्यामुळे महिला कार्यकर्त्या असणे ही आता काळाची गरज आहे हे त्यांनी ओळखले होते. १९६३ हे स्वामी विवेकानंद जन्मशताब्दीचे वर्ष असल्याने ती जोरदार साजरी करण्यासाठी देशभर योजना आखल्या जात होत्या. त्याच सुमारास चीनच्या आक्रमणामुळे आणि त्यास तोंड देण्यास भारतीय सैन्याची देशाच्याच अव्यावहारिक धोरणांमुळे तयारी नव्हती. त्यामुळे सिअनिक आणि नागरिक यांचे मनोधैर्य खचलेले होते. ते उंचावण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांच प्रचार आणि प्रसार करणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांना वाटले.

स्वामीजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने जो ग्रंथ प्रकाशित करावयाचा होता त्यासाठी मार्च १९६२ मध्ये त्यांनी कोलकत्याच्या बेलूरमठात राहून स्वामी विवेकानंदांच्या समग्र वाड्मयाचा अभ्यास केला. अनेक पुस्तके समोर असल्याने द्विध मन:स्थिती टाळण्यासाठी त्यांनीत्यासाठी बाकीचे सर्व ग्रंथ बाजूला ठेवून फक्त स्वामी विवेकानंदांच्या समग्र वाड्मयावरच लक्ष केंद्रित केले. सखोल अध्ययनासाठी त्यांनी स्वत:ला अक्षरश: एका खोलीत बंद करुन घेतले. त्याचं फलित म्हणून जो ग्रंथ निर्माण झाला त्याचं नाव त्यांनी “Rousing Call to the Hindu Nation” म्हणजेच “हिंदू तेजा जाग रे” असे ठेवले. हे अप्रतिम पुस्तक वर्षानुवर्षे कार्यकर्त्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायक ठरलेले आहे. हे अध्ययन करत असतानाच त्यांना राष्ट्र पुनरुत्थानासाठी “शीवभावे जीव सेवा” या मंत्राचा अर्थ लक्षात आला आणि स्वामीजींचे विचार प्रत्यक्ष उतरविण्याचा ध्यास त्यांच्या मनाने घेतला होता. लौकरच स्वामी विवेकानंद शीलास्मारक समितीच्या निमित्ताने तशी संधी एकनाथजींच्या समोर आलीही.

कन्याकुमारी येथील समुद्रातील ज्या शीलेवर (श्रीपाद शीला) स्वामी विवेकानंदांना तीन दिवसांच्या ध्यानधारणेनंतर आपल्या जीवीत कार्याचा साक्षात्कार झाला त्या शीलेवर स्वामीजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांचे स्मारक उभे करावे अशी कल्पना तामीळनाडूतील संघाच्या प्रांत प्रचारकांनी मांडली. ही कल्पना कन्याकुमारीतील लोकांनीही उचलुन धरली आणि त्यासाठी एक स्थानिक समिती स्थापन करण्यात आली. स्थानिक ख्रिस्ती लोकांना याची कुणकुण लागल्यावर त्यांनी त्या कामात खोडा घालण्यासाठी रातोरात त्या शीलेवर क्रॉस प्रस्थापित करुन त्या शीलेला “सेंट झेवियर्स रॉक” असं संबोधायला सुरुवात केली. तत्कालिन तामिळनाडू सरकारने (श्री भक्तवत्सलम मुख्यमंत्री होते) या ताबडतोबीच्या अतिक्रमणाला मान्यताही दिली. एकूणच या प्रकल्पाच्या निर्मिती पासूनच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या कार्यास लोकाश्रय मिळावा म्हणून या जिल्हा स्तरिय समितीचा विस्तार टप्प्या टप्प्याने राज्यस्तरावर आणि नंतर अखिल भारतीय स्तरावर करण्यात आला.

समितीचे पहिले अध्यक्ष श्री. मनमथ पद्मनाभन हे होते. शीला स्मारकाशी संबंधित आणि त्याला विरोध करणारे अशा सर्वांनीच ताठर भूमिका घेतल्याने परिस्थिती अवघड होऊन बसली. अशातच तामीळनाडूच्या प्रांत प्रचारकांच्या डोळ्यासमोर ही परिस्थिती हाताळण्यासाठी एकनाथजींचे नाव समोर आले. शीला स्मारक समितीने तत्कालिन सरसंघचालक श्री गुरुजींशी याबाबतीत संपर्क साधला. गुरुजींना एकनाथजींचा कल, त्यांची क्षमता ज्ञात होती. याच बरोबर त्यांना आपले आध्यात्मिक गुरु स्वामी अखंडानंद यांच्या ऋणातून उतरायी होण्याची ही एक संधी आहे असे वाटले. म्हणून त्यांनी एकनाथजींना त्यांच्या संघाच्या सर्व जबाबदार्यांतून मुक्त केले आणि विवेकानंद शीलास्मारक उभारण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देण्यास सांगीतले. एकनाथजींनी या सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरविला आणि इतिहास घडविला.

एकनाथजींनी रामकृष्ण मठापासून अनेक संघटनांना एकत्र आणले तसेच सर्व विरोधकांचे विरोध विविध पद्धतींनी मोडून काढले आणि सर्वांचे सहकार्य प्राप्त केले. हे स्मारक सामान्य जनतेला देखील आपलं वाटावं यासाठी त्यांनी अगदी एक रुपयाचे देणगी मूल्य देखील यासाठी घेतले. विवेकानंद शीला स्मारकाची रंजक कथा “The story of the Vivekananda Rock Memorial” या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. शीला स्मारक निर्माण झाल्यावर तिथे स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करणारे जीवनव्रती कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी एक जीवंत स्मारक असावे या विचारातून ७ जानेवारी १९७२ रोजी विवेकानंद केंद्र या आध्यात्म प्रेरित संघटनेची स्थापना केली. गेल्याच वर्षी विवेकानंद केंद्राने आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला.

एकनाथजींनी जीवनव्रती कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यास १९७३ साली सुरुवात केली. म्हणून २०२३ हे वर्ष विवेकानंद केंद्र (vivekananda kendra) “विशेष प्रशिक्षण वर्ष” म्हणून साजरे करत आहे. एकनाथजींनी विवेकानंद केंद्राच्या कामाची योग, शिक्षण, संस्कती संवर्धन, वेदाभ्यास, नैसर्गिक साधनसंपत्ती विकास, प्रशिक्षण आणि प्रकाशन अशा विविध माध्यमांत विभागणी केली. संघाने एकनाथजींसारखे अनेक कर्मयोगी तयार केले तर एकनाथजींनी संघाचा तोच वारसा विवेकानंद केंद्र निर्माण करुन पुढे चालू ठेवला. अशा कर्मयोग्याची आज ४१ वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहते.

लेखिका :- डॉ. अपर्णा लळिंगकर.

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य, विवेकानंद केंद्र कार्यकर्ता)

Back to top button