Opinion

सकारात्मक : भाषांतरकार डॉ. भीमराव कुलकर्णी यांची ९८व्या वर्षी कोविडवर यशस्वी मात

माझं भाषांतराचं अविरत सुरू असणारं काम हीच माझी जीवनप्रेरणा. या प्रेरणेने मला कोविडची, त्यातून बाहेर पडण्याची निष्कारण चिंता करीत बसायला वेळच नाही दिला, डॉ. कुलकर्णी सांगत होते. वयाच्या अठ्ठ्याणव्याव्या वर्षी कोविडवर यशस्वी मात करून डोंबिवलीचे डॉ. भीमराव कुलकर्णी आजोबा पुन्हा आपल्या भाषांतराच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत. या आजोबांनी चारही वेदांचे मराठीत भाषांतर केले असून, सध्या ते उपनिषदांच्या भाषांतरावर लक्ष केंद्रीत करीत आहेत.

डोंबिवलीत आनंदाने आणि आत्मविश्वासाने या वयातही एकट्या राहणाऱ्या डॉ. कुलकर्णी यांना २१ मार्च रोजी कोविडचं निदान झालं. मुलगा पुण्यात, मुलगी अमेरिकेत होते. कोविडच्या प्रादुर्भावामुळे कोणीही इच्छा असूनही मदतीसाठी पोहोचू शकणार नव्हतं. त्यांचे जावई व मुलगी हे देखील डॉक्टर असून जावयांच्या दवाखान्यातील कम्पाऊंडरच्या मुलीने टेस्ट करण्याची व्यवस्था, खिडकाळी जवळील नियॉन रुग्णालयात दाखल करणं हे सारं आत्मियतेने केलं.

डॉ. भीमराव कुलकर्णी हे मुळचे वैद्यकीय क्षेत्रातील. साठाव्या वर्षापर्यंत त्यांनी मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालय जी एस वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. निवृत्तीनंतर गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी स्वतःला संस्कृत भाषेसाठी वाहून घेतलं व वेदवाङमयादि ग्रंथांच्या भाषांतराचे कार्य सुरू केलं. आजवर त्यांचे चारही वेदांचे भाषांतर पूर्ण झाले असून विविध प्रकाशन संस्थांच्या माध्यमातून ऋग्वेद व यजुर्वेदाची भाषांतरं प्रकाशित झाली असून उर्वरीत सामवेद आणि अथर्ववेद कोठावळे यांच्या मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित होणार आहेत. सध्या त्यांनी उपनिषदांच्या भाषांतराचं काम हाती घेतलं असून त्यानंतर ब्राह्मणे आणि आरण्यकेही भाषांतरित करणार आहेत.

कुलकर्णी आजोबांनी १८ मे रोजी वयाची ९८ वर्षं पूर्ण करून ९९व्या वर्षात प्रवेश केला. डॉक्टरांचं पूर्ण लक्ष आणि रुग्णालयाने घेतलेली काळजी यामुळेच मी कोरोनातून ३० दिवसांनंतर बाहेर आलो आणि आता ठणठणीत झालो आहे. संस्कृतमधील प्राचीन वाङमय मराठीत आणण्याचं काम अजूनही खूप शिल्लक आहे. ते पूर्ण करणं हे माझं ध्येय आहे. या ध्येयामुळे आणि कामाच्या ओढीमुळेच मी कोरोनातून व्यवस्थित बाहेर आलो आणि आता पुन्हा कामाला लागलो आहे, असं डॉ. कुलकर्णी सांगतात.

Back to top button