News

वीरशैव लिंगायत हिंदूच ! भाग ५

वीरशैव लिंगायत हिंदूच ! हे निदर्शित करणारे मुद्दे पुढीलप्रमाणे :-

1. वीरशैव लिंगायत हे हिंदू (veerashaiva lingayat) धर्मातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांपैकी महेश अर्थात भगवान शिवाचे उपासक आहेत.

2. वीरशैव लिंगायत उपासनापद्धतीचा उगम याच भारतभूमीत झालेला आहे. भारतवर्षात उगम पावलेला प्रत्येक पंथ, संप्रदाय, उपासनापद्धती, धर्म यांचा समावेश हिंदू धर्मांतर्गत होतो.

3. महात्मा बसवण्णा (mahatma basaveshwar) यांनी कोणत्याही नवीन धर्माची स्थापना केलेली नसून आधीपासून विद्यमान असलेल्या वीरशैव लिंगायत मतप्रणाली / तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. बसवण्णा यांच्या आधी तीन हजार वर्षांपासून वीरशैव लिंगायत संप्रदाय अस्तित्वात आहे.

4. भारतवर्षातील 12 ज्योतिर्लिंगे ही वीरशैव लिंगायत समाजाची श्रद्धाकेंद्रे आहेत. ज्योतिर्लिंगांचा इतिहास हा किमान पाच हजार वर्षांहून मागे जातो. केदारसह अनेक ज्योतिर्लिंगांच्या दैनंदिन पूजेचा मान वीरशैव लिंगायत समाजाकडे आहे.

5. दसरा, दिवाळी, होळी, महाशिवरात्र, गुढीपाडवा (उगादी), नागपंचमी या सणांना वीरशैव लिंगायत समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

6. पंचपीठ आणि शिवाचार्य परंपरेला वीरशैव लिंगायत समाजात मोलाचे स्थान आहे. या परंपरेत वेदांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.

7. महात्मा बसवण्णा यांचे जातवेद मुनी यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण झाले होते. त्यांनी स्वत: जातवेद मुनींकडून दीक्षा घेतली होती.

8. वीरशैव लिंगायत समाजात स्थावरलिंग आणि इष्टलिंग या दोन्हींचेही महत्त्व मोठे आहे. शिवभक्ती हा लिंगायत समाजाचा आत्मा आहे.

9. ॐ नम: शिवाय हा पंचाक्षरी मंत्र वीरशैव लिंगायत परंपरेत पवित्र आहे.

10. वीरशैव लिंगायतांमध्येे मृत्यूनंतर दफन करीत नाहीत तर समाधीक्रिया केली जाते. दफन म्हणजे शवपेटीत झोपलेल्या अवस्थेत पुरणे. समाधीक्रिया म्हणजे संतपुरुषाप्रमाणे आसनमांडी घालून ध्यानस्थ अवस्थेमध्ये पुरणे. दफन आणि समाधी यामध्ये फरक आहे.

11. जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा (उगादी), मकर संक्रांत, होळी, नागपंचमी आदी सण उत्सव साजरे करतात, बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर या स्थळांना श्रद्धाकेंद्र मानतात, शक्तिदेवीची आराधना करतात आणि बसव, सिद्धराम आदी शिवशरणांबद्दल श्रद्धाभाव बाळगतात ते वीरशैव लिंगायत हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहेत.

12. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यालयाला दि. 14 नोव्हेंबर 2013 रोजी लिहिलेले एक पत्र महत्त्वाचे आहे. तेव्हाच्या गृहमंत्रालयाने लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे का, याबद्दल भारताचे रजिस्ट्रार जनरलचे मत मागवले होते. रजिस्ट्रार जनरल यांनी लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. याची दोन प्रमुख कारणे सांगितली होती. एक म्हणजे लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक घटक आहेत, हे स्पष्ट करताना रजिस्ट्रार जनरल यांनी सरकारचेच जुने निर्णय, कर्नाटक हायकोर्टाचे मत आणि आधीच्या जनगणनेचा हवाला दिला होता. लिंगायतांना आधी वीरशैव म्हटले जायचे, ती हिंदू धर्मातीलच एक जात आहे. दुुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला तर या समाजातील अनुसूचित जातींच्या लोकांना सध्या मिळणार्‍या आरक्षणापासून वंचित राहावे लागेल.

13. स्वतंत्र धर्माची मागणी करणार्‍यांचा एक महत्त्वाचा दावा आहे की, लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्‍वरांनी बाराव्या शतकात केली. परंतु, हे खरे नाही. लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्‍वर यांच्या आधीपासून अस्तित्वात होता, याचे सबळ पुरावे खुद्द बसवण्णा आणि शिवयोगी सिद्धराम यांच्या वचनांमध्येच ठायी ठायी आढळतात. बसवेश्‍वरादी शिवशरण समाजसुधारक होते. त्यांनी तत्कालीन समाजात धर्माच्या नावाखाली चालणार्‍या कुप्रथांवर प्रहार केले. प्रबोधनासाठी वचन साहित्य निर्माण केले. त्यातील ठरावीक वचनांचा संदर्भ तोडून सोयीचा अर्थ लावत बसवण्णांना धर्मसंस्थापक ठरवण्याचा प्रयत्न स्वतंत्र धर्माची मागणी करणारे करताना दिसतात.

14. बसवण्णांनी जातिभेदासारख्या प्रथांना नाकारले. ‘प्रसंगी वेदांना बासनात गुंडाळून टाकेन, शास्त्रांना साखळदंड लावेन, आगमांचे नाक कापेन,’ अशी भूमिका घेतली. अशा वचनांवरून त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना केली, असे म्हणणे म्हणजे ‘तरुणांनो, गीता वाचण्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळा,’ असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले म्हणून ते भगवद्गीतेचे विरोधक होते, असे म्हणण्यासारखे होईल. बसवण्णांच्या सर्व वचनांचा एकत्रित अभ्यास केला तर कोणाच्याही सहज ध्यानात येईल की, त्यांनी त्या काळी उपनिषदांतली शाश्‍वत तत्त्वे लोकभाषेत आणली.

15. लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी करणार्‍यांचे एक म्हणणे असे की, ‘लिंगायत धर्म पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत मानत नाही म्हणून तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे.’ परंतु, वस्तुस्थिती तशी नाही. लिंगायत समाज हा कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म दोन्ही मानतो. लिंगायत समाजामध्ये अंतिम संस्कार करतानाच्या वेळी करण्यात येणारा विधी हाच सर्वात मोठा पुरावा आहे. ‘अनेक जन्मांनंतर हा मनुष्यजन्म मिळाला, आम्ही शिवाचे उपासक असल्यामुळे आता पुन्हा जन्म नाही,’ हा आशय व्यक्त करणारा विधी अंत्यसंस्कारप्रसंगी असतो. याचा अर्थ पुनर्जन्म सिद्धांत नाकारला असा होत नाही.

16. महात्मा बसवेश्‍वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटपाचे प्रमुख राहिलेले बसवण्णांचे समकालीन शिवशरण म्हणजे शिवयोगी सिद्धराम. त्यांनी 68 हजार वचनांची निर्मिती केली. त्यातील 1300 वचने आजही उपलब्ध आहेत. त्यातील एक वचन पुढीलप्रमाणे…

‘इन्नु निम्म शरणुवोक्के नागि, ना निम्मनेंदू …’

भावार्थ : अनेक वेळा जन्म घेऊनही मी आपले खरे स्वरूप समजून न घेता माझे जीवन व्यर्थ घालवले. आता मी तुम्हाला शरण आलो आहे… हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना मला कर्मबंधनातून मुक्त करावे, ही एकच मागणी आहे.

Back to top button