Opinion

दुर्दम्य आशावादी – कर्मवीर भाऊराव पाटील

◼️ थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास’ एक वचन सर्वश्रुत आहे. या वचनाला अनुसरून अशा आपल्या संस्कृतीतल्या संतांची, वीरांची, समाज सुधारकांची व विचारवंतांची चरित्रे पाहिली, अभ्यासली तर समाज प्रबोधनाबरोबरच समाज परिवर्तनाचे, समाज जागृतीचे व लोकशिक्षणाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य डोळ्यांसमोर उभे राहाते. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांपैकीच एक.

◼️या आधुनिक भगिरथाने शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात, बहुजन, गरीब कृषीवलांच्या आणि दीनदलित वंचितांच्या दारात नेऊन पोचवली. ‘शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो’ ही त्यांची धारणा होती. त्यानुसारच ते जगले, वागले. लौकिक अर्थाने इयत्ता ६वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या शिक्षणमहर्षीने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब वंचितांच्या घरापर्यंत ज्ञानाची गंगा नेली.

◼️कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे १८८५ मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांची फिरतीची कारकुनाची नोकरी. त्यामुळे प्राथमिक शिक्षण तासगाव, दहिवडी व विटा परिसरात झाले. पुढे पाचवी पास झाल्यावर ६व्या इयत्तेसाठी ते कोल्हापुरात राजाराम हायस्कूलमध्ये दाखल झाले. जैन बोर्डिगमध्ये राहायची सोय झाली. पण त्या वसतीगृहातले कर्मठ धार्मिक नियम भाऊरावांना अमान्य होते. परिणामी त्यांना वसतीगृहातून बाहेर पडावे लागले. त्यावेळी ते राजर्षी शाहू महाराजांच्या सहवासात आले. कुस्ती आणि व्यायामात गती होतीच. दरम्यान ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. पुढे चरितार्थासाठी त्यांनी खाजगी शिकवणी सुरू केली सातारा परिसरात ते पाटील मास्तर म्हणून ओळखले जायचे. काही काळ त्यांनी ओगले, किर्लोस्कर कंपन्यांसाठी फिरते विक्रेते म्हणून काम केले. या कामामुळेच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले दारिद्र्य, शोषण, मागासलेपण, अज्ञान याची तीव्रतेने जाणीव होऊन त्यांच्यातला समाज सुधारक जागा झाला. इ.स. १९१० ला दूधगाव येथे पहिली विद्याप्रसारक संस्था वसतीगृहासह त्यांनी सुरू केली आणि फार मोठ्या कार्याची पायाभरणी झाली. १९१९ मध्ये काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि मग या भगिरथाने मागे वळून पाहीलेच नाही. १९२७ मध्ये भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने साताऱ्याला छ. शाहू बोर्डिंग हाऊस वसतीगृह सुरु केले. येथे सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र काम करून जेवत होते, एकत्रित शिक्षण घेत होते. त्याचे नामकरण म. गांधींच्या हस्ते करण्यात आले. “साबरमती आश्रमात मला जे जमलं नाही ते तुम्ही या ठिकाणी यशस्वीरीत्या करून दाखवलं आहे तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत,” या शब्दांत भाऊरावांच्या कार्याची दखल महात्मा गांधींनी घेतली आणि हरिजन सेवक संघाकडून वार्षिक ५०० रु. मदत सुरू केली. भाऊरावांच्या कार्याचा गौरव करताना “भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है!” असे उद्गार राष्ट्रपित्यांनी काढले होते.

◼️विद्यार्थ्यांना शिकवण्याची तळमळ इतकी की खेड्यापाड्यात उन्हा-पावसात वणवण फिरून गरीब, हुशार विद्यार्थी गोळा करून साताऱ्यात वसतीगृहात दाखल करायचे. त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना योग्य मार्गाला लावायचे. वसतीगृहासाठी मदत गोळा करण्यासाठी ते अविश्रांत कष्टले. प्रसंगी पत्नी लक्ष्मीबाईंना मंगळसूत्र विकून मुलांच्या जेवणाची सोय करावी लागली पण त्यांचे अविरत कष्ट चालूच राहीले.

◼️‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद्ध’ हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. ‘कमवा व शिका’ योजनेचा लाभ घेत सामान्य परिस्थितीतले अनेक विद्यार्थी शिकले. श्रमप्रतिष्ठेचा वस्तुपाठ जगले. १९९५ मध्ये भाऊरावांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे रूरल ट्रेनिंग कॉलेज सुरु केले. १९३८-३९ या वर्षात रयत शिक्षण संस्थेने ६१ प्राथमिक शाळा सुरू केल्यानंतर त्यात खूप मोठी वाढ झाली. नंतर त्यांनी माध्यमिक शाळा काढल्या. १९४७ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय सुरू झाले. भरपूर पारंब्या फुटलेला वटवृक्ष हे या संस्थेचे बोपचिन्ह आहे. त्यानुसार संस्थांचा वटवृक्ष फोफावलेला आहे आणि विविध शाखांमधून आज हजारो विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

◼️निरलसपणे समाजासाठी केलेली सेवा लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना कर्मवीर ही पदवी दियी. भारत सरकारने १९५९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले तर पुणे विद्यापीठाने डि. लीट. पदवी प्रदान करून या कर्मवीराचा उचित गौरव केला.

◼️कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान सूत्रमय भाषेत विषद करताना बॅ. पी.जी. पाटील म्हणतात, “वसतिगृह जीवनावर भर, जातीय ऐक्य, स्वावलंबन व स्वाभिमान, श्रमप्रतिष्ठा व श्रमपावित्र्य, भूमातेशी प्रत्यक्ष संबंध, मानवतावाद, विश्वबंधुत्व स्वातंत्र्य चिंतन व स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, आदर्श ग्रामसेवक, त्यागी व सेवामय असे तपःपूत जीवनध्येय, साधेपणा, जनतेशी एकरूपता, प्रसिद्धीपासून मुद्दाम चार पावले दूर राहून अज्ञान – अंधःकारात पिचत पडलेल्या रयतेला नंदादीपाप्रमाणे सतत तेवत राहून मार्ग उजळून टाकण्याची शिकवण, मोडेन पण वाकणार नाही हे ब्रीद, जीवनात तत्त्वाबद्दल केव्हाही तडजोड नाही, न्यायाची चाड, अन्यायाची चीड व त्याविरुद्ध बंड करून उठणे आणि हे सर्व करीत असताना पैशांमुळे आपले काम केव्हाही अडून राहणार नाही हा दुर्दम्य आशावाद!” असा दुर्दम्य आशावाद परसविणाऱ्या कर्मवीरांना विनम्र आदरांजली.

▪️डॉ. सुप्रिया जोशी, कोल्हापूर

Back to top button