HinduismRSS

असहकार आंदोलनात अग्रेसर डॉ. हेडगेवार(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग 7)

डॉक्टरांचे उत्तम संवाद कौशल्य आणि प्रभावी भाषणे यामुळे परकीय राज्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होतीच. त्यातून त्यांच्या सार्वजनिक भाषणांवर सरकारने एका महिन्याकरिता बंदी घातली. नागपुरचा तत्कालीन जिल्हाआयुक्त सीरिल जेम्स याने २३ फेब्रुवारी १९२१ रोजी कलम १४४ अंतर्गत निर्बंध लागू करत सार्वजनिक ठिकाणी सभा आणि बैठकांवर बंदीचा हुकूम काढला. याने डॉक्टरांची मोहीम थंडावली नाहीच, उलट वाढत्या जोमाने सुरू राहिली.

एक समर्पित व प्रखर राष्ट्रवादी असलेल्या डॉ. हेडगेवार यांनी काँग्रेस सदस्य बनण्यात आणि तसे म्हणवले जाण्यात कधीही अनमान केला नाही. नागपूरच्या अधिवेशनादरम्यान त्यांनी पक्ष संघटनेत स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले. मात्र, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. गांधीजींच्या एका हाकेसरशी संपूर्ण देश या आंदोलनासाठी एकत्र आला होता. तत्पूर्वी डॉ. हेडगेवार क्रांतीकारकांच्या अनुशीलन समितीचे सदस्य होते, १८५७सारख्या एका उठावाची तयारीही त्यांनी केली होती. पण, देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी तितक्याच समर्पित भावाने गांधीजींच्या नेतृत्वाखालील सत्याग्रह आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

कुठेही अन्याय दिसला की त्याविरूद्ध लढणे, हा डॉक्टरांच्या भक्कम व्यक्तिमत्त्वाचा अभिन्न भाग होता. न्यायालय आणि शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार व राष्ट्रीय शाळांची स्थापना, सरकारी पुरस्कार आणि उपाध्या परत करणे, चरख्याचा पुरस्कार, मोर्चे-निदर्शने, घेराव यासाठी लोकांना प्रेरित करणारी अनेक व्याख्याने त्यांनी दिली. युद्धपातळीवर काम करण्यासाठी मध्य प्रांतातील सर्वच काँग्रेस नेत्यांसोबत ते उभे राहिले. असहकार आंदोलनाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळवसाठी गांधीजींनी प्रयत्न केले. त्यांना बरे वाटावे म्हणून खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. त्याबदल्यात त्यांना मुस्लिम नेत्यांचा पाठिंबा अपेक्षित होता. पण, तो कधीही मिळाला नाही. खिलाफत चळवळ दूर तुर्कस्तानातल्या खलिफाची गादी कायम रहावी यासाठी होती. तिचा भारताशी किंवा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी दुरान्वयानेही संबंध नव्हता.

डॉ. हेडगेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग

अशा अनेक मुद्द्यांवर गांधीजींशी असूनही, सभोवतालचा नाजुक काळ लक्षात घेता डॉ. हेडगेवार यांनी कधीही गांधीजींवर सार्वजनिक टिका केली नाही. चळवळीचे कोणतेही नुकसान करण्याचा डॉक्टरांचा विचार कधीही नव्हता. म्हणूनच वेळ आणि स्थळ पाहूनच त्यांनी आपली मते ठोसपणे मांडली. ते गांधीजींना म्हणाले, “लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली देशप्रेमाच्या ओढीने काम करणारे अनेक मुस्लीम नेते आपल्याकडे आहेत. डॉ. अन्सारी आणि हकिम अजमल खान हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. परंतु मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याच्या या प्रयत्नामुळे त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळण्याऐवजी ते त्यापासून दूरच जातील, असे मला वाटते.”  पण त्यावेळी गांधीजी या मुद्द्यावर युवा स्वातंत्र्यसैनिकांशी चर्चा करण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि पक्षांतर्गत मतभेद असूनही त्यांनी त्यांची आपल्याच कल्पना पुढे रेटल्या.

गांधीजींकडून असा हिरमोड करणारा प्रतिसाद मिळूनही डॉक्टरांनी असहकार आंदोलनातील आपला सहभाग अथकपणे न थांबता सुरूच ठेवला.

डॉक्टरांचे उत्तम संवाद कौशल्य आणि प्रभावी भाषणे यामुळे परकीय राज्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होतीच. त्यातून त्यांच्या सार्वजनिक भाषणांवर सरकारने एका महिन्याकरिता बंदी घातली. नागपुरचा तत्कालीन जिल्हाआयुक्त सीरिल जेम्स याने २३ फेब्रुवारी १९२१ रोजी कलम १४४ अंतर्गत निर्बंध लागू करत सार्वजनिक ठिकाणी सभा आणि बैठकांवर बंदीचा हुकूम काढला. याने डॉक्टरांची मोहीम थंडावली नाहीच, उलट वाढत्या जोमाने सुरू राहिली.

हेडगेवारांवर राजद्रोहाचे आरोप

सरकारला डॉ. हेडगेवारांना काही ना काही खटल्यामध्ये अडकवावयाचेच होतेच. त्यांची दोन भाषणे वादग्रस्त ठरवून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला गेला. १९२१ च्या मे महिन्यात डॉ. हेडगेवार यांनी कोर्टात अत्यंत स्पष्ट शब्दांत स्वतःची बाजू मांडली. ते म्हणाले, “भारतातील कोणत्याही सरकारी कामकाजाचे वर्णन कायदेशीर वा कायद्याला धरून असलेले, असे करता येणार नाही. दहशत आणि रानटी शक्तींनी निर्माण केलेल्या भयाच्या वातावरणात आम्ही सारे सध्या जगत आहोत. कायदा आणि न्यायालये राज्यकर्त्यांच्या हातचे खेळणे आहेत. अशा स्थितीत माझ्या मातृभूमीच्या दुरवस्थेविषयी माझ्या देशबांधवांच्या मनामध्ये तीव्र चिंता निर्माण करणे आणि त्यांच्या मनातील देशभक्तीची भावना जागृत करणे यासाठी मी प्रयत्न केला. मी जे बोललो ते माझ्या देशबांधवांचे अधिकार आणि त्यांचा स्वातंत्र्यलढा याबद्दल होते. मी बोललेल्या माझ्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे आणि ते नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरूनच आहे.”

डॉक्टरांचे हे जहाल भाषण ऐकून दंडाधिकारी म्हणाले, “हे निवेदन मूळ सार्वजनिक भाषणांपेक्षा अधिक राजद्रोही आहे.”

दंडाधिकाऱ्यांच्या टिप्पणीवर डॉ. हेडगेवार मोठ्याने म्हणाले, “आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. ते मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमच्या देशासाठी आम्ही स्वातंत्र्याची मागणी करणे हे कोणत्याही कायद्याच्या किंवा धोरणाच्या विरोधात आहे काय?”

दंडाधिकारी स्मायली यांनी निकाल दिला. ते म्हणाले, “तुमचे संपूर्ण भाषण राजद्रोहाने भरलेले आहे. त्यामुळे पुढील एक वर्ष एकही भाषण करणार नाही असा तुम्हाला शब्द द्यावा लागेल. तुम्ही तसे वचन द्या आणि एक हजार रुपयांची दोन जामीनपत्रे द्या.”

हा निकाल ऐकल्यानंतर डॉ. हेडगेवारांचा आवाज अधिकच चढला. ते म्हणाले, “तुमचा निकाल काहीही असो. पण मी दोषी नाही हे अंतर्मनाने मला सांगितले आहे. आधीच पेटलेल्या आगीत सरकारच्या या दडपशाहीमुळे तेल ओतले जात आहे. परकीय राज्यकर्त्यांना लवकरच त्यांच्या पापांचा पश्चात्ताप करायची वेळ येणार आहे. मला तशी खात्रीच आहे. देवाच्या न्यायावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे हा जामीन मला मंजूर नाही.”

सश्रम कारावासाचे एक वर्ष

डॉ. हेडगेवारांचे निवेदन संपताच दंडाधिकाऱ्यांनी त्यांना एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हसतमुखाने शिक्षेचा स्वीकार करीत डॉक्टरांनी तुरुंगात जाण्याची तयारी केली. ते न्यायालयातून बाहेर पडताच मित्रमंडळी आणि प्रचंड जनसमुदायाचा त्यांना गराडाच पडला. काँग्रेसच्या शहर समितीचे श्री. गोखले आणि अन्य अनेक कॉंग्रेस नेत्यांनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. मग डॉ. हेडगेवार यांनी एक छोटेखानी भाषणच केले. ते म्हणाले, “आपण काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी, प्रसंगी फाशीसाठीही तयार असायला हवे हे खरेच. पण फक्त तुरुंगात गेल्यानेच स्वातंत्र्य मिळेल असे वाटणे चूकीचे आहे. तुरुंगाबाहेर राहूनही आपल्याला देशासाठी खूप काम करू करणे शक्य आहे, हे लक्षात ठेवा. एका वर्षाने मी परतेन तेव्हा देशाची परिस्थिती कशी असेल, हे सांगता येणार नाही. पण स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झालेली असेल याची मला खात्री आहे. आपला देश आता फार काळ परकीय अमलाखाली राहणार नाही. यापुढे त्याला गुलामीत ठेवणे कोणालाही शक्य होणार नाही. मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानून आता एका वर्षाची रजा घेत आहे.” असे म्हणून त्यांनी हात जोडून सर्वांना नमस्कार केला. त्यांच्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि वंदे मातरमचा जयघोष झाला. काँग्रेसचे राष्ट्रवादी नेते आणि त्यांचे पूर्वीपासूनचे क्रांतिकारक मित्र यांनी भारतमाता की जय, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. १९ ऑगस्ट १९२१ रोजी हेडगेवार नागपूर तुरुंगात गेले. त्याच संध्याकाळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी डॉ. हेडगेवार यांचा बैठकीत गौरव केला. त्यांचे धैर्य आणि निर्भिडपणा याचे वर्णन करणारी भावपूर्ण भाषणे झाली. बोलणाऱ्यांमध्ये डॉ. मुंजे, नारायणराव केळकर, श्री. हरकरे आणि विश्वनाथराव केळकर यांचा समावेश होता. भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याप्रति डॉक्टर हेडगेवारांच्या असलेल्या निष्ठेचा गौरव करतानाच त्यांच्या या मोहिमेत सहभागी होऊन ती पुढे नेण्याचे आवाहन या वक्त्यांनी लोकांना केले.

असहकार चळवळीच्या यशासाठी अपरिमित कष्ट

डॉक्टरांचे जवळचे मित्र आणि महाराष्ट्र साप्ताहिकाचे संपादक, गोपाळराव ओगले यांनी अग्रलेखात लिहिले, “स्वयंस्फूर्तीने स्वीकारलेल्या एका वर्षाच्या सश्रम कारावासाची पूर्तता करून डॉ. हेडगेवार हे लवकरच परत येतील आणि नागपुरातील युवकांना मार्गदर्शन करतील. संपूर्ण स्वातंत्र्याचे आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कामाला लागतील.” डॉक्टरांच्या एका वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची बातमी संपूर्ण मध्य प्रांतात वणव्यासारखी पसरली.

विविध ठिकाणी विशेष बैठका झाल्या. डॉ. हेडगेवार यांचा जयघोष, सरकारवर टिका आणि बहिष्कार आदी बाबी असहकार चळवळीचा महत्त्वाचा भागच बनल्या. डॉक्टरांच्या भाषणांनी जशी असहकार चळवळीला चेतना मिळाली तसेच त्यांच्या तुरुंगवासानेही लोक प्रेरित झाले.

एका वर्षात स्वराज्य या गांधीजींच्या घोषणेने संपूर्ण राष्ट्र भारले गेले. आंदोलनाची गती वाढली. डॉक्टरांची अनेक मित्रमंडळी सरकारी आदेश धुडकावून रस्त्यावर उतरली. युवा क्रांतिकारकांच्या या प्रतिसादाने सरकारही अचंबित झाले. गांधीजींनी संपूर्ण अहिंसेसाठी साद घातली. सशस्त्र क्रांतीच्या एका प्रयत्नाचे शिल्पकार असलेल्या हेडगेवारांनी त्याला मनःपूर्वक प्रतिसाद देत अहिंसेची संकल्पना आणि एका वर्षात स्वराज्याचा संदेश घरोघर पोहोचविण्यासाठी काम केले. भविष्यात काही लेखकांना त्यांचे आणि त्यांच्या क्रांतिकारक मित्रांचे हे वागणे पटणार नाही याची कल्पना डॉक्टरांना होती. तरीही चळवळ यशोशिखरावर नेण्याकरिता त्यांनी हरप्रकारे प्रयत्न केले. विशेष म्हणजे, डॉ. हेडगेवार तुरुंगात गेले असले तरी त्यांच्या हजारो युवा क्रांतिकारक मित्रांनी अहिंसक मार्गाने असहकार चळवळीद्वारे  स्वातंत्र्यलढ्याच्या मशालीची ज्योत प्रज्जवलित ठेवली होती.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)

…. पुढे चालू…

Back to top button