Opinion

ही वेळ आहे शिवरायांच्या अनुकरणाची

विपत्सु वज्रधैर्याणां संग्रामे वज्रदेहिनाम्। 

संघो राष्ट्रविपत्काले सद्वज्रकवचायते।।

विपत्तिसमयी पराकाष्ठेचे धैर्यशील वर्तन आणि युद्ध प्रसंगी वज्रासारखे दृढ सहकारी यांबरोबरच राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी राष्ट्रभावना प्रज्वलित करून सुसंघटीत शक्तिच इंद्रवज्रासारखे कवच होऊन  देशरक्षण करते.

एका आदिलशाही सरदाराचा पराक्रमी पुत्र ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास सोपा नव्हता. हा पराक्रम केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर समाजातल्या प्रत्येक घटकाला सुरक्षित सुखसमृद्धीचे जीवनमान लाभावे यासाठीचा सुसंघटीत लढा होता.

देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड निराशा, पारतंत्र्य, गुलामी, अवहेलना, दु:ख आणि संकटांचा भीषण काळोख पसरला होता. या भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे सुपुत्र बाल शिवाजीने पेटविली.

सह्याद्री पर्वतरांगात असलेल्या अजिंक्य, अभेद्य, बुलंद, बेलाग दुर्गाच्या आश्रयाने, गनिमी काव्याच्या युद्ध तं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या भूमीपुत्रांच्या सहभागाने, सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढा आरंभला. गुलामगिरीत पिचलेल्या अन् अतीव निराशेने ग्रासलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वराज्य प्रेरणेने प्रज्वलित करून जिवंत केली. जीवाभावाचे अनेक मित्र, सहकारी त्यांना लाभले. शिवरायांनी अठरापगड जातींच्या तरूणांना एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. न्याय आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देऊन परकीयांच्या जुलमी पद्धती बंद केल्या.

भविष्यातील पिढ्यांच्या ‘अटकेपार’ पोहोचण्याच्या पराक्रमाची पायाभरणी करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे केले.

आजही भारतवर्षावर सांस्कृतिक धार्मिक आक्रमणे होत आहेत. चारही दिशांनी आक्रमक शांतीप्रिय भारताच्या भूमिवर बळजबरीने ताबा मिळवू पहात आहेत तर घरभेदी आक्रमक समाजजीवन अस्वस्थ करू पहात आहेत.

ही वेळ आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या अद्वितीय मंत्राच्या स्मरणाची अन् त्यांच्या अनुकरणाची! जेव्हा हिंदू संघटीत होतो, आपली वज्रमूठ ताकद जेव्हा व्यक्त करतो तेव्हा आक्रमकांना योग्य तो संदेश मिळतो.

उतिष्ठत जाग्रत वरान्

प्राप्य तत् निबोधत।

निशिता क्षुरस्य धारा

दुरत्यया दुर्गं तत् पथः

इति कवयः वदन्ति ॥   (कठोपनिषद – श्लोक १४)

उठा, जागृत व्हा, श्रेष्ठतम महापुरूषांच्या जीवनातील शिकवणींचे ग्रहण करा. धारदार तलवारीच्या पात्यावर चालण्याइतके हे काम कठीण आहे परंतु मातृभूमिप्रेमाने प्रेरीत तरूण हे काम यशस्वीपणे करतील यात शंका नाही!

आजच्या डिजिटल युगात सतत सतर्क राहून विविध पातळीवर होणाऱ्या आक्रमणांना परतवून लावणे आणि भारतवर्षात शांतता, ऐहिक-परमार्थिक प्रगती आणि सुखसमृद्धीचे युग निरंतर सुरू ठेवण्यासाठी जागृत प्रयत्न करणे हे प्रत्येक देशप्रेमी भारतीयाचे कर्तव्य आहे!

– विश्वजित भिडे

विलेपार्ले, मुंबई

Back to top button