Opinion

सुख पर्वताएवढं

    सुख ! सुख ! सुख ! सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस ! सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा ! कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच… सुखाचं नवं रुप… नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं.

मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला ‘अगदी काहीही सोसावं लागू नये’ म्हणून सारी धावाधाव ! एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं… अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं… यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे.

आता दिवाळी आधीच करंजी, होळी आधीच कुठेही पुरणपोळी, मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो. त्या-त्या सणाची, रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडी-मेड !वस्तूंबाबतचं जे, तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद- कधीही, कुठेही दृष्टभेट- आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय- यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले अन् त्याचा गंधही !


तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही ! त्याला हेलिकॉप्टरनं किल्ल्यावर सोडलं, तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा, आणि मधूनच वाहणार्‍या निर्झरांची शीतलता त्याला कळणार कशी? अतिदारिद्र्याने काही पिढ्या संपल्या.. आता, अतिअति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. पैसा नसलेलं दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य ध्यासानं संपवता तरी येत होतं… हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार, असं दिसतंय.. केवळ लग्न झालं अन् मूल झालं म्हणून ‘पालक’ झालो, असं समजणार्‍या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन, – ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर…?


अनेक घरांत ‘मागितलं की लगेच द्या !’ हा एककलमी कार्यक्रम असतो, आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो.


केवळ ‘बाईक’ एवढ्यात नको; अठरा वर्षे पूर्ण होऊ दे,’ असं सांगणार्‍या आजीला सतरा वर्षांचा नातू संपवतो, अशी बातमी येते तेव्हा दरदरुन घामच फुटतो ! गायत्री मंत्र वहीत लिहीत बसलेली ती, मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यांसमोर येते. या आजीनं या नातवासाठी किती वेळा ऊन-ऊन जेवण केलं असेल, त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल, आजारपणात रात्र-रात्र जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल… त्या आजीला जीवे मारताना या सतरा वर्षांच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल?
एवढी हिंस्रता एकाएकी येत नाही. आज नव्वद-पंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे. ना घरात प्रार्थना ! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना ! ना घरात ग्रंथवाचन ! ना पुस्तकाचं समृध्द कपाट ! ना व्याख्यानांना जाणं ! ना उत्तम संगीत ! फक्त संगणक, मोबाईल, व्हॉटसॲप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं, आणि हीसुध्दा नशा कमी म्हणून की काय, मैत्रीची सरहद्द ओलांडणार्‍या मजेनं सर्वनाशाची पूर्वतयारी करणं ! जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही !
जगलो काय अन् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची महासत्ता येणार?
आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची ! संपूर्ण विकसित माणूसपणाची !

आज भ्रष्ट राजकारणी, त्वचेचा बाजार हीच आमची कला मानणारे नट-नट्या, बोगस शिक्षणसम्राट, लबाडीनं पदव्या मिळवणारे डॉक्टर, भेसळबाज व्यापारी हे सर्व करोडपती जरुर आहेत; पण हे सर्व समाधानी, सुखी आहेत का? आज समाजातल्या प्रत्येक जागरुक घटकानं होणार्‍या अपमानाच्या शक्यतेसह नव्या पिढीला सांगायला हवं- मन:शांती म्हणजे काय, सुख म्हणजे काय, समाधान म्हणजे काय?
कुणी तरी टाळी वाजवल्यावर हजर ठेवतं ते उधारउसनवारीचं सुख म्हणजे सुख नाही. पंखातलं बळ संपवून पाखराला आयतं डाळिंब मिळण्यात कुठलं आलंय सुख !

आभाळ पाठीवर घेऊन भरारीची दमछाक मिरवीत धुंडून जे फळ मिळतं तेच फळ ! दुसर्‍यानं आपल्यासाठी ठेवलेलं ते निष्फळ ! मिळण्यातल्या आनंदापेक्षा मिळवण्यातल्या धडपडीतली गंमत कळणं आवश्यक आहे. योग्य वयातच जीवनाचं प्रकाशात्मक उद्दिष्ट निश्चित करणं, ही खरी जीवनसाधना आहे. चाललंय आपलं कटलेल्या पतंगीसारखं ! त्यानं फार तर वयाचे वाढदिवस ‘सेलिब्रेट’ होतील, कर्तृत्वाचे वाढदिवस साजरे होणार नाहीत.


महाकवी कुसुमाग्रजांचा कोलंबस म्हणतो, ‘कोट्यवधी जगतात जिवाणू , जगती अन् मरती जशी ती गवताची पाती !’ खरंच आहे. ट्रेनच्या गर्दीत जा, बाजारात जा, सिनेमाला जा, बसमध्ये चढा, कुठेही जा, लाखो माणसं नुसती गच्च गर्दीने जगतच असतात; पण त्यातले काही चेहरे पोट भरण्याच्या आनंदापलीकडे सुंदर जीवनाची पाऊलवाट चोखाळतात. कुणी प्रयोगशील शेतकरी, कुणी ध्यासवंत शास्त्रज्ञ, कुणी भारतमातेला सार्थक वाटेल असा सैनिक, कुणी मन उगाळून मनं उजळणारा शिक्षक, कुणी अनाथ मुलांसाठी स्वप्नांची आहुती देणारा सेवक…. असाच चेहरा वेधक ठरतो, तो गर्दीत असूनही वेगळा ठरतो.


कोट्यवधी पोटार्थी किड्या-मकोड्यांप्रमाणे जगायचं की वाटेवरची सर्व वादळविजांची आव्हाने झेलत संपत्ती सुखापलीकडची ध्यासाची नक्षत्रमाला उजळायची, हे ठरवणारी जिद्द मनात निराशा फिरकूच देणार नाही.
कोलंबस पुढे म्हणतोच ना, ‘ नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती ! ‘ एक क्षितिज गाठलं की संपलं नाही – दुसरं क्षितिज खुणावू लागतं. तोच जीवनाचा नाविक !
आज जीवनाचे नट हजारो आहेत; जीवनाचे नाविक आज हवे आहेत ! जीवनाचे गरुड हवे आहेत ! उसनवारीचं सुख पुष्कळ झालं; मनगटातून बहरलेलं घामाच्या गंधाचं कर्तृत्व आज हवं आहे !
मुलांना त्यांचा झरा स्वत:हून शोधू द्या ! त्यांचे पंख त्यांना उघडू द्या ! तुमच्या पैशाची हेलिकॉप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील ! उड्डाण तर ज्याचं त्यानंच करायचं असतं ! त्यांच्या जीवनात तहानेची चव मिसळू द्या !
त्यांच्या पंखात आकाशाची साद उसळू द्या ! त्यांच्या मुळातल्या कणखरतेनं – त्यांच्या फांदीवर त्यांचं फूल त्यांच्या गंधानं उमलू द्या !


लेखक—प्रा. प्रवीण दवणे
पुस्तक संदर्भ— सुखपहाट

Back to top button