HinduismPolitics

शिवसेनेला मंदिरांत घंटा वाजवणारा नव्हे, अजान स्पर्धेचे आयोजन करणारा हिंदू हवा – तुषार भोसले

भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या आचार्य तुषार भोसलेंचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई, दि. ३० नोव्हेंबर – शिवसेनेला आता मंदिरांत घंटा वाजवणारा हिंदु नको आहे, तर अजान स्पर्धेचे आयोजन करणारा हिंदु हवा आहे. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतिपाठातून मनःशांती मिळत नाही, ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून, भजन किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की हिंदुत्व हे काय धोतर आहे का सोडून द्यायला ? पण उद्धवजी धोतर तरी कमरेभोवती घट्ट आवळलेले असते पण तुमचे हिंदुत्व हे खांद्यावरच्या उपरण्यासारखे होते, जे तुम्ही एक वर्षापूर्वीच काढून बाजूला ठेऊन दिले, अशा शब्दांत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेवर सडकून टिका केली आहे.

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असे मनाला वाटत राहते, अशा शब्दांत अजानचे कौतुक केले. सकपाळ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसेनेने शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेबाबत सकपाळ म्हणाले की, ‘शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशी प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसे दिली जातील. सगळेच धर्मग्रंथ मानवता आणि शांततेची शिकवण देतात. अजानचा कालावधी फार कमी वेळ असतो. त्यामुळे अजानच्या आवाजाबद्दल अडचण वाटण्याचे काहीच कारण नाही. आम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजासाठी काम करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सर्वांना सोबत घेऊन काम करत आहेत.

शिवसेनेच्या या स्पर्धेच्या कल्पनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. सत्तास्थापनेनंतर शिवसेनेने आपला हिंदुत्वाचा अजेंडा दूर ठेवून धर्मनिरपेक्षतेचा बुरखा चढवला आहे. अजानची स्पर्धा ही त्याच भावनेतून आयोजित करण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

**

Back to top button