NewsSeva

सामाजिक ‘प्रेरणा’ पुन्हा पुन्हा तपासाव्या लागतील!

आनंदवनातील डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या एकूणच सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येकास आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणारी घटना म्हणावी लागेल. खरंतर सामाजिक कार्य म्हणजे आत्तापर्यंत सर्वात सुरक्षित कार्य समजले जायचे. पण अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रात देखील आता काळाच्या ओघात ताण-तणाव, स्पर्धा, इर्षा मत्सर अशा सामाजिक कार्यासाठी अत्यंत हानीकारक गोष्टींनी शिरकाव केल्याचे वास्तव समोर आले आहे. आपल्या भारतीय चिंतनात मनुष्य एखादे काम का करतो याबाबत तीन प्रेरणा सांगितल्या आहेत. अर्थप्राप्ती, कुटुंबाचे हित आणि प्रतिष्ठा या प्रेरणा समोर ठेवूनच मनुष्य कुठलेही काम करत असतो. पण आपल्याकडे आणखी एक प्रेरणा सांगितली आहे. ही प्रेरणा कुठे लिखित स्वरूपात जरी नसली तरी आपल्या साधुसंतांनी, महापुरुषांनी आपल्या कृतीतून या प्रेरणेचे दर्शन समाजाला घडवलेले आहे.
ही प्रेरणा कुठली आहे?


ही प्रेरणा स्पष्ट होण्यासाठी राजा रंतिदेवचा एक श्लोक नेहमी उद्धृत केला जातो.

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् ।
कामये दुःखताप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् |

या श्लोकाचा भावार्थ असा आहे की, मला राज्य,स्वर्ग किंवा पुनर्जन्म याची इच्छा नाही तर दुःखितांचे दुःख दूर झाले पाहिजेत एवढीच माझी इच्छा आहे.

आपल्या देशातील साधुसंत, महापुरुष यांचे जीवनचरित्र आपण पाहिले तर जवळपास सर्वांची प्रेरणा हीच राहिलेली आहे असे दिसते. मग ते तळमळणार्‍या गाढवाला गंगेचे पाणी पाजणारे एकनाथ असोत वा कुठल्याही बुवाबाजीला स्थान न देता झाडू घेऊन ग्राम स्वच्छतेची प्रेरणा देणारे गाडगेबाबा असोत किंवा अगदी अलीकडच्या काळात प्रत्येक गाव स्वावलंबी झाला पाहिजे हे ध्येय घेऊन आयुष्य वेचलेले नानाजी देशमुख यांच्यासारखे ‘ भारतरत्न ‘ असोत. या सर्वांचे स्मरण आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत ‘कामये दुःखताप्तानां ‘ ही आपली प्रेरणा कायम जागृत ठेवली होती.

या सर्व प्रेरणादायी समाजसुधारकांमध्ये बाबा आमटे यांचे नाव देखील गौरवाने आपल्याला घ्यावेच लागेल. ज्या काळात कुष्ठरोग्यांचे दर्शन घडणे म्हणजे पूर्वजन्मीचे पाप असल्याची भावना होती, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरविले. त्यांची या कार्याप्रती असलेली तळमळ, निष्ठा, कामाचा उरक आणि वैचारिक झेप या आधारावर त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आनंदवन उभे केले. या प्रकल्पाला कल्पनांचे नवे नवे आयाम देत या प्रकल्पाचा एक खूप मोठा डोलारा बाबांनी उभा केला. सुदैवाने सरकारने आणि समाजाने देखील त्यांच्या या कार्याला भरभरून सहाय्य केले. हळूहळू सोमनाथ, हेमलकसा यासारखे देखील काही प्रकल्प बाबांच्या प्रेरणेने सुरू झाले. या साऱ्या प्रकल्पांनी शब्दश: हजारो तरुणांना सामाजिक कार्याची प्रेरणा प्राप्त करून दिली.एका अर्थाने समाजाच्या दृष्टीने ही ‘प्रकाशाची बेटं’च होती. गेल्या काही वर्षात तर सामाजिक कार्याची दीक्षा प्राप्त करण्याचे हे एका अर्थाने विद्यापीठच होऊन गेले होते.

प्रसारमाध्यमांनी देखील आमटे कुटुंबियांच्या या प्रकल्पांना इतके उचलून धरले की,प्रथमच अशा सामाजिक प्रकल्पांना एक ग्लॅमर प्राप्त झाले. या ग्लॅमरचा फायदा देखील या प्रकल्पांना झाला, हे जरी खरे असले तरी देखील एखाद्या सामाजिक संस्थेला अत्यंत घातक समजली जाते अशी अनावश्‍यक प्रसिद्धी देखील या प्रकल्पांना प्राप्त झाली. त्यामुळे बाबांच्या निधनानंतर हे ‘ग्लॅमर ‘ टिकवून ठेवण्याचे एक खूप मोठे आव्हान आमटे कुटुंबियांसमोर उभे राहिले. प्रकल्प चालविण्याचा अवाढव्य वाढलेला खर्च, बाबांच्या निधनानंतर कमी झालेला देणग्यांचा ओघ, त्यातच कौटुंबिक वाद, प्रकल्पांवर वर्चस्व टिकवण्यासाठी चाललेली धडपड, ईर्षा, द्वेष, मत्सर असे अनेक दुर्गुण या संस्थेत शिरल्याने हजारो तरुणांना प्रेरणा देणारे आनंदवन पाहता-पाहता वादाच्या भोवऱ्यात अडकले. बाबा आमटे असेपर्यंत सर्व सुरळीत चालू होते. मात्र अखेरच्या काळात जेव्हा तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील त्यांना भेटण्यासाठी आनंदवनात गेले होते, तेव्हा उद्विग्न होऊन बाबांनी ‘नुसत्या शुभेच्छा नकोत, तर आनंदवन चालवण्यासाठी पैसा हवा आहे’ अशी मागणी केली होती. त्यावेळीच खरेतर आनंदवनमधील आर्थिक ओढाताण लक्षात आली होती. बाबांच्या निधनानंतर तर चित्र खूपच बदलले. बाबांनी सुरू केलेला एक प्रकल्प त्यांच्याच प्रेरणेने सुरू झालेल्या दुसऱ्या प्रकल्पाशी स्पर्धा करतोय हे चित्रच खुप अस्वस्थ करणारे होते.

इतक्या मोठ्या आणि आणि प्रेरणादायी अशा प्रकल्पाबाबत असे का झाले असावे?

गेल्या काही वर्षांमध्ये एनजीओ नावाचे एक खूप मोठे कल्चर भारतात उदयास आलेले आहे. त्यामुळे सामाजिक कार्याच्या व्रताची जागा आता व्यवसायाने घेतली आहे. देणग्यासाठी वणवण भटकणाऱ्या संस्थांची उलाढाल आता कोटींमध्ये पोहोचली आहे. कोटीने येणाऱ्या परदेशी देणग्या,कॉर्पोरेट ऑफिस, दिमतीला आलिशान गाड्या असं एक वेगळं कॉर्पोरेट कल्चर एनजीओ मध्ये निर्माण झाले आहे. समाजाला काय आवश्यक आहे यापेक्षा फंडिंग एजन्सीला कुठले काम अपेक्षित आहे, त्यावर सामाजिक कार्याची दिशा ठरवली जाऊ लागली आहे. ‘ आधी फंड मग समस्या शोध ‘ असे एक नवीन समीकरण या सगळ्या एनजीओ कल्चरमध्ये दिसून येत आहे. त्यातूनच अक्षरश: हजारो एनजीओज उदयास आल्या आहेत. हजारो एनजीओज, त्यांचे लाखो कार्यकर्ते आणि कोट्यावधीचे फंडिंग खर्च होऊन देखील समाजाचे प्रश्न मात्र आहे तिथेच आहेत. दुर्दैवाने या संस्थांचे प्राधान्यक्रम नक्की असल्याने ‘ समाज ‘ हा घटक या सर्वांच्या यादीत कितीतरी खालच्या क्रमांकावर आहे. सामाजिक कार्याच्या, सामाजिक संस्थांच्या प्रेरणाच अशा जर अशुद्ध असतील तर त्या सगळ्या कार्यातून समाज बांधणीचे, समाज घडणीचे कुठले भरीव कार्य आपण अपेक्षित करू शकतो ?

आनंदवन देखील अशाच कल्चरला बळी पडले आहे का हा शोधाचा विषय आहे. समाजावरील अत्यंत निर्मळ भक्ती आणि तळमळीपायी बाबा आमटे व साधना आमटे यांनी आनंदवन सुरू केले. त्यांच्या पुढील पिढीने देखील बाबांचा हा वारसा चालवला आहे. मात्र वारसा चालवत असताना ज्या प्रेरणेने त्यांनी हे काम सुरू केले ती प्रेरणा त्यांच्या पुढील पिढीने स्वीकारली का, हा आनंदवनातील मागच्या काही घडामोडी पाहता निर्माण झालेला खूप मोठा प्रश्न आहे.

एकंदरीतच समाजकार्यात अनेक चढ-उतार असतात, टक्केटोणपे खावे लागतात. त्यामुळेच ‘लष्कराची भाकरी’ भाजण्याची उपमा दिलेल्या समाजकार्याला आपल्या संस्कृतीत, परंपरेत एक वेगळी प्रतिष्ठा आहे. त्यामुळेच कदाचित सामाजिक कार्याच्या बाबतीत ‘व्रत घेणे’ असा एक शब्द प्रयोग केला केला असावा. या सगळ्या कार्यात अत्यंत महत्त्वाचा कुठला घटक असेल तर तो म्हणजे सामाजिक कार्याची प्रेरणा. आपल्या कार्याची प्रेरणा विशुद्ध असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्ता किंवा संस्था ठामपणे उभे राहू शकतात. मात्र कार्याची प्रेरणा क्षीण होत गेली की हळूहळू या संस्थेचे किंवा कार्यकर्त्याचे एनजीओकरण होण्यास वेळ लागत नाही. कारण एनजीओ कल्चरमध्ये प्रेरणा या शब्दाला फारसा अर्थ नाहीये.

मात्र अत्यंत घातक अशा या कल्चरपायी डॉ. शीतलसारख्या समाजासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या एका धडपड्या कार्यकर्तीचा अंत व्हावा हे दुर्दैव आहे. प्रसारमाध्यमांनी देखील सामाजिक कार्यकर्त्यांची व सामाजिक संस्थांची प्रतिमा निर्माण करताना भान बाळगले पाहिजे असे या निमित्ताने वाटते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या व संस्थेच्या उपक्रमांना प्रसिद्धी देताना त्यांची आपण ‘ प्रत्यक्षाहून ‘ ही ‘उत्कट ‘ प्रतिमा तर निर्माण करत नाही ना ही काळजी या माध्यमांनी घेण्याची आवश्यकता आहे. अशी समंजस भूमिका घेणे हे माध्यमांनी देखील आपले एक सामाजिक दायित्व मानले पाहिजे.

गेल्या काही वर्षांपासून आनंदवनातील अंतर्गत ‘ द्वंद्व ‘ लढत असलेल्या डॉ. शीतल आमटे यांनी ‘ शांतते’चा मार्ग स्वीकारला खरा पण..

प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने व सामाजिक संस्थेने आपल्या कार्याच्या प्रेरणा पुन्हा पुन्हा तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. आपली संस्था, आपला विचार, कार्यपद्धती, कार्याचा आवाका, विश्वासार्हता, सामूहिक निर्णयप्रक्रिया, लोकसहभाग, आर्थिक व्यवहार याबाबत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सतत दक्ष असले पाहिजे, असा खूप मोठा धडा त्या देऊन गेल्या आहेत.

डॉ. शीतलच्या मृत्यूच्या धक्क्यातून संपूर्ण ‘आनंदवन ‘ आणि आमटे परिवार लवकरात लवकर बाहेर येवो ही सदिच्छा. आनंदवन काय, हेमलकसा काय किंवा सोमनाथ काय ही प्रकाशाची बेटं आहेत.
…. आणि या बेटांवर अंधार पडणे कोणालाच परवडणारे नाही!!

Back to top button