NewsSevaकोकण प्रान्त

सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा ..

शीर्षक वाचून आपणास आश्यर्य वाटले असेल पण हे खरंय. आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराचाच सन्मान झाला आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री दासबोधाचे निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना जाहीर झाला आहे.

दासबोध निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (appasaheb dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथे या पुरस्काराची घोषणा केली. सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका सामान्यातील असामान्य निरुपणकाराचा; पद्मभूषण पुरस्काराच्या तोडीचा, मानाचा “महाराष्ट्र भूषण”(maharastra bhushan) पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल राज्य सरकारचे हार्द्दिक आभार आणि अभिनंदन..

एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी नानासाहेब धर्माधिकारी (nanasaheb dharmadhikari) यांना २००८ मध्ये मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (maharashtra bhushan award) सन्मानित करण्यात आले होते. आपल्या लौकिक सामाजिक बांधिलकीसाठी धर्माधिकारी कुटुंब ओळखलं जातं. धार्मिक तसंच सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमी समाजप्रबोधन करत असतात. त्यासाठीच हा पुरस्कार देण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

“महाराष्ट्र भूषण” पुरस्कारामुळे माझ्यावर जबाबदारी वाढली आहे, अशी विनम्र प्रतिक्रिया यावेळी अप्पासाहेबांनी दिली.

आप्पासाहेबांचे सामाजिक कार्य :-

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजप्रबोधनाचे बाळकडू वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळाले. समाजप्रबोधनाला मानवी उत्थानाची जोड देण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केले.

श्री दासबोधाच्या(shree dasbodh) माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करतात. त्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा घेतलाय, वडील नानासाहेब धर्माधिकारीही एक उत्तम निरूपणकार होते. १९४३ पासून त्यांनी दासबोधाच्या निरूपणाची सुरुवात केली.

आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य श्री आप्पासाहेब करताहेत. श्रवण बैठकांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं कार्य धर्माधिकारी कुटूंब करत आहे. गेल्या ३० वर्षापासून ते निरुपण करत आहेत. त्यांना चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

श्री बैठक:

लोकांना अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी, समाज प्रबोधनासाठी लोकांना एकत्र आणून; मग त्यांना अध्यात्म समजावून सांगण्यासाठी सुरूवात झाली “श्री बैठकी”ची. म्हणजे काय, तर आठवड्यातला एक दिवस बरेच लोक एकत्र येतात आणि ठरलेली व्यक्ती श्री दासबोधाचे निरूपण (विवेचन) करते. आता हे निरुपण म्हणजे नक्की काय असतं? तर श्री दासबोधा विषयी आपलं मत, आपले विचार हे समोरच्या व्यक्तीर्यंत पोहोचवणं म्हणजेच निरूपण असतं.

सुरूवातीला या बैठकांसाठी वयस्क महिला आणि पुरूष यांनाच येण्यास परवानगी होती. काही काळाने मग लहान वयापासूनच मुलांच्या कानावर चांगले विचार पडावे, त्यांच्यावर संस्कार व्हावे म्हणून बाल आणि बालिकांनाही या बैठकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. ही तेव्हा सुरू झालेली श्री बैठक आज मोठ्या पातळीवर यशस्वी ठरतेय.
श्री बैठकीला उपस्थित राहणाऱ्या मंडळींना श्री सेवक म्हणतात.

भारतातच नाही तर भारताव्यतिरिक्त युएई, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, इराण यासारख्या अनेक देशात अशा पद्धतीच्या श्री बैठका पार पडत असतात. आप्पासाहेबांनी दासबोधाचं केलेलं निरुपण हे आता मराठीशिवाय हिंदी, तामिळ, कन्नड आणि इंग्रजी भाषेतूनही केलं जातं.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य प्रेरणादायी आहे. गेली अनेक वर्षे व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता आदी क्षेत्रात त्यांचे काम अव्याहतपणे सुरु आहे. त्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला असून, त्यामुळे या पुरस्काराची उंची आणखी वाढणार आहे.

बाल संस्कार वर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्यांनी हाती घेतले. वनवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्य श्री सदस्यांनी केले आहे. स्वच्छतेचे त्यांचे कार्य बगुन महाराष्ट्र शासनाने आप्पासाहेबांची स्वच्छतादूत म्हणून देखील निवड केली होती. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही आप्पासाहेबानीं समाजाला दिला आहे. त्यांच्या या कार्याला आता त्यांचा मुलगा सचिनदादा धर्माधिकारी पुढे नेत आहे. गेल्या ८ दशकांपासून त्यांचं कुटूंब हे समाज प्रबोधनाचं काम करत आहे. विशेष म्हणजे श्री बैठकांच्या संप्रदायात एक पैसा देखील देणगी किंवा अनुदान म्हणून कोणाकडून स्वीकारले जात नाही.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन, विज्ञान, समाजसेवा आदी क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो. २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक व त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातील योग्य अधिकारी व्यक्तीला यावर्षी हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचेही कौतुक व अभिनंदन करावेसे वाटते.

श्री दासबोधाचे निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानाचा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार मिळाल्याबद्दल विश्व संवाद केंद्र परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन !

जय सद्गुरू…

जय जय रघुवीर समर्थ…

https://bolbhidu.com/aappasaheb-dharmadhikari-awarded-with-maharashtra-bhushann/

https://www.timesnowmarathi.com/amp/maharashtra-news/video/maharashtra-government-announce-maharashtra-bhushan-puraskar-to-appasaheb-dharmadhikari-watch-video/448522

Back to top button