CultureOpinion

हे नववर्ष … आमचे नाही … ग्रेगोरियनचे

येत्या रविवारी १ जानेवारी २०२३… अर्थात नववर्ष. आपल्या सगळ्यांच्या घराच्या भिंतीवर २०२२ चे जुने कॅलेंडर जाऊन २०२३ या नववर्षाचे नवीन कॅलेंडर झळकणार आहे.

दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापासून आपण “भिंतींवरी कालनिर्णय असावे” ही जाहिरात ऐकत आणि बघत असतो.

मराठी सह अन्य भाषिकांमध्ये आज दिनदर्शिका (Calender) म्हणजे कालनिर्णय हे समीकरण दृढ झाले आहे.

आज जी दिनदर्शिका अर्थात कॅलेंडर आपण वापरतो ते मुळात “ग्रेगोरियन” कॅलेंडर(gregorian calendar) आहे. आजमितीस हे कॅलेंडर संपूर्ण जगाने स्वीकारलेले आहे. अगदी नासा (NASA) पासून, सर्व विमान कंपन्या ते आफ्रिका खंडातील सुदूर खेड्यातील एखाद्या झोपडीत देखील हेच कॅलेंडर वापरले जाते. ग्रेगोरियन कालगणना दीर्घकाळापासून जगाने मान्य केली आहे.

काय आहे ग्रेगोरियन कॅलेंडर?

ह्या कालगणनेची मूळ कल्पना ॲलोयसियस लिलीयस या इटालियन गणिती व खगोलशास्त्रज्ञाची. १५७६ साली तो मृत्यू पावला. त्याचा भाऊ अँटोनीओ हा देखील गणिती व खगोलशास्त्रज्ञ होता. अँटोनीओने आपल्या भावाची, लिलीयसची कालगणनेची संकल्पना पोप समोर मांडली. पोप हे त्या काळातील एक धर्मसत्ता व युरोपातील विविध राजसत्तांवर अंकुश ठेवणारे खूप मोठे प्रस्थ होते. तात्कालीन पोप १३ वा “ग्रेगोरी” याने फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी या कालगणनेला अधिकृत मान्यता दिली. त्यामुळे ही ग्रेगोरियन कालगणना म्हणून ओळखली जाते.

ग्रेगोरियन (gregorian) कालगणना मुळात त्याआधी वापरण्यात येणाऱ्या “ज्युलियन” दिनदर्शिकेवर आधारित आहे. मात्र दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२ च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली. ज्युलियन कॅलेंडर मधील अनेक त्रुटी बऱ्याच अंशी दूर करून ग्रेगोरियन कॅलेंडर तयार करण्यात आले होते. पोपच्या फतव्यामुळे या कालगणनेला युरोपात चांगल्यापैकी स्विकारार्हता प्राप्त झाली. पुढील काळात युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड, डेन्मार्क आदी देशांनी जगात विविध ठिकाणी आपली राजसत्ता स्थापन केल्यामुळे, ग्रेगोरियन कॅलेंडर त्या त्या वसाहतींमध्ये देखील पोचले आणि स्वीकारले गेले.

आज सबंध जगाने ही कालगणना स्वीकारलेली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास व व्यवहारात देखील एक सुसूत्रता आलेली आहे हे मान्य करावेच लागेल.

ग्रेगोरियन कालगणनेचा आरंभ बिंदू प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म मानण्यात आला आहे. म्हणून त्याचा उल्लेख आपण इसवी सन असा करतो.

ग्रेगोरियन कॅलेंडरचे (gregorian calendar)मुख्य एकक “दिवस” आहे. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे १ भ्रमण म्हणजे १ वर्ष. ते ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटांचे असते, परंतु ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे १ वर्ष ३६५ दिवसांचे असल्यामुळे, ४ वर्षांचा ६ तास ९ मिनिटांचा अधिकचा कालावधी एकत्र करून प्रत्येक ४थे वर्ष ३६६ दिवसांचे असते. याला लीप वर्ष (Leap Year) म्हणतात. लीप ईयरच्या वर्षी फेब्रुवारीचे २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात.

सूर्यावर आधारित कालगणनेचे कालचक्र दर १,४६,०९७ दिवसांनी पूर्ण होते. हे ४०० वर्षांमध्ये विभागलेले आहे आणि २०,८७१ आठवड्यात विभागलेले आहे. १ आठवडा ७ दिवसांचा असतो. या ४०० वर्षांत ३०३ वर्षे सामान्य वर्षे आहेत अर्थात ज्यात ३६५ दिवस आहेत आणि ९७ लीप वर्षे आहेत ज्यात ३६६ दिवस आहेत. अशा प्रकारे १ वर्षात ३६५ दिवस ५ तास ४९ मिनिटे १२ सेकंद असतात.

ज्या वर्षाला ४ ने निःशेष भाग जातो ते लीप वर्ष असते. अपवाद १०० ने निःशेष भाग जाणारे वर्ष. उदा. १७००, १८००, १९०० ही वर्षे ४ ने नि:शेष भाग जाणारी असली तरी १०० च्या पटीत असल्यामुळे लीप वर्षे नव्हती. या नियमाला अपवाद ४०० ने निःशेष भाग जाणारी वर्षे. उदा. २००० हे वर्ष ४०० ने निःशेष भाग जात असल्यामुळे लीप वर्ष होते.

पुढील काळात २१०० हे वर्ष लीप वर्ष नसेल मात्र २४०० हे वर्ष लीप वर्ष असेल.

अशाप्रकारे ग्रेगोरियन कालगणनेत लीप वर्षाच्या योजनेमुळे खूपच अचूकता आली आहे.

ग्रेगोरियन कालगणनेचे १ वर्ष पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार अचूक कालगणनेपेक्षा सरासरी २६.३ सेकंद अधिकच आहे. म्हणजे ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शतायुषी मानली जाणारी व्यक्ती आपल्या १००व्या वर्षी पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार वास्तविक १०० वर्षे आणि ४३.८३३३३ मिनिटे जगलेली असेल. मात्र ४०० वर्षांच्या तुलनेत ही त्रुटी तशी नगण्यच म्हणावी लागेल.

ग्रेगोरियन कॅलेंडर हे पूर्णपणे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणावर आधारलेली आहे. मात्र भारतीय पंचांगात पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणाबरोबरच चंद्राच्या पृथ्वी भोवतीच्या भ्रमणाचेही संतुलन साधले आहे. त्यामुळे कालगणनेत येणारा फरक हा दर ३ वर्षांनी “अधिक मास” रूपाने भरून काढला जातो. असो. तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.

१ जानेवारी रोजी २०२३ वर्षाचा पहिला दिवस असणार आहे. नेहमीप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सबंध जगात धामधूम सुरू असेल. जगराहाटीमुळे “कालाय तस्मै नमः” म्हणत हे नवीन वर्ष आपल्यालाही मान्य करावे लागेल. अन्यथा जगात अनेक कालगणना आहेत.

जसे की आपल्याकडे युगाब्द (५१२४ चालू) ही सर्वात जुनी कालगणना आहे.

शालिवाहन शके (१९४४ चालू) व विक्रमादित्य शके (२०७९ चालू) अशा दोन कालगणना आहेत. यातील विक्रमादित्य शके ही ग्रेगोरियन पेक्षा जुनी कालगणना आहे. मात्र आपल्याकडील बहुतेक सर्व कालगणनांमध्ये गुढीपाडवा हेच नवीन वर्ष मानले गेले आहे. दिवाळीचा पाडवा हा लक्ष्मीपूजनाला जोडून व्यापारी वर्गाची आर्थिक नववर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो.

दक्षिण पूर्व आशियात काही देशांमध्ये, जसे की थायलंडमध्ये बौद्ध कालगणना (२५६५ चालू) मानली जाते. ही कालगणना देखील ग्रेगोरियन कालगणनेपेक्षा जुनी आहे

इजरायल हा देश आपल्या यहुदी पंचांगाच्या तिथीनुसार, अयार महिन्याच्या ५ व्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी तो ग्रेगोरियन कॅलेंडरच्या वेगवेगळ्या तारखांना येतो. मात्र साधारणतः तो मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात येतो.

इस्लामी कालगणना ही पूर्णतः चांद्रमासावर आधारित असल्यामुळे दरवर्षी ईद ही मागे मागे सरकताना आपल्याला दिसते. एका अर्थी ही कालगणना अत्यंत सदोष अशी मानली पाहिजे.

जगातील सर्वात जुनी कालगणना अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत वर्षात; २०२३ च्या नववर्षाचे स्वागत करताना आपले अंतर्मन कायम सांगत राहील… हे माझे नवीन वर्ष नाही… माझे नवीन वर्ष “गुढीपाडवा”च.

Back to top button