News

वर्षपूर्ती..  महत्वाकांक्षेची..  भाग २

रशिया-युक्रेन युद्ध आणि भारताची “इंडिया फर्स्ट” नीती

रशिया-युक्रेन युद्धाबाबत (russia-ukraine war anniversary )भारताने सुरुवातीपासूनच तटस्थ भूमिका घेतली आहे. “सध्याचे युग हे युद्धाचे नाही” , असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते. दोन्ही देशांनी शांतता राखावी, चर्चेतून प्रश्न सोडवावा, असे आवाहन भारताच्या वतीने वारंवार करण्यात आले आहे. तसेच अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता या काळात भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरुच ठेवली आहे. डिसेंबर २०२२ पासून भारताने रशियाकडून कच्चे तेल आयातीमध्ये मोठी वाढ केली आहे.

रशिया-युक्रेन आणि भारताची परराष्ट्रनीती :-

हे युद्ध भारतापासून दूरवर चालू असले, तरी भारताच्या परराष्ट्र धोरणावर (Indian Foreign Policy) व अंतर्गत व्यवहारावर त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. रशिया आणि भारत यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. रशियाने युक्रेनवर काही कारण नसताना आक्रमण केले, ही गोष्ट उघड आहे. आणि अशा वेळी भारताने रशियाचा निषेध करायला पाहिजे, पण भारत तसे करू शकत नाही. याचे उत्तर परराष्ट्रीय धोरणातील पहिल्या सिद्धान्तात सापडते.

परराष्ट्र धोरणाचा पहिला सिद्धान्त राष्ट्रहित प्रथम, लोकशाही देशावर आक्रमण करणे निषेधार्ह आहे आणि राष्ट्रहिताचा सिद्धान्त सांगतो की असे जरी असले, तरीही त्याचा निषेध करता येणार नाही. निषेध न करण्यात भारताचे राष्ट्रहित कसे आहे, हे समजून घ्यायला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाने नेहमीच भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. युनोच्या सुरक्षा परिषदेत अनेक वेळा काश्मीरचा विषय येतो. भारताला घेरण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी रशियाने नेहमीच नकाराधिकाराचा वापर करून भारताविरुद्ध कोणताही ठराव सुरक्षा परिषदेत संमत होऊ दिलेला नाही. १९७१ च्या युद्धातही अमेरिका(usa) इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली. रशिया ठामपणे भारताच्या बाजूने उभा राहिला. तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते निक्सन. त्यांनी हिंदी महासागरात सातवे आरमार पाठविले, त्यात एंटरप्राइज नावाचे अण्वस्त्रधारी विमानवाहू युद्धजहाज होते. रशियानेदेखील अमेरिकेच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून आपले आरमार हिंदी महासागरात आणले. अशा रशियाविरुद्ध राष्ट्रहिताचा विचार करता निषेधाच्या ठरावाच्या बाजूने मतदान करणे आत्मघातकी ठरले असते.

भारताची इंधन मुत्सद्देगिरी

रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये भडका उडाल्याने तेलआयातदार देशांचे अर्थकारण कोलमडून पडले. तथापि, भारताने ‘इंधन मुत्सद्देगिरी’चा वापर करत यातून मार्ग काढला. त्यानुसार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, अमेरिकेने आर्थिक निर्बंध घातलेले असतानाही रशियाकडून तेलाची आयात सुरू केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रशियाकडून भारत प्रतिबॅरल ४० डॉलर्स कमी दराने हे तेल विकत घेत आहे. मे महिन्यामध्ये रशिया हा भारताचा सर्वांत मोठा तेलपुरवठादार देश बनला. यावर आक्षेप घेणार्‍या युरोपीय देशांना आणि पाश्चिमात्य माध्यमांना भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचे हे प्रत्यंतर आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारताच्या या तेलआयातीचे कौतुक केले आहे. अमेरिका आणि रशिया या दोघांशी असणार्‍या संबंधांमध्ये समतोल साधणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी म्हटले. आज ऑस्ट्रेलिया, जपानसह अमेरिकेच्या सर्व मित्र देशांनी रशियाकडून तेलआयात थांबवली आहे. मात्र भारताने ही आयात सुरू ठेवली आहे. क्वाडच्या गटामध्ये भारत हा एकमेव देश आहे, जो रशियावर टाकलेल्या आर्थिक निर्बंधांमध्ये सहभागी झालेला नाहीये. भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाची ही पोचपावती आहे.

रशिया-युक्रेन युद्धानंतरच्या काळात तेलाच्या किमती वाढल्यामुळे श्रीलंकेत २०० रुपये प्रतिलिटर इतका पेट्रोलचा भाव झाला, तर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातही तशीच स्थिती पाहायला मिळाली. या वाढत्या किमतींमुळे राजकीय अस्थिरताही दिसून आली. जागतिक बाजारात तेलाच्या किमती १३० डॉलर्सवर पोहोचल्या, तेव्हा भारतात देशांतर्गत बाजारात पेट्रोलचे भाव १६० रुपयांवर जातील अशी अपेक्षा होती. असे न होता उलट केंद्र सरकारने त्यावरील अबकारी कर कमी करून किमती नियंत्रणात राहिल्या. याच्या मुळाशी रशियाकडून स्वस्तात होणारी तेलआयात आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भारताच्या उत्तम ‘इंधन मुत्सद्देगिरी’चा हा परिणाम म्हणावा लागेल.

इंडिया फर्स्ट (india first)

‘इंडिया फर्स्ट’ हे भारताचे धोरण आहे. अमेरिका किंवा युरोपीय देश अशी भूमिका घेत असतील तर तर भारताने ती घेण्यात गैर काय? असा सवाल भारताने जागतिक समुदायाला विचारला आहे. एस. जयशंकर यांना विचारले गेले की, “तुम्ही अमेरिकेच्या पक्षात आहात की रशियाच्या?” तेव्हा त्यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या हितसंबंधांच्या पक्षात आहोत!” हा आत्मविश्वास भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव दर्शवणारा आहे.

या गोष्टी हेच दर्शवतात की, रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतलेली भूमिका ही अप्रत्यक्षपणे रशियाधार्जिणी असतानाही भारत कुठेही डगमगला नाहीये अथवा परराष्ट्र धोरणावर त्याचा परिणाम झालेला नाही. भारतीय परराष्ट्र धोरणातील हा एक महत्त्वाचा बदल आहे. भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाची आणि वाढत्या प्रभावाची ही नांदी आहे, असे म्हणावे लागेल.

https://www.mahamtb.com/Encyc/2022/11/15/article-on-Russia-Ukraine-War.html

Back to top button