2007 पासून 9 ऑगस्ट हा जागतिक मूलनिवासी दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे. यामागे कोणताही प्रामाणिक हेतू नाही.भारतात 9 ऑगस्ट म्हणजे ‘चले जाव’ ऑगस्ट क़्रांती दिन म्हणून प्रसिध्द आहे.
“जागतिक हिताच्या दृष्टीने आम्ही यावर सही करीत आहोत भारतात राहणारी १४० कोटी जनता मूलनिवासीच आहे कोणीही बाहेरून आलेले नाही असे भारताने UNO चार्टरवर सही करताना नमूद केले आहे”.देशाच्या अखंडत्वाला, सार्वभौमत्वाला, सांस्कृतिक मूळ परंपरेलाच जर छेद देणारे नवीन दिवस अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अथवा युनोने जरी जाहीर केले असले, तरी ते दिवस भारतात साजरे करताना त्यामागील षड्यंत्र समजून घेतले पाहिजे.
खुल्या जागतिक धोरणाने, व्यावसायिक नफेखोरीच्या दृष्टीने, लोकांच्या – विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या भावनेला हात घालत काही ‘डे’ज (Rose day, Friendship day, Valentine’s day, Father-Mother day) घुसडले गेले आणि महाविद्यालय परिसर व युवकांच्या लेखी अवाजवी महत्त्व देऊन प्रथम सर्जनात्मकपणे व नंतर नंतर अगदी हिडीस पध्दतीने साजरे होऊ लागले आहेत.
गेल्या काही वर्षांत भारतातील जनजातीय समाजाच्या भोळेपणाचा, वर्तमान शैक्षणिक अज्ञानाचा, त्यांच्या एकत्रित समूह पध्दतीने राहण्याचा, अस्मितेचा व भावनेचा फायदा घेऊन भारतातील काही विघ्नसंतोषी विचारधारा, त्यांचे कार्यकर्ते, भारत कधी एक होऊ नये म्हणून कुटिल कार्यरत संस्था, पंथ-जातपातींमध्ये भेद उत्पन्न करणारी यंत्रणा आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या साहाय्याने 9 ऑगस्ट हा ‘जागतिक मूलनिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करीत आहे आणि अधिक जोमाने साजरा करण्यासाठी जनजातीय समाजाला-विशेषतः युवकांना उद्युक्त (प्रोत्साहित) करीत आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत करून तो प्रस्थापित करण्यास भाग पाडत आहे.
भारत भारतीयांसह इंग्रजांचा गुलाम झाला अन्य देशात मात्र मूळ लोकांना नामशेष करून नवीन वसाहती म्हणूनच नावारूपाला आल्या.. हाच मूलभूत फरक मूलनिवासींच्य जागतिक अनेक व्याख्यांमध्ये गृहीत धरलेला आहे.
मूलनिवासींचा काही प्रदेश आणि जनजातीय समाज आजही निश्चितपणे सांगता येतो.उदा. आफ्रिकेतील फ्रेंच सोमालिया, ब्रिटिश सोमालिया, लॅटिन अमेरिकेतील फ्रेंच गयाना, डच गयाना, अमेरिकेतील रेड इंडियन, नेटिव्ह ऑस्ट्रेलियन्स, पापुआ, मावरी. या एतद्देशीय लोकांची पूर्वीपासून वस्ती होती. माया, इन्का यांच्यासारख्या संस्कृती जगाच्या पटलावरून नष्ट झाल्या.
जगाला मूलनिवासींचा विचार करण्यासाठी 21वे शतक लागले, जे भारतात स्वातंत्र्यानंतर घटनेने 1952मध्येच जनजातीय समाजाला दिले. त्यानंतरही विविध आयोगांच्या विशेषत: नियोगी आयोगाच्या शिफारशीवर PESA, पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायदा , 2006 वन अधिकार कायदा सन्मानाने भारतातील एक मुख्य निवासी परंतु परिस्थितीवरून आज मुख्य प्रवाहापासून, विकासाच्या गतीपासून दूर असलेल्या जनजातीय समाजाला दिले आहेत.
आपल्या देशाचे वैशिष्टय हेच आहे की, भाषा, भूषा, खान, पान यात विविधतेने नटलेला आहे .भारत जरी वरून विविध पंथांनी, जाती अंतर्गत वेगळा वाटत असला तरी सांस्कृतिकदृष्टया, अंतरिक श्रध्दा, विश्वास, परंपरा, जय पराजय, सुख दुःख ,इतिहास,मानसन्मान,गौरव परंपरेने एकच आहे.आम्ही सारे भारतीय एक आहोत आणि याची अनुभूती वर्षानुवर्षे या देशाने जगाला दाखविलेली आहे.यात ज्याला ,जनजातिय समाज म्हणून संबोधले जाते, तो समाजही धर्म, देश, देव, इतिहास, संस्कृती, परंपरेने अनादी काळापासून जोडलेला आहे.
परंतु दुर्दैव हेच आहे की, भारत अजूनही इंग्रजी मानसिकतेच्या गुलामीतून मुक्त झालेला नाही.इंग्रजांचे आपण समजू शकतो. त्यांना या देशावर येनकेनप्रकारे राज्य करायचे होते. त्यामुळे अभ्यासपूर्ण, भेद निर्माण करणाऱ्या अनेक खोटया गोष्टी त्यांनी शिक्षणामार्फत, शासन यंत्रणेमार्फत या देशात पसरविल्या.त्यातील एक म्हणजे हा देश कधीच एक नव्हता.अनेक समुदायांचा, विविध समाज आधारित हा एक भूमीचा खंड आहे.इंग्रज हे पसरविण्यात यशस्वी ठरले, परंतु भारतात ते पटवून देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले परंतु स्वतंत्र भारतात काँग्रेस, पुरोगामी, डावे, धर्मांध ख्रिश्चन मिशनरी, जिहादी मुस्लीम, बामसेफ, आणि जातीवर आधारित छोटे मोठे पक्ष, संस्था यांनी हे भेद अधिक विस्तृत केले, त्यांची दरी वाढविली. त्यातून पंथीय संघर्ष, नगरवासी, ग्रामवासी, वनवासी संघर्ष ही उदयास आले.
वनवासी कल्याण आश्रम अथवा जनजाती समाजासाठी कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती व संस्था देशाच्या दृष्टीने याचा विचार करून जागृती निर्माण करीत आहेत त्यामुळे जगाच्या नकाशावर जरी हा दिवस यशस्वी होत असला, तरी यापुढे भारतात त्यांच्या षड्यंत्राच्या रूपात तो कधीच यशस्वी होणार नाही हे निश्चित..
वर्तमान केंद्र सरकारने जनजातींच्या भावना व स्वातंत्र्यसंग्रामात जनजाती योद्धांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन महान क्रांतिकारक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबर हा “जनजाती गौरव दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे जगाच्या इतिहासातील अत्यंत क्रूर असा हा दिवस 9 ऑगस्ट यापुढे भारतात साजरा होता कामा नये आणि जो कोण करत असेल त्या विरोधात सर्व भारतीयांनी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे..