मुंबई, दि. १२ डिसेंबर – हिंदू संघटनांनी, राज्यातील नागरिकांनी विनंती करूनही दिवाळीपूर्वी मंदिरे ‘अनलॉक’ करण्याबाबत ठाम असणाऱ्या राज्य सरकारने अन्यधर्मियांबाबत मऊ धोरण स्वीकारले आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील नाईटक्लबमध्ये वाढता वावर लक्षात घेऊन संचारबंदी लागू करण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. सदर संचारबंदीबाबतचा निर्णय ख्रिसमसनंतर घेतला जाईल असे स्पष्ट केल्याचे समजते. यावरील राज्य सरकारचा धार्मिक दुजाभाव उघड झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कोविड-१९ संबंधी नियमावलीचा भंग करत मुंबईतील नाईटक्लब्समध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी आढळून येत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्य सरकारला एका पत्राद्वारे गेल्या आठवड्यात कळवले होते. मुंबईत रात्रीची संचारबंदी लागू केली जावी अशीही मागणीही त्यात करण्यात आली होती.
मुंबई महापालिका आणि पोलिसांनी एकत्रपणे काही नाईट क्लब्जवर धाड टाकली होती. यात वांद्रे, लोअर परळमधील क्लब्जचा समावेश होता. ते क्लब मध्यरात्रीही पूर्ण क्षमतेने सुरू होते. काही ठिकाणी ४००हून अधिक लोक एकत्र जमले होते. शारिरीक अंतराच्या नियमांनाही हरताळ फासण्यात येत होता. यानंतरच पालिकेकडून संबंधित पत्र सरकारला पाठविण्यात आले. राज्य सरकारने मात्र आपण ख्रिसमसनंतर पुन्हा एकदा यासंबंधी पाहणी करून त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
कोविड-१९च्या प्रकोपामुळे गुढीपाडव्यापासून सर्वच सण प्रतीकात्मक स्वरुपात साजरे करण्यात आले. महाराष्ट्रात शतकानुशतकांची परंपरा असणारी आषाढीची-कार्तिकीची पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली. स्थानिक उत्सवाच्या वेळी विविध देवस्थानांत तात्कालिक संचारबंदी लागू करण्यात आली. दिवाळीतही नियमावली पालनाची ग्वाही देत मंदिरे उघडण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात आली. तरीही मंदिरे दिवाळीनंतर खुली करण्यात आली. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी लोक एकत्र येण्याची शक्यता असताना राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलणे हे धक्कादायक आहे.
माहिती संदर्भ – इंडियन एक्सप्रेस
**