PoliticsRSS

भारतीय पद्धतीच्या शिक्षण संस्थेत राहुल यांना शिकता आले नाही हेच दुर्दैव

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था ही एक जिवंत संस्था आहे. अंतर्मनाने विद्याभारतीचे लक्ष्य स्वीकारून कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हा प्रवास अहम् पासून त्वम् आणि पुढे वयम् पर्यंत घेऊन जायचा आहे. इदं न ममच्या आहुतीच्या भावनेने विद्याभारतीच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वत्वाचे उदात्तीकरण होते. या स्वत्वाचे दर्शन आपल्याला दैनंदिन जीवनातील घडामोडींतून होत असते.

विद्याभारतीचे लक्ष्य

राष्ट्रभक्तीने परिपूर्ण, शारिरीक, आत्मिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक दृष्टीने विकसित, जीवनातील आव्हानांचा सामना करू शकणारी, गावांत-रानावनांत तसेच सेवावस्त्यांत राहणाऱ्या बांधवांना सामाजिक कुरीतींपासून मुक्त करून राष्ट्रजीवनास समरस, सुसंपन्न करणारी युवापिढी ज्या राष्ट्रीय शिक्षण प्रणालीद्वारे घडेल अशा प्रणालीचा विकास करायचा आहे.

“असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय” अर्थात असत्याकडून सत्याकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे नेणारे शिक्षणच खरे शिक्षण आहे असे भारतीय शिक्षणाच्या मूळ भावाबद्दल विष्णु पुराणात म्हटले आहे. भारतात प्राचीन काळापासूनच समृद्ध अशी शिक्षण व्यवस्था आहे. शिक्षणाचे इंग्रजी प्रारूप ब्रिटिश कालखंडातील चार्ल्स ग्रांट, विल्वर फोर्स, आणि मेकॉले यांचे होते. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा युगानुकूल परिवर्तनाच्या वातावरणात आपले स्वतःचे प्रारूप स्वीकारणे शक्य होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची विद्यालये बंद करून एखाद्या वर्षांत आपली व्यवस्था बनवू शकत होतो. इंग्रजी शिक्षण तंत्र लागू करतानाच त्याचा पर्याय शोधण्यास सुरुवात झाली होती. त्याच काळात शिक्षणाची अनेक पर्यायी प्रारूपे विकसित होत गेली.  

महात्मा गांधी यांनी जे पायाभूत शिक्षणाचे प्रारूप तयार केले त्यात भारत, भारतीय समाज आणि त्याच्या आवश्यकता लक्षात घेऊन त्याची स्थापना करण्यात आली. हे प्रारूप रोजगारपूरक होण्यासोबत त्यात धर्म तसेच अन्य बाबींचाही समावेश होता. कलाकौशल्याबाबत विचार होता. महर्षी अरविंद यांनीही पुदुच्चेरी येथे एक प्रारूप विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. रवींद्रनाथ ठाकूर यांनी शांतीनिकेतनाच्या रुपात एक प्रारूप विकसित करण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी आंदोलनात सत्याग्रह आणि स्वदेशीचा मुद्दे होते. त्यातूनच राष्ट्रीय विद्यालयाची कल्पना पुढे आली. भारतीतील शिक्षण राष्ट्रीय असले पाहिजे, या कल्पनेतूनच राष्ट्रीय विद्यालये उभी राहिली. आर्य समाजाने गुरुकुल परंपरेच्या रुपात विद्यालये चालविली. स्वामी श्रद्धानंद यांनी स्थापन गुरुकुल कांगडी विद्यापीठाची स्थिती इतकी उत्तम होती का त्यातून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी भारतातील महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत असत. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच उत्तर देण्याचा हा संघर्ष सुरू होता. मात्र शासनव्यवस्था ही ब्रिटिशांच्या हातात होता. म्हणून प्रयोग शक्य होते मात्र संपूर्ण परिवर्तन शक्य झाले नाही. स्वातंत्र्यानंतर लगेचच इंग्रजांची विद्यालये बंद करण्यात आली असती तरच ही पर्यायी प्रारुपे वापरात आली असती. पण दुर्दैवाने तसे घडले नाही व इंग्रजांची जुनीच पद्धती सुरू राहिल्याने आज आपण त्या व्यवस्थेचे परिणाम अनुभवत आहोत.  

या परिस्थितीला एक सकारात्मक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी संघाच्या प्रेरणेतून स्वयंसेवकांच्या माध्यमातून भारतीय चिंतनावर आधारित एका मोठ्या संघटनात्मक प्रयत्नाच्या रुपात विद्याभारती कार्यरत आहे. विद्याभारती जगातील शिक्षणक्षेत्रातील सर्वात मोठी गैरशासकीय संघटना आहे.  

पंचकोषीय शिक्षणावर आधारित चरित्रनिर्माण आणि व्यक्तिमत्वाचा समग्र विकास शिक्षणाच्या भारतीय प्रारूपात प्रतिबिंबित झाले पाहिजे. शिक्षण देशाच्या संस्कृतीला अनुसरून, जीवनाचा लक्ष्यबोध करणारे आणि त्याला अनुरूप असे सामर्थ्य उत्पन्न करणारे असावे. शिक्षण धर्मनिष्ठ असण्यासोबतच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय गरजांची पूर्तता करणारे तसेच आव्हानांचा सामना करणारे असावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याच शब्दात सांगायतचे तर शिक्षण हे व्यवसाय नव्हे तर मोहिमेच्या रुपात चालविणाऱ्या संस्था या काळाची गरज आहेत.

वंचित वर्ग आणि विद्या भारती

आज देशात सुमारे ४० टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत आहे. हे बांधव आपल्याच समाजाचा एक भाग असूनही शिक्षणापासून दूर, वंचित राहतात. विद्याभारतीचे कार्यकर्ते आपले राष्ट्रीय कर्तव्य जाणून या क्षेत्रात शिक्षणाचा दीप निरंतर प्रज्ज्वलित ठेवण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहेत. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या दुःखी, वंचित बांधवांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे ही ईश्वराची सेवा मानून अथकपणे कार्यरत आहेत. हे कार्य भारतामातेस अखंड ठेवणे, सामाजिक समरसतेचा भाव जागृत करणे, लालूच दाखवून वा हतबलतेचा फायदा घेत धर्मांतरण थांबविणे यासाठी आवश्यक आहे.  

अनौपचारिक शिक्षण केंद्रांची स्थापना, एकल विद्यालयांचा विस्तार, संस्कार केंद्र स्थापना यांचा यात समावेश आहे. विद्या मंदिरांतील बालके तसेच आचार्यांचे वंचितांना जाऊन भेटणे हे देशाच्या भविष्याच्या मवात सामाजिक समरसतेचा भाव रुजवते. संस्कार केंद्रात मुख्यत्वे आरोग्य, सुरक्षा, देश तसेच संस्कृती प्रेम, साक्षरता स्वावलंबन यांचा अंतर्भाव असतो. संस्कार केंद्रात होणाऱ्या कार्यांमुळे अनेक कुटुंबांमध्ये बदल होताना दिसून आले आहेत. परिसर स्वच्छतेत सहभाग, सामाजिक कुरीतींबाबत जागृती करणारे पथनाट्य, राष्ट्रप्रेमाबाबत गौरव माला आणि गीते या माध्यमातून विद्याभारतीचे कार्यकर्ते अथकपणे वंचितवर्गात कार्य करत आहेत.

राहुल गांधी आणि विद्याभारती

राहूल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण पाश्चात्य पद्धतीच्या एडमंड राईस यांनी स्थापन केलेल्या दिल्लीतील सेंट कोलंबा शाळेत झाले. त्यानंतर १९८१-८३ या काळात ब्रिटिश प्रारूपावर आधारित आणि बंगालमधील वकील सतीश रंजन दास यांनी १९३५मध्ये डेहराडून येथे स्थापन केलेल्या डून शाळेत झाले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे वडील, राजीव गांधी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना घरातच शिक्षण घ्यावे लागले. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या रोल्लिंस महाविद्यालयीतून पदवी प्राप्त होईपर्यंत पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांतच त्यांचे शिक्षण झाले. दुर्दैवाने म्हणा वा अन्य काही कारणाने राहुल यांचे शिक्षण भारतीय प्रारूपावर आधारित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणाचा अनुभव नसल्यामुळे पाकिस्तानातील मदरसे आणि विद्याभारतीच्या विद्यामंदिरांतील फरक माहीत नाही. यापूर्वी लोकसभा निवडणुकांच्या वेळीही विद्याभारतीवर दहशतवादी घडवित असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.  

त्यांना बहुदा हे माहीत नाही की पंजाबमध्ये त्यांचे सरकार चालविणारे २५ टक्के अधिकारी हे विद्याभारतीच्या विद्यालयांतून शिकून मोठे झाले आहेत वा कोणत्या ना कोणत्या रुपात विद्याभारतीच्या उपक्रमांत सहभागी झाले आहेत. एखाद्या संस्थेने इतके प्रशासकीय अधिकारी समाजाला देणे ही काही साधारण बाब नाही. हीच परिस्थिती त्यांच्या मंत्र्यांचीही आहे. काँग्रेसच्या राजस्थान सरकारबाबतही हीच स्थिती आहे, मग त्यांचे सरकार दहशतवादी किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणारे चालवत आहेत का. निवडणुकीत मतपेटीत भर घालण्यासाठी संभ्रमित करणारी विधाने राहुल गांधी यांनी करू नयेत. लाखो देशभक्तांनी कठोर तपस्या, आपले तारुण्य आणि निस्वार्थी भावनेने आपले तन-मन-धन अर्पण करून ही संस्था मोठी केली आहे.

विद्याभारती संचालित एखाद्या विद्यालयात त्यांनी एक दिवस व्यतित करावा आणि विद्याभारतीचा आत्मा अनुभवावा. या अनुभवानंतर ते विद्याभारतीच्या विद्यामंदिरांना विरोध करणार नाहीत.

**

Back to top button