HinduismInternational

पाकिस्तानात हिंदू आजही असुरक्षित, कुटुंबातील पाच जणांची नृशंस हत्या

इस्लामाबाद – पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचार आजही संपलेले नाहीत. रहिम यार खान शहरानजिक अबुधाबी कॉलनी येथील एका हिंदू परिवारातील पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि कुऱ्हाड हस्तगत केली असून हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

प्राप्त माहितीनुसार, एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले की, मृत मेघवाल परिवारातील रामचंद मेघवाल हे ३५ वर्षीय शिंपी होते व त्यांचे टेलरिंगचे दुकाम होते. एका शांत स्वभावाच्या व आनंदी जीवन जगणाऱ्या व्यक्तीची हत्या होणे हे अनेकांना धक्का देणारे होते. एकाच परिवारातील पाच जणांच्या हत्येने पाकिस्तानी हिंदूंमध्ये भीती निर्माण झाली आहे. द न्यूज इंटरनॅशनल या पाकिस्तानी वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार मेघवाल कुटुंबियांना गळा चिरून मारण्यात आले.

पाकिस्तानात अनेकदा हिंदूंना लक्ष्य केले जाते. कधी त्यांची दुकाने लुटली जातात तर कधी माताभगिनींची बेअब्रू केली जाते. अनेकदा त्यांच्या धर्मस्थळांना उध्वस्त केले जाते. बळजबरी धर्मांतरण केले जाते.

पाकिस्तानाच्या एकूण लोकसंख्येत अडीच टक्के लोकसंख्या, सुमारे ७५ लाख हिंदू आहेत. एवढे हिंदू राहात असूनही पाकिस्तानात गेल्या ७४ वर्षांत एकही मंदिर उभे राहिले नाही, अशी माहिती एवॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे अधिकारी तारीक वजीर यांनी सांगितले. इटीपीबी हे हिंदू आणि शीख भारतात परतल्यावर त्यांच्या धर्मस्थळांच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेले ट्रस्ट आहे.

मागील एका वर्षात अटारीमार्गे सुमारे १०० हिंदू भारतात परतले असून त्यांनी आपल्यावर झालेले अत्याचारांबद्दल माहिती दिली होती. पाकिस्तानात माणुसकी संपलेली असून कट्टरपंथियांनी हिंदूंना जगणे कठीण केले असल्याचेही ते म्हणाले होते.

**

Back to top button