NewsRSS

रा. स्व. संघाच्या ‘सरकार्यवाह’पदी दत्तात्रेय होसबळे यांची नियुक्ती

बंगळुरु, दि. २० मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत  सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी होती.   

दत्तात्रेय होसबळे यांचा जन्म १ डिसेंबर १९५४  मध्ये कर्नाटक मधील शिमोगा जिल्ह्यातील होसबळे गावात झाला. इंग्रजी विषयातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले होते. 

दत्तात्रेय होसबळे १९६८ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी संघ स्वयंसेवक बनले आणि १९७२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी ते जोडले गेले. विभिन्न जबाबदाऱ्या पार पाडत ११ वर्षे ते परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री होते. सन १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आणि १४ महिने ‘मिसा’ अंतर्गत कारावासही भोगला. विद्यार्थी परिषदेत अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतानच परिषदेची राष्ट्रीय संघटनमंत्री ही जबाबदारीही त्यांनी उत्तमरित्या सांभाळली. आसाम, गुवाहाटी येथील युवा विकास केंद्राच्या उभारणीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. अंदमान निकोबार द्वीप समूह आणि ईशान्य भारतात विद्यार्थी परिषदेच्या कार्यविस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपानंतर संघद्वारा अत्यावश्यक साधनांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी मदतदलाचे प्रमुख या नात्याने त्यांनी नेपाळमध्ये सेवाकार्य केले.  

वर्ष २००३ मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख अशी जबाबदारी आली, तर वर्ष २००९ पासून सह सरकार्यवाह म्हणून त्यांच्याकडे दायित्व होते. दत्तात्रय होसबळे यांनी मातृभाषा कन्नड व्यतिरिक्त इंग्रजी, हिंदी, संस्कृत यासह अनेक भाषांचे ज्ञान आहे. कन्नड पत्रिका ‘असीमा’ चे संस्थापक संपादक देखील ते राहिले आहेत. तसेच भारतामध्ये शिक्षण घेत असलेल्या विदेशी विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या ‘विश्व विद्यार्थी युवा संघटन’ चे संस्थापक महामंत्री म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. याच सामाजिक कार्याचा भाग म्हणून अमेरिका, युरोप सहित जगातील अनेक देशांमध्ये त्यांचा प्रवास झाला आहे.   

**

Back to top button