OpinionRSS

वनवासींच्या समग्र विकासासाठी ‘स्टफ फॉर गुड हेल्थ’

या आहेत दीप्ती अगरवाल. दीप्ती अगरवाल भारत विकास परिषदेच्या मुंबई प्रांताच्या समर्पण शाखेच्या सदस्य असून फोटोत त्या पीपीई कीट घालून भाज्या विकताना दिसत आहेत. सध्या त्या ‘स्टफ फॉर गुड हेल्थ’ अंतर्गत मीरा रोड येथील सृष्टी सेक्टर 3मध्ये रसायनमुक्त सेंद्रीय भाज्या रहिवाशांकरिता उपलब्ध करून देत आहेत.

उत्तम आयुरारोग्याच्या दृष्टीकोनातून आज अनेकजण पारंपरिक भारतीय शेतीपद्धतीनुसार सेंद्रीय पद्धतीने पिके घेताना दिसतात. मग आत्मनिर्भर भारत प्रकल्पांतर्गत वनवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हीच पद्धती का अवलंबू नये असा विचार भारत विकास परिषदेच्या मुंबई प्रांत समर्पण शाखेने केला आणि आकाराला आला ‘स्टफ फॉर गुड हेल्थ’ – सेंद्रीय भाज्या आणि फळे हा प्रकल्प. या प्रकल्पांतर्गत वनवासी बांधवांच्या माध्यमातून सेंद्रीय पद्धतीने भाज्या व  फळे पिकविली जातात व मुंबईतील ग्राहकांपर्यंत पोहोचविली जातात.

वानगाव, डहाणू, सफाळे आणि कोस्बाड नजिकच्या वनवासी नागरिकांना काही दिवसांपूर्वीपर्यंत पैशांच्या अभावापायी काहीही करणे शक्य नव्हते, तेच आता सन्मानपूर्वक आपले जीवन व्यतित करत आहेत. याचे सारे श्रेय भारत विकास परिषदेच्या मुंबई प्रांत समर्पण शाखेस जाते. समर्पण शाखेने घोडीपाडा येथील रहिवाशांचा जीवनाचा स्तर उंचाविण्यासाठी तसेच धर्मपरिवर्तन थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. वनवासी समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला असेल तर त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही आणि याचाच फायदा धर्मपरिवर्तन करणाऱ्या संस्था घेतात. हेच धर्मपरिवर्तन थांबविण्याच्या  हेतूने पाच पाच हजार रुपयांची प्रत्येकी पन्नास कोंबडीची पिल्ले उपलब्ध करून देण्यात आली. आता ही पिल्ले मोठी झाली असून वनवासींना त्यांच्यापासून दररोज दोनशे रुपये आर्थिक लाभ होत आहे. त्याच गावात समर्पण शाखेच्या वतीने सुवर्णा नावाच्या महिलेला शिलाई मशीन देण्यात आले. छोटी छोटी शिलाईची कामे करून दररोज पन्नास-साठ रुपे तिला मिळतात.

याच्या पुढचा टप्पा होता शेतकरी आणि शेतमजुरांच्या आर्थिक विकासाचा. त्यासाठी स्टफ फॉर गुड हेल्थ ही संघटना साकारण्यात आली. सुमारे दहा शेतकरी आणि पन्नास शेतमजूर संस्थेच्या या आत्मनिर्भर स्वस्थ भारत प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. या प्रकल्पांतर्गत शेतकरी सेंद्रीय पद्धतीने शेती करीत असून घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम महिलांवर सोपविण्यात आले आहे. सध्या ७५ हून अधिक स्त्रीपुरुषांना या प्रकल्पातून रोजगार प्राप्त झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ही भाजी उपलब्ध करून दिली जात आहे.

वास्तविक पाहता, स्टफ फॉर गुड हेल्थ हा केवळ सेंद्रीय भाज्यांचा प्रकल्प नाही. तर ती एक सामाजिक चळवळ आहे. समाजाच्या विकासात चार सूत्रांची महत्त्वाची भूमिका असते धर्म, सामाजिक व्यवस्था, तिसरे आहे समाजात राहणाऱ्यांचे आरोग्य आणि चौथे आहे अर्थव्यवस्था. या उपक्रमाची रचना चार सूत्रांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे.

१ धर्म –  जे वनवासी शेतकरी भाज्या पिकवतात त्यांना शेतीत मुळात स्वारस्य नव्हते. कोणत्याच कामात त्यांना रस नव्हता. या कारणाने पैसेही नसत व त्याचा लाभ धर्मपरिवर्तनात सक्रिय संस्था घेतात. स्टफ फॉर गुड हेल्थ या प्रकल्पामुळे त्यांच्या हातात पैसे शिल्लक रहायला सुरुवात झाली आहे व कदाचित ते धर्मपरिवर्तनापासून दूर राहतील.

२ समाज –  या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांप्रमाणेच अन्य पुरुष व महिला श्रमिकांना रोजगार मिळाला.

 ३ आरोग्य – जे लोक या सेंद्रीय भाज्या खात आहेत,त्यांचे आरोग्य नक्की चांगले राहील याची खात्री आहे.

४ अर्थव्यवस्था – भाज्या घरी पोहोचवण्याचे कार्य महिलांच्या मदतीने करण्यात येत आहे. त्यांचाही आर्थिक विकास होत आहे.

ही भारत विकास परिषदेची आत्मनिर्भर स्वस्थ भारत चळवळ आहे. वनवासी बांधवांच्या विकासासाठी आणि आरोग्यदायी जीवनमानासाठी संबंधित सेंद्रीय भाजी आपल्याला व्हॉट्स अप (8591226652) आणि वेबसाईटच्या (https://d-stuffforgoodhealth780.dotpe.in) बुंकिंगच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button