NewsRSS

परगावी परतणाऱ्या कामगारांना विहिंप देत आहे मदतीचा हात

दहा हजार लीटर पेयजल आणि नऊ मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था


मुंबई, दि. १९ एप्रिल – कोरोनाचा कहर आणि महाराष्ट्रात लावण्यात आलेले कडक लॉकडाऊन यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कामगार, मजूर आपापल्या गावी परत जात आहे. विश्व हिंदू परिषद ही संघटना या कामगारांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. कुर्ला टर्मिनस येथे पेयजल आणि मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाला आहे. रुग्णांच्या संख्येतही मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीत आपापल्या गावी परत जाणाऱ्या कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने कंबर कसली आहे. कुर्ला टर्मिनस येथे परिषदेच्या वीस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १८ व १९ एप्रिल या काळात तब्बल दहा हजार लीटर पेयजलाच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या प्रचंड प्रवासी संख्येमुळे रेल्वेस्थानकावरील स्वच्छतागृहांवरील ताण लक्षात घेऊन, विशेषतः महिलांच्या आरोग्याचा विचार करत नऊ मोबाईल स्वच्छतागृहे सुरू करण्यात आली आहेत. 

रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, जनकल्याण समिती, केशवसृष्टी माय ग्रीन सोसायटी, सेवा सहयोग, सेवांकुर, निरामय सेवा संस्था, आरोग्य भारती, समिधा अशा विविध संस्थांनी गेल्या वर्षीही प्रवासी मजुरांसाठी विविध प्रकारचे साहाय्य केले होते. भोजन पाकिटे, शिधा, काढा अशा वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात आली होती. कोरोनाने पुन्हा एकदा, अधिक तीव्रतेने डोके वर काढले आहे. संघ संबंधित संस्था पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आल्या आहेत. प्लाझ्मा डोनेशन सूची, क्वारंटाईन परिवारांना भोजनाची व्यवस्था, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बेड आदीची सोय अशी विविध स्वरुपाची मदत केली जात आहे.

Back to top button