NewsRSS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वैकुंठात अंत्यसंस्कारासाठी सेवा कार्य

स्वरूपवर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य प्रकल्प संस्थेचे स्वयंसेवक 24 तास उपलब्ध

पुणे, ता. 27 :  कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तिंवर वैकुंठ स्मशानभूमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वरूपवर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य प्रकल्प यांच्या माध्यमातून अंत्यसंस्काराच्या सेवा कार्यास प्रारंभ झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी चोवीस तास ही व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील सर्वच स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत आहे. ही परिस्थिती पाहता महापालिकेने वैकुंठ स्मशानभूमीतील दोन शेड लाकडावरील अंत्यसंस्कारासाठी खुल्या केल्या. या ठिकाणी कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तिवर अंत्यसंस्कारासाठी रचना उभी केली आहे. अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष सेवा कार्यास सुरूवात झाली असून स्वयंसेवक प्रत्यक्ष अंत्यविधीसाठी मदत करत आहेत. या स्वयंसेवकांसाठी चरणजीत सहानी मित्र परिवार आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने पीपीइ किट, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य भेट देण्यात आले. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सहकार्यवाह आणि समर्थ भारतचे संयोजक सचिन भोसले यांनी हे साहित्य स्वीकारले. यावेळी स्वरूपवर्धिनीचे निलेश धायरकर, सेवा सहयोगचे अतुल नागरस, सुराज्य प्रकल्पचे विजय शिवले यांच्यासह दलजीत सिंग रँक, शैलेश बदडे, ऍड सुनील ठाकूर, रामदास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

याबाबत समर्थ भारतचे संयोजक सचिन भोसले म्हणाले, ” प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सेवाकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे. मृत्यूनंतर पास काढण्यासाठीचीही चोवीस तासाची व्यवस्था ससूनमध्ये केली आहे.”  याठिकाणी मोजक्याच नातेवाईकांना येण्यास परवानगी आहे. त्यांना होणाऱ्या त्रासामुळे अंत्यसंस्काराच्या सेवाकार्यास प्रारंभ केला. स्वयंसेवक चिता रचण्यासह सर्व कार्यात प्रत्यक्ष सहभागी होत आहेत, असेही त्यांनी पुढे नमूद केले.  

असे चालणार सेवाकार्य

– आठ तासांच्या तीन शिफ्ट

– प्रत्येक शिफ्टमध्ये 6 ते 7 स्वंयसेवक कार्यरत

– ससूनमध्ये चोवीस तास पास देण्याची सोय

– त्यासाठी तीन शिफ्टमध्ये दोन स्वयंसेवकांची नियुक्ती

– प्रत्येक स्वयंसेवकाचे सात दिवस संस्थांत्मक विलगीकरण

—-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button