OpinionRSS

नारायणराव ! आम्हांला क्षमा करा

आज आमचे पश्चात्तापाचे शब्द आपण ऐकू शकणार नाहीत. कारण ऐकण्यासाठी आपण आमच्या जगात राहिलाच नाहीत. पण आम्ही ? आजही आहोत आणि तेव्हाही होतोच. आम्हांला आजही ऐकू येतंय, तेव्हाही येत होतं. आम्ही आजही पाहू शकतो आहोत, आणि तेव्हाही पहात होतोच. परंतु हे ऐकणं-पाहणं शक्य असूनही आम्ही काय ऐकलं ? काय पाहिलं ? आणि सर्वात महत्वाचे आम्ही काय सांगितलं ?

नारायणराव ! तुम्ही सुजनासारखे पायरव न करता आमचे जग सोडून गेलात. अवतीभावती भयाचे सावट होते. काळाची पावलं दाणदाण वाजत होती, थरकाप उडवत होती. तेव्हा तुम्ही तिथेच होतात…ऐकत होतात. तो भयकल्लोळ तुम्हाला अस्वस्थ करून गेला. त्या आकांताचा काहीसा तरूण आवाज तुम्हांला अंतर्बाह्य हलवून गेला. त्या रूग्णालयातील शय्येवरून तुमचं संवेदनशील मन त्या आवाजाचा माग

घेत होतं. रूग्णशय्या मिळवणं हे जणू पुढे जगण्यासाठी मिळवायचं संजीवन असावं असा आकांताचा तो टाहो सांगत होता. जणू तीच एकमेव आशा होती आणि तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा तो अट्टहास होता. तिच्या प्राप्तीसाठी चाललेली ती धडपड होती. त्या आक्रंदनातून तुम्हांला त्या अनामिकाचे घरही दिसले असेल. घरी जगण्यासाठी चाललेल्या संघर्षांची जाणीवही नसलेली कच्चीबच्ची असतील, घरातलं कर्तं माणूसच व्याधीने मोडून पडलेलं पाहताना घालमेल होणारे त्याचे सहचर असतील, कदाचित वळचणीचः पाणी आढ्याकडे सरकणारा उफराटा प्रवास कातरपणे पाहणारे कुणी वडिलधारे असतील… अशी कितिक कुटुंबचित्र तुमच्या डोळ्यांसमोर भीषण नृत्य करीत सरकली असतील. 

आणि त्या भयव्याकुळ आकांतसूराच्या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वतःला पाहिलं असेल. आपलं घर, आपली माणसं.. आपल्याला इथे आणून ह्या रूग्णशय्येचं संजीवक आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं, स्वतःही घेतलं. त्याच समाधानात इथे पडणाऱ्या  हेलपाट्यांचे श्रम त्यांना जाणवलेही नसतील. चाराठ दिवस इथे उपचार होतील. आजाराला उतार पडेल ही आशा आज दिसणाऱ्या चैत्रपालवीसारखी मनभर उमलली असेल. आजाराला उतार ! तुम्हीच ह्या कल्पनेशी थबकला असाल. आयुष्याचा उतार तुम्हाला अधिक जाणवला असावा. तुम्ही स्वतःच शय्याधीन शरीर पाहिलं असेल. पावलांपर्यंत जेमतेमच पोहोचणारी चादर तुम्ही परिश्रमपूर्वक वर ओढली असेल. आणि चादरीबाहेरची पावलं दिसली असतील. तुमच्या मनात आलंही असेल की पावलं आता बाहेर पडली आहेत. बाहेर.. चादरीच्याच नव्हे तर साऱ्या साऱ्याच्याच. कदाचित कधी मंदिरांत, चौकातील पूजाउत्सवांत ऐकलेले कबीराचे शब्द आठवले असतील..मनात ते सुरावटीसह गुंजून गेले असतील. ‘चदरिया झिणी रे झिणी l रामनामरस पीनी l’

रूग्णालयाची चादर बरीच स्वच्छ, घट्ट विणीची पण त्याखालचं आपलं शरीर .. ती कायेची चादर मात्र विरत चाललेली, धागाधागा उसवत चाललेली, धुवट.. पण तरीही चिवट ? चादर चिवट आहे की त्यात लपेटून विसावलेला मी ? चादरीचा विस्कटत चाललेला ताणाबाणा काही सांगतोय का? मीच ऐकत नाहीये का? मी मला आवडतंच ऐकत राहिलोय का? 

अशी किती गाणी, भजनं, अभंग मी ऐकले.. म्हटलेही. कधी एकट्याने..कधी सगळ्यांसोबत. सगळ्यासोबत म्हणताना कसं छान सुरक्षित वाटे, सोबत आहे असं वाटे. पण आता गेले कित्येक महिने…वर्षही झालं असेल. असं सगळ्यांसोबत काही म्हटलंच नाही. देवळे बंद. गजांच्या फटीतून तो एकलकोंडीत अडकलेला देव अगदी पाहवेनासा झाला. मग तुम्ही तिथपर्यंत जाणंच सोडून दिलं असेल. सगळ्यांसोबत असण्याची .. हसण्याची..गाण्याची आणखी एक जागा होती. संघाची शाखा. कित्येक वर्षे तुम्ही जात होतात. स्वयंसेवकच सखेसांगाती झाले होते. तेही वर्षभर बंद झाले होते. वर्षापूर्वींच्या आठवणींनी तुमच्या मनांत फेर धरला असेल. 

सोबत्यांची नावे आठवून ते काय करत असतील असा खेळ मनात रचला असेल. आणि धसकलाही असाल. ह्या आपत्तीच्या अक्राळविक्राळ लाटेने सर्वांना कसे दूर फेकून दिले ते आठवून डोळे ओलावले असतील. वयाच्या आसपासचा एखादा दिगंताच्या प्रवासाला गेल्याचे आठवले असेल. एखादा ..एखादा ऐन चाळीशीतच पुस्तक मिटल्यासारखा संपून गेल्याचे आठवून तुमचा रूग्णशय्येवरचा अशक्त देह अधिकच पांगळा झाला असेल. पुन्हा बाहेरच्या आकांताने तुम्ही कोंडून घेतलेल्या आत्ममग्न शांततेला खिंडार पाडले असेल. हा बाहेरचा आवाज कुणाचा? आपल्याच एखाद्या सोबत्याचा? आपल्या म्हणजे कुणाचा? आपल्या घरातला ? वसतीतला ? गावातला ? आपला म्हणजे कोण ? हे आपलेपणाचे वर्तुळ कितीतरी घेरदार.. म्हणजे सगळेच आपले. आपण हेच तर म्हणत होतो सगळ्यांसोबत. ‘भारतीय जनसिंधूचा बिंदू बिंदू मेरा अपना…’ शब्द पाठच होते. शाखेवर म्हणताना अर्थाकडे किती लक्ष होतं ते ध्यानात नाही. पण ते ध्यानात नव्हतं म्हणजेच आत उतरलं होतं का? रूजलं होतं का? बिंदू बिंदू म्हणताना द्विरूक्तीची, गुंजत राहिलेल्या अनुस्वाराची, ते उच्चारताना अवतीभवती जणू बिंदू बिंदूच दिसण्याची गंमत पुन्हा आठवली असेल. 

म्हणजे हा बाहेर कण्हत असलेला.. आपलाच ! आणखी एखादा बिंदू ..शाखेवर भेटलेला वा वसतीत..गावात..कुठेतरी असलेला..क्वचित दिसलेला. पण आपला… त्याच्या आक्रंदनाचा आवाज तर तरूण वाटतोय. तरूण.. पुन्हा वळचणीच्या पाण्याच्या आढ्याच्या दिशेने होऊ घातलेल्या उफराट्या प्रवासाचे तर हे शोकगीत नाही ? तुम्ही तळमळला असाल. वर ओढलेली चादर आणखी वर ओढली असेल. आणखी वर.. गुडघ्याच्याही वर ..आणखी वर..वरची खालची टोके मिळालीच असतील. टोके मिळाली.. उत्तरही मिळाले असे तुम्हांला वाटले असेल.  ‘सुमनाची शेज l शीतळ हो निकी l पोळे आगीसारखी l वेगी विझवा गा l’ तशी शय्येची ती संजीवनी तुम्हांला दाहक वाटली असेल. 

तुम्ही आवराआवर… निरवानिरवच सुरू केली असेल. मुलीला आपलं हृद्गत सांगण्यासाठी शब्द जमविण्याची धडपड केली असेल. तिला कसं पटेल हे ? ते दुस्तरच होतं.. जीव आहे तिचा, साऱ्याच माणसांचा. ते असं निघू देणार नाहीत. पण तरीही बाहेरचा तो आकांत तुम्हाला सहन होत नव्हता. अखंड ऐकू येत होता. त्याचा प्रतिध्वनीच जणू तुमच्या मनात उसळत होता. तसाच..तेवढाच. त्याने तुम्हाला स्वस्थ पडू दिले नसेल. त्या आतल्या आवाजानेच तुम्हाला बोलण्याचे बळ दिले असेल, शब्द दिले असतील. मनावर तुमच्या शब्दांचं ओझं घेऊनच तुमच्या मुलीने, तुमच्या साऱ्याच माणसांनी तुम्हाला तुमच्या मनासारखे करू दिले असेल. ‘देश हमे देता है सबकुछ l हम भी तो कुछ देना सीखें ll कदाचित हे गुणगुणतच तुम्ही तिथून बाहेर पडला असाल. 

पुढचा सर्व काळ तुम्ही एका अलौकिक समाधानात व्यतीत केला असेल. शरीर… ते मात्र अधिक खंगले असेल. दुर्बल झाले असेल. वेदनेचा दाह वाढला असेल. सावट घनदाट होत गेलं असेल. तुमचं मन मात्र एका जगावेगळ्या तृप्तीचा अनुभव घेत असेल. त्या कभिन्नकाळ्या पटलावर एक अलवार चंद्रकोर तुम्ही धरून ठेवली असेल. अखेरपर्यंत. चंद्रास्ताबरोबरच ते मंत्रावेगळं चांदणे घेऊन तुम्ही सर्वांचा निरोप घेतला असेल. 

नारायणराव ! हे सगळं झाल्यावर तुमच्या कुटुंबियांनी तुमचं हे चांदण्याचं गाणं समाचाराला  आलेल्या आप्तजनांना सांगितलं. ते प्रकाशगाणं मग कुणीकुणी आजच्या अंधारलेल्या.. सावटाखालच्या जगाला सांगितलं. 

पण नारायणराव ! तिथे केवळ धास्तावलेला समाज नव्हता. कोसळलेल्या माणसांना हात देऊन उभं करण्याची पराकाष्ठा करणारा गट नव्हता. ह्या आक्रंदणाऱ्या उद्यानात गिधाडांचाही थवा होता. गिधाडे वाट पहात असतात. श्वास थांबण्याची. झडप घालण्यासाठी ..निश्चेष्ट कलेवराच्या चिंध्या करण्याची. मांसगोळ्यांवर ताव मारण्याची. 

नारायणराव ! आम्हांला क्षमा करा. सीतामाईंच्या चारित्र्याच्या शुद्धतेविषयीची धुणी चौकाचौकात धुणाऱ्याचा वंश आम्ही निःशंक, निष्कपट केला नव्हता. युगानुयुगे शरयूसह लोकगंगा वहात राहिल्या. पण हेतुदुष्ट शंका घेणारी मनं मलीनच राहिली. लोकहिताला, कल्याणाला जपण्यासाठी लागणाऱ्या विवेकाच्या पाण्याचा त्यांना स्पर्शही झाला नाही. 

नारायणराव ! हे आमचेच पातक नाही का? संस्कृतीचा उजेड सर्वदूर पोहोचविण्यात आम्हीच उणे ठरलो. राजसभेत पतिव्रतेच्या वस्त्राला हात घालणारे निलाजरेपण आम्ही संपवू शकलो नाही. मृत शरीरांवर लाथावर्षाव करणारीआणि समोर ठाकलेल्याच नव्हे तर मातेच्या गर्भातील मानवी अंकुरांना भस्मसात करणारी अमानुषता आम्ही मानव्याकडे नेऊ शकलो नाही. गोदामातेच्या तीरावर सुस्नात होऊन परतणाऱ्या शांतिब्रह्म एकनाथांवर थुंकणाऱ्यांची अवलाद आम्ही तशीच त्या अधमपणासह वाढू दिली हाही आमचाच अपराध नाही का? 

नारायणराव ! आम्हांला क्षमा करा. 

कारण ही गिधाडे, हे धुलाईवीर, हे दुशाःसनाचे सहचर, थुंकीवीराचे वंशज तुम्हाला कलंक लावण्यासाठी लेखण्या परजून सरसावताहेत. तुम्ही आता बोलू शकणार नाही, सांगू शकणार नाही अशी स्थिती आल्यावर प्रश्नांच्या फैरी झाडताहेत. 

असे करण्यात सामान्य… स्वाभाविक  संवेदनशीलतेलाच हरताळ फासला जातोय हे त्यांना पुरेसे कळते आहे. सरणावर तुम्हाला लागल्या असतील तशा झळांमध्ये तुमच्या आप्तांना होरपळून टाकत आहेत. 

कारण इतकेच आहे…

तुम्ही रूग्णालय सोडण्यापूर्वी रूग्णशय्येवरून त्यांना तिथे बोलावून त्यांना सांगायला हवे होते. वर्तमान रूग्णोत्सवांत त्यांच्या दृष्टीने भर पडली असती. भर पावसांत विशिष्ट वयोवृद्धाचे बोलणे टिपणे, सार्वत्रिक करणे, टिमकी वाजवून वसूली मिळवणे हे सारे सारे करण्याची सवय आहे ह्या सर्वांना. ते तुमच्या ह्या मूक त्यागाने त्यांना करता आले नाही. त्यांच्या उत्सवाची झळाळी कमी झाली. 

नारायणराव ! ह्या निर्लज्जांनी त्यासाठीच तुम्हाला अपराधी ठरवलंय. 

त्यांच्या तथाकथित सत्यान्वेषक वार्ताखोरीने आणखीही काही अपराध मांडले आहेत. अहो, तुम्ही चकचकीत प्रकाशदिवे आणि बोलबोंडके घेऊन येणाऱ्या वार्ताखोरांना बोलावले नाही तर नाही. पण त्या रूग्णालयात तरी दवंडी पिटायला हवी होती की नाही. अहो आजच्या जगात तुम्ही आहांत हे तुमच्या झुंडमाध्यमातील नोंदीवरून ठरवलं जातं. हे तुम्ही शिकून घ्यायला हवं होतं. मग तुमची समाजनिष्ठा, कळवळा त्यांनीही खरा मानला असता. देशभर उसळलेल्या व्याधीच्या लाटेची चिंता अशीच करणाऱ्यांचा बोलबाला होतो. जे अशा मतांच्या चुळा भरून टाकतात त्यांचाच हे सडा म्हणून गवगवा करतात. देशभर..जगभर चर्चांची राळ उडवतात. 

पण नारायणराव ! तुम्ही ह्यातील काहीही केले नाही. अहो किमान तिथे असलेल्या-नसलेल्या रूग्णांना, सेवकांना, परिचारिकांना, डॉक्टरांना तुम्ही त्यांची सारी दुखणीखुपणी, व्यवधाने, रूग्णोपचाराची घाईगर्दी सारंसारं सोडून तुमच्या ह्या जगावेगळ्या निर्णयाचे साक्षिदार करून घ्यायला हवे होते. 

अहो आजच्या जगात ते महत्वाचे. काय म्हणता ? तुमच्या मुलीची, कुटुंबाची साक्ष ? छ्छे ! ते चालणार नाही. बाहेरचा .. दुसरा कुणीतरी साक्षी हवा. त्यात एक सोय असते. दुसऱ्यासमोर दिलेला शब्द पाळला नाही तरी चालतो.  

काय म्हणता ? ‘मी माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करतो आहे !’ हे अलिकडेच ऐकलं..चाललं. तुमची कन्याही तुमच्या इच्छेचाच उच्चार करते आहे. निर्वाळा देते आहे. पण ते चालणार नाही. तुम्हालाच वेगळा न्याय का? असं विचाराल तर नारायणराव ! तुमचा सर्वात मोठा अपराध सांगायलाच हवा. 

नारायणराव ! तुम्ही शाखेत गेलात. गेलात तर गेलात पण तिथून संस्कार घेतलेत. घेतलेत तर घेतलेत तसं आचरणही केलंत. केलंत तर केलंत तसं समाजापुढे सांगितलंत. ही शेवटची कृती त्यांना दुःसह झाली. त्यांच्या डोक्यावरून अगदी पाणी गेलं. चोंदल्यासारखं झालं. साम-दाम-दंड-भेदादी सारी आयुधं उगारून, वापरूनही संघसंस्कार रूजताहेत, आचरणातून पालवताहेत हे ह्या पोकळ पडलेल्या पढीकपंडितांना मानवले नाही. 

नारायणराव ! म्हणून तुमच्या ह्या डोंगराएवढ्या सत्कृत्याला भुईसपाट करण्यासाठी ह्या साऱ्यांची उलघाल चालली आहे. त्यांचे घुत्कार मांगल्याला कुरतडून टाकत आहेत. 

नारायणराव ! आमचं चुकलं. खरंच चुकलं. बरंच चुकलं. खळांची व्यंकटी सांडो l तया सत्कर्मी रती वाढो.. असं पाथेय देणाऱ्या ज्ञानदेवांनाही आम्ही उणेपण आणले. 

पण नारायणराव ! तुम्ही तुमच्या कृतीतून, निवृत्तीतून धडा दिला आहे. तो महत्त्वाचा आहे. घनगर्द काळोखात पणती लावायची असते. तेवत ठेवायची असते. त्याचे फलक लावायचे नसतात. साक्षिदार उभे करायचे नसतात. तर भोवती ज्योत विझू न देणाऱ्या हातांची कमळे उभी करायची असतात. 

तेच आम्ही करायला हवं. तेच आम्ही करू.

नारायणराव ! तुमच्या मूक सत्कृतीला क्षमायाचनेसह विनम्र वंदन !

© प्रमोद वसंत बापट

Back to top button