EnvironmentOpinion

हिंगोलीतील शिक्षकाचा अभिनव उपक्रम – निसर्गशाळा

मुले म्हणजे मातीचा गोळा असे म्हटले जाते. त्याला जसा आकार देऊ तसे त्याचे व्यक्तीशिल्प भविष्यात घडणार असते. मुले जात्याच निष्पाप आणि निरागस असतात. आईबाबा, शिक्षक यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून सांगितलेली कृती ते मनापासून करतात आणि त्यामागच्या विचारांची रूजवणही त्यांच्या मनात होत जाते. मग याच गोष्टीचा उपयोग निसर्ग संवर्धनासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी का करू नये, असा विचार हिंगोलीतील माध्यमिक शिक्षक अण्णा महाडिक यांच्या मनात आला आणि तिथेच निसर्गशाळेचे बीज पेरले गेले.

निसर्गशाळा… गंमतशाळा

सध्या लॉकडाऊनमधील उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. पण सुट्टीत मात्र ऑनलाईन निसर्गशाळा भरते आहे. मुलांनी आठवड्यातून एक तास निसर्गासाठी, झाडांसाठी दिला पाहिजे हाच विचार यामागे आहे. मुलांमध्ये निसर्गाची आवड  निर्माण व्हावी आणि त्यांचे भविष्य निरोगी व्हावे म्हणून अण्णा जगताप ऑनलाईन निसर्गशाळेचा उपक्रम राबवत आहेत. राज्यभरातील सध्या सुमारे ५० मुले या शाळेत हजेरी लावत आहेत आणि आपापल्या घरात रोपवाटिका तयार करीत आहेत. दर शनिवारी झूम ऍपच्या माध्यमातून सायंकाळी ठीक पाच वाजता ही शाळा भरते. १४ वर्षांखालील मुले या शाळेत येतात आणि त्या दिवशी शिकलेल्या अभ्यासाची प्रात्यक्षिके एरवी सहा दिवसांत करतात.

निसर्गशाळा या उपक्रमाबद्दल अण्णा जगताप सांगतात की, मागील तीन वर्षांपासून निसर्गशाळेचा उपक्रम आम्ही प्रत्यक्ष रुपात राबवत आहोत. आपल्या घरात अनेक अनावश्यक वस्तू असतात. उदाहरणार्थ पुठ्ठ्याचे बॉक्स, तेलाचे कॅन-पिशव्या, पेयजलाच्या बाटल्या, प्लास्टिकच्या जाड पिशव्या याचा वापर वृक्ष संवर्धनासाठी करता येईल असे आम्हाला वाटले. निसर्गशाळेच्या तासाला शिकवलेल्या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार या वस्तुंमध्ये देशी बिया रुजवतात. प्रत्येक मुलाने दर महिन्याला अशी तीस किंवा त्यापेक्षा अधिक रोपे तयार करायची आणि स्वतःची रोपवाटिका तयार करायची असते. त्या रोपवाटिकेला त्या मुलाचे वा मुलीचे नाव दिले जाते. गेल्या वर्षी अवनी जगतापने ७०० रोपांची रोपवाटिका तयार केली. नाशिकचा विरूपाक्ष, परभणीची अर्पिता, आराध्या अशी महाराष्ट्रातली अनेक शेकडो मुले या उपक्रमात आजवर सहभागी झाली आहेत. यात काशीबेल, हादगा या दुर्मिळ झाडांचा समावेश असतो. केवळ देशी झाडे रुजवण्याची नव्हे तर त्याच्या फळांच्या पोषणमूल्यांची ही माहिती दिली जाते. आंबा, फणस, जांभूळ, चिंच यांच्यासोबतच हादग्याची फुले, बेलफळे याचाही शरिराला होणारा उपयोग शास्त्राच्या आधाराने शिकवला जातो.

पालघर, नाशिक, नांदेड, पुणे, संभाजी नगर, नागपूर, सांगली, परभणी, वासिम, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांतील मुले या अभियानात आजवर सहभागी झाली आहेत. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. ज्ञानोबा ढगे(नाशिक), रवी देशमुख(परभणी), बालाजी राऊत, प्रेमानंद शिंदे, राजा कदम, विलास कदम(वसमत), श्याम राऊत, रतन आडे, दत्ता चापके(हिंगोली) अशी टीम निसर्गशाळेच्या उपक्रमात सहभागी झाली आहे. या वर्षी लॉकडाऊनमुळे झूमच्या माध्यमातून ही निसर्गशाळा भरवायला सुरुवात झाली. लवकरच १४ वर्षांपुढील किशोर आणि युवकांसाठीही हा कोर्स सुरू होत आहे.                                                                                                                         

शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी देशी फळझाडे लावा

गेली काही वर्षे अण्णा जगताप हे वृक्षलागवड व संवर्धन क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या उपक्रमांबद्दल ते म्हणाले की, सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळते, चांगले आलेच तर त्याला भाव चांगला मिळत नाही. शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर त्यासाठी उत्पादन खर्च शून्य असणारी आणि ठोस उत्पादन देऊ शकेल अशी शाश्वत उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दीर्घकाल टिकणारी देशी झाडे, देशी वाणाची फळझाडे लावणे हा आहे. सुरुवातीचा काळ लक्ष द्यावे लागले तरी पुढे ही झाडे दीर्घकाल उत्पादन देऊ शकतात. काही झाडे पाच पाच पिढ्यांना उत्पादन देतात, तर फणसासारखे झाड शंभर वर्षे, चिंचेसारखे झाड तब्बल पाचेकशे वर्षे टिकाव धरते. त्यामुळे दरवर्षी होणारा उत्पादनाचा खर्च नाही पण उत्पन्न मात्र येत राहाते.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या नावे एका एकरात दरवर्षी ३० झाडे लावावी आणि त्याचे पुढील तीन वर्षे संगोपन करावे, अशी कल्पना आम्ही येथील शेतकऱ्यांना सुचवली. यामुळे त्यांना उत्पादनही मिळेल होते आणि मराठवाड्यासारख्या रखरखीत प्रदेशात निसर्गसंवर्धनही होईल, असेही त्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला.

एक तास झाडे जगवण्यासाठी

गेली तीन वर्षे आम्ही काही मित्र मिळून वृक्षलागवडीचा उपक्रम राबवतो आहोत. उदाहरण द्यायचे तर परभणीतील भोगाव येथे स्थानिक देवस्थानाने आम्हाला सत्तर एकर जमीन फळबागेच्या लागवडीसाठी दिली. त्यात केवळ देशी झाडेच तिथे लावण्यात आली आहेत. तेथील २५ एकरात लागवडीचे काम झाले असून आंबा, लिंबू, वड आणि पिंपळ यांच्या सात हजार रोपांची लागवड तेथे करण्यात आली आहे.

अण्णा जगताप यांच्या नेतृत्वाखाली नांदेड, नाशिक, पालघर अशा वेगवेगळ्या शिक्षक-विद्यार्थ्यांचे गट ऑनलाईन माध्यमातून भेटतात. वृक्षलागवडीसंबंधी चर्चा करतात आणि उरलेल्या सहा दिवसांत त्याची कृती करतात. वेगवेगळ्या ठिकाणी लावलेली ही झाडे जगवण्यासाठी त्या त्या गावातील मुलांनी एकत्र आले पाहिजे व रविवारी एक तास त्या झाडांना पाणी घातले पाहिजे असाही विचार मांडला व कृतीत आणला गेला. एकेका गावात पाच पाच हजार झाडे या कल्पनेतून लावली आणि जगवली गेली आहेत.

वाढदिवस, विवाहासारख्या शुभप्रसंगी आपण देशी वृक्षांची रोपे भेट दिली पाहिजेत असा जगताप यांचा आग्रह आहेत. ते सांगतात, त्यांच्या जिल्ह्यात शंभरएक विवाहांमध्ये नवदाम्पत्याला तीस रोपे भेट दिली गेली आहेत. त्याचे संगोपन त्यांनी करायचे असे सांगितले जाते. वाढदिवसाला, पुण्यस्मरणाला त्या कुटुंबाला झाड दिले पाहिजे, वाढदिवसाला केक कापण्याऐवजी फळे कापली पाहिजेत अशा अनेक या उपक्रमांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. झाडांचा गणपती अशी संकल्पनाही राबवली जाते. आपल्या घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या अवतीभोवती छोटी छोटी रोपे ठेवायची आणि दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला ती रोपे प्रसादरूपात द्यायची असाही एक उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो.

फक्त संवर्धन नाही तर विक्रीही

अण्णा जगताप हे फक्त उत्पादन घ्यायलाच शिकवत नाहीत तर उत्पादनाच्या विक्रीचीही साखळी त्यांनी शेतकऱ्यांना तयार करून दिली आहे. ११० व्हॉट्सअप ग्रूपच्या माध्यमातून ही फळे, उत्पादने थेट किरकोळ बाजारापर्यंत तसेच घरापर्यंत पोहोचतात. काही टन झेंडू, हजारो कलिंगडे विकण्याचा विक्रम या नेटवर्कच्या माध्यमातून सिद्ध झाला आहे.

माझे आयुष्य निसर्गसंवर्धनासाठी

ज्यादिवशी माझे वडील वारले त्यादिवशी मी निश्चय केला की यापुढचे सर्व आयुष्य हे निसर्ग संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी द्यायचे. त्यासाठी रुपयाचाही मोबदला घ्यायचा नाही, असेही आधीच ठरवले. सध्या या सर्व उपक्रमांसोबत निसर्गशाळेतील उपक्रमांची माहिती देणाऱ्या एका पुस्तिकेचेही काम अण्णा जगताप करीत आहेत. शालेय मुलांना या वयातच निसर्ग संवर्धनाची दिलेली शिकवण ते आयुष्यभर जपतील असा विश्वास वाटला म्हणून मी निसर्गशाळा हा उपक्रम सुरू केला, असे सांगत त्याची फळे पुढच्या पिढ्यांना मिळतील व ते ही असे उपक्रम करण्यास प्रेरित होतील, असा आशावादही ते व्यक्त करतात.

एखादी गोष्ट मनात आणणे आणि कृतीत उतरवणे यात अंतर असतेच. पण त्या कृतीतली तळमळ आणि त्या मागचा उद्देश जर विधायक असेल तर त्याला प्रतिसादही तसाच मिळतो. अण्णा जगताप या हाडाच्या शिक्षकाने निसर्ग संवर्धनाची ही पालखी आज अनेक छोटी छोटी मुले आपल्या खांद्यावर घेत आहेत. भविष्यात असे अनेक अण्णा जगताप तयार व्हावेत आणि हा वसा असाच वाढता रहावा हीच सदिच्छा!

मुलाखत आणि शब्दांकन – मृदुला राजवाडे

**

Back to top button