RSSSeva

रामदासजी … समाजाला आत्ता तुमची खरी गरज होती!

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात असलेल्या देवळी कराड या अगदी छोट्याशा गावातून सुरू झालेला रामदासजी गावित यांचा प्रवास काल अचानक थांबला… अगदी अनपेक्षितपणे आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना! अवघ्या ५५ व्या वर्षी कोरोनारुपी राक्षसाने रामदास गावित यांच्यासारख्या आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला आपल्यातून अक्षरशः ओढून नेले.

तब्बल ३६ वर्षे आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण न क्षण ज्यांनी कल्याण आश्रमासाठी व्यतीत केला, त्या रामदासजींचे असे अचानक जाणे सर्वच कार्यकर्त्यांना खूपच चटका लावून गेले. अवघ्या एकोणिसाव्या वर्षी समाजासाठी काम करण्यास सुरुवात केलेल्या रामदासजींनी आपल्या ३६ वर्षांच्या सामाजिक जीवनात जनजाती समाजाला संघटित करण्यासाठी, त्यांना विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी जे अतोनात कष्ट घेतले त्याची मोजदाद करणे खरोखरच अत्यंत अवघड काम आहे.

आज सकाळीच ही घटना सांगण्यासाठी बस्तरला डॉ. राम गोडबोले यांना फोन केला होता. खरेतर त्यांना ही दुर्दैवी घटना कळाली असेल अशी अपेक्षा होती, पण अचानक रामदासजीच्या निधनाची बातमी ऐकताच झालेल्या डॉ. राम यांच्या मनाच्या अवस्थेचे वर्णन करणे कठीण आहे. या धक्क्यातून सावरल्यानंतर अगदी प्रारंभीच्या काळात रामदासजींसोबत केलेल्या कामाचा, पंधरा- वीस किलोमीटर पायी चालत केलेल्या प्रवासाच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

खरेतर रामदास गावित नावाचे हे रत्न प्रथम सापडले ते डॉक्टर गोडबोले यांना! बोलताना त्यांनी या अवघ्या १८-१९ वयाच्या या युवकाची कल्याण आश्रमातील प्रवेशाची गोष्ट सांगितली. कार्यकर्ता कसा सापडतो, कामाची प्रेरणा त्याच्यात कशी निर्माण होते, कार्यकर्ता म्हणून तो कसा घडतो आणि पाहता पाहता समाजाचा, संघटनेचा तो कसा आधार बनतो याचे रामदास गावित हे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल.

१९८३ ते ८८ या काळात डॉ. राम गोडबोले नाशिक जिल्ह्यातील कनाशी केंद्रावर पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. या ठिकाणी डॉ. मधुकर आचार्य यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून कल्याण आश्रमाची मुहूर्तमेढ रोवली होती. या कार्याचा अधिक विस्तार करण्यासाठी नंतर डॉक्टर गुही येथे गेले. सातारा येथीलच डॉ. रामचंद्र गोडबोले हे कनाशी केंद्रावर दाखल झाले. डॉक्टर असल्याने स्वाभाविकपणे कनाशीचे वैद्यकीय केंद्र आणि काठरा येथील उपकेंद्र चालविण्याची त्यांच्याकडे जबाबदारी होती. एके दिवशी अठरा-एकोणीस वर्षाचा एक युवक रुग्ण या नात्याने कनाशीच्या दवाखान्यात आला होता. कार्यकर्ता येणाऱ्या-जाणाऱ्या पेशंटशी ज्या सहजतेने बोलतो तसेच डॉक्टर या युवकाशी बोलले. ‘तुझ्यासारख्या युवकांनी आपल्या समाजासाठी काम केले पाहिजे. बघ इथे काम करायला येतोस का?’ असे सहज डॉक्टर गोडबोले त्या युवकाला बोलून गेले. सामाजिक काम म्हणजे काय, इथे काय काम करावे लागते, आर्थिक व्यवस्था काय आहे असे सहज स्वाभाविक प्रश्न या युवकाला पडले. त्याचे थोडक्यात उत्तर डॉक्टरांनी दिले आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी हा युवक कनाशी केंद्रावर कार्यकर्ता म्हणून दाखल देखील झाला.

अशा रीतीने डॉक्टरांना एक सहाय्यक या नात्याने रामदास पुंजाराम गावित या युवकाने आपल्या कल्याण आश्रमाच्या कामाचा श्रीगणेशा केला. केस पेपर काढणे, रुग्णांना औषधे देणे, औषधाचे सॉर्टिंग करणे, सगळ्या रुग्णांची नोंद नीट ठेवणे अशी अनेक कामे उत्साहाने हा युवक करू लागला. कनाशीची ओपीडी तर त्या काळात अक्षरशः भरून व्हायची. कळवण तालुक्यातील दूरदूरच्या पाड्यावरून १५-२० किलोमीटर पायी चालत रुग्ण केवळ विश्वासापोटी कनाशीच्या केंद्रावर येत असत. त्यातच रामदासजींसारखा त्याच परिसरातील युवक या ठिकाणी काम करत असल्याने लोकांचा विश्वास अधिकच वाढला.

डॉ. गोडबोले यांच्यासोबत चार वर्ष रामदासजीनी प्रचंड अनुभव संपादन केला. या सर्व काळात त्यांची कामावरील निष्ठा, प्रामाणिकपणा, समाजाच्या प्रगतीविषयीची तळमळ, लोकांशी सहज संवाद -संपर्क अशा अनेक गुणांचे दर्शन झाले. डॉ. गोडबोले यांच्यासोबत चार वर्षे काम केल्यानंतर काही काळासाठी रामदासजी घरी गेले होते. मात्र डॉ. आचार्यांनी त्यांना पुन्हा कामात आणले. कनाशीच्या केंद्रावर वैद्यकीय सहाय्यक म्हणून त्यांनी केलेल्या अनुभवाला कुठल्यातरी अभ्यासक्रमाची जोड दिली पाहिजे असे लक्षात आल्याने श्री. बाळासाहेब दीक्षित यांच्या सांगण्यावरून त्यांना नर्सिंग या विषयातील पुढील शिक्षण देण्याचा निर्णय करण्यात आला. त्यासाठी त्यांना लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात मेल नर्सिंग कोर्स साठी पाठविण्यात आले. याठिकाणी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते जेव्हा आपल्या घरी आले, तेव्हा खरे तर नोकरी सहजपणे उपलब्ध होईल असा तो काळ होता. मात्र त्या काळात पुन्हा कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ म्हणून काम करायचे असा त्यांनी निर्णय केला आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते याच कामात तनमनाने कार्यरत राहिले.

कनाशी नंतर सुरगाणा येथे कल्याण आश्रमाच्या फिरत्या दवाखान्यावर त्यांनी अनेक वर्ष वैद्यकीय सेवेचे काम केले. अनेक डॉक्टर सहकारी या काळात येऊन गेले.पण रामदासजी मात्र स्थिरपणे, त्याच निष्ठेने, त्याच प्रामाणिकपणे हे काम करत राहिले. या दवाखान्याच्या निमित्ताने सुरगाणा व कळवण तालुक्यातील हजारो वनवासी बांधवांचे ते ‘ रामदासभाऊ ‘ बनले. प्रत्यक्ष कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना देखील वैद्यकीय क्षेत्राचे त्यांचे ज्ञान आश्चर्य करावे असे होते. हे ज्ञान त्यांनी केवळ अनुभवाच्या आधारावर प्राप्त केले होते. मात्र हे करत असताना केवळ वैद्यकीय सेवा देण्यापेक्षाही आपल्या जनजाती समाजाचा विकास हे त्यांचे प्रमुख लक्ष्य होते. त्यातूनच गावागावांमध्ये आरोग्यरक्षक व्यवस्था उभी करणे, त्यांना प्रशिक्षित करणे आणि त्यांच्या माध्यमातून ग्रामविकासाचा सारख्या कल्पना प्रत्यक्षात राबवणे यासाठी ते अधिक वेळ देऊ लागले. वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने आलेल्या संपर्काचा त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी खूप सुंदरपणे उपयोग केला. त्यातूनच महाराष्ट्रात आरोग्यरक्षक योजनेचे एक खूप मोठे जाळे निर्माण करण्यामागे त्यांचे अथक प्रयत्नच कारणीभूत होते. या योजनेच्या माध्यमातून समाजासाठी तळमळीने कार्य करणारे अनेक कार्यकर्ते नंतरच्या काळात कल्याण आश्रमाला प्राप्त झाले.

मात्र एवढ्या दीर्घ अनुभवी व समाजमनाची नस नी नस ठाऊक असलेल्या त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला केवळ वैद्यकीय सेवेत अडकवणे संघटनेला प्रशस्त वाटले नाही. संघटनात्मक कामासाठी त्यांच्या संपर्काचा व कर्तृत्वाचा उपयोग करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रांताचे सहसंघटन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हे त्यांचे कार्यक्षेत्र बनले. पाड्यापाड्यावर त्यांनी प्रवास करून तरुणांना जोडणे, आपल्या जनजाती समाजासाठी काम करण्याची त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत करणे, समाजासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेणे अशी अनेक कामे त्यांनी मोठ्या कौशल्याने केली. नंतरच्या काळात एक व्यवस्था म्हणून कोकण प्रांताची स्वतंत्र रचना झाली. त्या प्रांताचे पहिले प्रांत संघटन मंत्री म्हणून रामदास गावित यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. कोकण हा तसा वनवासी-शहरवासी असा मिश्र स्वरूपाचा प्रांत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून मुंबई, ठाणे, कल्याण अशा मोठ्या महानगरांमध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी कार्यकर्त्यां सोबतच ग्रामीण भागामध्ये निष्ठेने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची एक सर्वसमावेशक टीम बनविण्याचे श्रेय निश्चितपणे रामदासजींना जाते.

शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष ठेवत वाटचाल करणारे कार्यकर्ते हेच संघटनेचे प्रमुख आधार असतात. रामदास गावित अशा कार्यकर्त्यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. प्रत्यक्ष जमिनीवर राहून काम करण्याचा रामदासजींचा जेवढा अनुभव होता तेवढा अनुभव कदाचितच अन्य कुठल्याही कार्यकर्त्याचा असावा. कल्याण आश्रमाचे महाराष्ट्रात काम सुरू होऊन साधारण ४२ वर्ष झाली आहेत. त्यातले ३६ वर्षे तर रामदासजी या सगळ्या कामात केवळ सहभागीच झाले नाही, तर या कामाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. एक प्रदीर्घ कालावधी वनवासी क्षेत्रात व्यतीत करत असतानाच एका अर्थाने महाराष्ट्रातील कल्याण आश्रमाच्याच नव्हे तर जनजाती समाजाच्या प्रगतीचे देखील रामदासजी एक साक्षीदार राहिले आहेत.

समजून-उमजून काम करणे हा त्यांच्या स्वभावाचा एक विशेष पैलू होता.शांतपणे कार्यकर्त्याचे मतं ऐकून त्यावर कुठली आक्रस्ताळी प्रतिक्रिया न देता सकारात्मक मत व्यक्त करणे ही त्यांची विशेषता होती. एवढी प्रदीर्घ वर्षे कामात असून देखील आपल्या कामाचा, अनुभवाचा मोठेपणा त्यांनी आपल्या बोलण्या – वागण्यातून कधीही दिसू दिला नाही. जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांसोबत ते ज्या नम्रतेने व सहजपणे वागत- बोलत तेवढ्याच नम्रपणे नवीन आलेल्या कार्यकर्त्यांशी देखील त्यांचा व्यवहार असे. शांतपणे कुणालाही न दुखवता आपले मत मांडण्याची त्यांची विशिष्ट हातोटी होती. शहरातील असो की प्रत्यक्ष ग्रामीण भागातील, सर्व कार्यकर्त्यांशी त्यांचा खूपच चांगला संपर्क होता. कुणालाही न दुखवता, वाद न घालता वैचारिक विरोधकांना देखील आपल्या विचाराने जिंकण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे रामदासजी म्हणजे एका अर्थाने अजातशत्रू होते.

खरेतर गेल्या १८ दिवसांपासून कोरोनासोबत त्यांची झुंज चालू होती. आपल्यातील सकारात्मतेच्या बळावर त्यांची ही झुंज यशस्वी होईल असे वाटले होते. कार्यकर्ता या नात्याने ३६ वर्षे त्यांनी जोडलेली हजारो कुटुंबे, रामदासभाऊ या नात्याने त्यांच्यात निर्माण केलेले अतूट असे नाते, जनजाती समाजातील शेकडो तरुणांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी केलेली निरपेक्ष मदत व मार्गदर्शन या सर्व पुण्याईच्या बळावर कोरोना सारख्या रोगाला ते सहज हरवतील अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने हे व्हायचे नव्हते. रामदासजींच्या रूपाने एक स्थिर व निर्मळ मनाचा, विचारावर ठाम निष्ठा असलेला एक समंजस, शांत, निगर्वी असा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे.

गेल्या काही वर्षांपासून जनजाती समाजात जे संभ्रमाचे व विद्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे, त्या सगळ्या वातावरणाला शांतपणे सामोरे जात, समाजात कुठलीही कटुता निर्माण होऊ न देता हे वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विचारी व समंजस नेतृत्वाची सध्या आवश्यकता होती.

रामदासजी….
ही जबाबदारी तुम्हाला सांभाळायची होती.
कारण…
आत्ता समाजाला तुमची खरी गरज होती !!

Back to top button