Opinion

पीपीई आणि मास्कचे निर्जंतुकीकरण करणारे ‘वज्र कवच’

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी अशा अनेक कोरोना योद्ध्यांचे सुरक्षा कवच  ‘वज्र कवच’ च्या साहाय्याने निर्जंतुक करून ते पुनर्वापरास योग्य  ठरण्यास  मदत होत आहे.  मुंबई स्थित  ‘इंद्रा वॉटर’  या स्टार्टअप द्वारा विकसित करण्यात आलेली ही निर्जंतुकीकरण प्रणाली व्यक्तिगत सुरक्षा उपकरण (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट), एन 95 मास्क, कोट आणि गाउन मुळे  निर्माण होणाऱ्या सार्स – कोव -2  विषाणूचे कोणतेही संभावित जंतू नष्ट  करते. ही  प्रणाली कोरोना योद्धयांद्वारे वापरल्या गेलेल्या  पीपीई आणि अन्य साहित्यांचा शास्त्रीय पद्धतीने  पुन्हा उपयोगात आणण्यास मदत करीत आहे.  या  प्रणालीचा उपयोग केवळ  कोरोना योद्धयांनाच नव्हे तर जैव  वैद्यकीय कचरा कमी करण्यासही उपयुक्त ठरणार आहे.  जैव  वैद्यकीय कचरा कमी झाल्यामुळे याचा  फायदा  पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही उपयुक्त ठरेल.   

या प्रणालीद्वारे अगदी काही मिनिटांत या वस्तूंवरील विषाणू नष्ट होतात. या प्रणालीची निर्मिती मुंबईतील भिवंडी स्थित इंद्रा वॉटर कारखान्यात  केली जाते.

‘इंद्रा वॉटर’ चे  सह-संस्थापक अभिजीत वीवीआर सांगतात की,  “या प्रणालीत  सूक्ष्मजीवांची संख्या  १ लाख पटीने कमी करण्याची क्षमता आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचेच झाले तर, याच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर असे निदर्शनास आले की, आम्ही विषाणू  आणि विषाणू नष्ट करण्यामध्ये  5 लॉग (99.999%) रिडक्शन मिळविले  आहेत.  निर्जंतुकीकरणाच्या  प्रक्रियेनंतर जीवजंतू नष्ट होतात, ती  सापेक्ष संख्या  दर्शविण्यासाठी ‘लॉग रिडक्शन’ चा उपयोग केला जातो.

आयआयटी, मुंबईच्या  बायोसायन्स आणि बायोइन्जिनियरिंग विभागामार्फत या प्रणालीचे सत्यापन व चाचणी घेण्यात आली. ‘वज्र कवच’  ची चाचणी आणि  पडताळणीची प्रक्रिया  बर्‍याच दिवसांच्या कालावधीनंतर पार पडली. याची तपासणी एस्चेरीया व्हायरस एमएस 2 (सिंगल-स्ट्रेन आरएनए व्हायरस आणि इन्फ्लूएंझा व्हायरस आणि कोरोनाव्हायरस सारख्या मानवी श्वसन प्रणालीला नुकसान करणाऱ्या  विषाणूंचा भाग) आणि ई. कोली  स्ट्रेन सी 3000 चाचणी करून करण्यात आली.  

एका पीपीईवर विषाणू आणि जिवाणूंचे नमुने ठेवण्यात आले. त्यानंतर त्या पीपीईला ‘वज्र कवच’ मध्ये ठेवण्यात आले.  निर्जंतुकीकरण प्रक्रियेनंतर  पीपीई ला बाहेर काढून  विषाणुंचा वृद्धिदर आणि लॉग रिडक्शन पाहण्याकरिता त्या नमुन्यांची पुन्हा पडताळणी करण्यात आली.  अभिजीत पुढे म्हणाले की, या प्रणाली मध्ये पीपीईवर असलेल्या विषाणू, जिवाणू आणि इतर सूक्ष्मजंतूंना निष्क्रिय करण्यासाठी  प्रगत ऑक्सीकरण, कोरोना डिस्चार्ज आणि  यूवी-सी लाइट स्पेक्ट्रम चा समावेश असलेल्या मल्टी-स्टेज निर्जंतुकीकरण प्रक्रियेचा उपयोग केला जातो. ज्याची कार्यक्षमता  99.999% पेक्षा जास्त आहे.

अभिजीत नमूद करतात की, जैव-वैद्यकीय कचरा ही जगापुढील एक मोठी समस्या आहे. त्यात आता कोरोनामुळे पीपीई कीट, मास्क या नवीन  जैविक कचऱ्याची भर पडली आहे.  यांचा एकदा वापर केल्यानंतर ती पुनर्वापरात आणली जात नाहीत.  त्यामुळे या वस्तू  फेकण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो का, या विचाराअंती त्यांना सोप्या परंतु प्रभावी अशा ‘ वज्र कवच’  ची कल्पना सुचली.

मार्च २०२० मध्ये संपूर्ण जगभरात कोरोनाने हैदोस घातला होता.  महामारीपासून स्वतःसोबत कुटुंबियांचेही रक्षण करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले.  या महामारीचा सामना करण्यासाठी आपल्या देशाला आपण  नक्की कशाप्रकारची मदत करू शकतो याचा विचार करण्यास आम्ही सुरवात केली. त्यावेळी  पीपीई किट आणि एन 95 मास्कला  मोठी मागणी असल्याचे आमच्या लक्षात आले.  आपला देश आपल्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी संघर्ष करीत आहे. आमच्या कोरोना योद्धांना त्यांचे मास्क आणि पीपीई पुन्हा वापरण्यास सक्षम कसे  करता येतील, याचा विचार करताना आम्हाला वज्र कवच ही  एक सोपी निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुचली, असेही अभिजीत सांगतात.  

अभिजीत पुढे म्हणतात की,   ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी  इंद्रा वॉटरने आपले  जलशुद्धीकरण तंत्रज्ञान संशोधित करून पूर्णपणे स्वदेशी निर्जंतुकीकरण प्रणाली स्वीकारली आहे.  या निर्जंतुकीकरण प्रणालीच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येणारा प्रत्येक घटक भारतात तयार केला जातो.  बाहेरून काहीही खरेदी केले जात नाही. “

 आयआयटी बॉम्बे रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा शाह म्हणतात, “वज्र कवचची  निर्जंतुकीकरण प्रक्रिया  ही अत्यंत सुंदर,  वापरकर्त्यासाठी अनुकूल आणि सोयीची आहे.  आमच्या 25  बेड्स च्या  कोविड केअर सेंटरसाठी ही व्यवस्था पुरेशी आहे. यामुळे आम्हाला अधिक नवीन पीपीई खरेदी करण्याची आवश्यकता भासत  नाही.  मुंबईतील कामा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय यासारख्या मुंबईतील इतर काही रुग्णालयांतही वज्र कवच निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे.

अभिजीत पुढे सांगतात की,   अनेक कर्मचाऱ्यांबरोबर याविषयी बोलल्यानंतर असे लक्षात आले की,  ते या  प्रणालीचा  उपयोग  केवळ  N95 मास्क आणि  पीपीईकिट निर्जंतुक करण्यासाठीच करत नाहीत तर यात  आयसीयू मध्ये वापरण्यात येणारे लॅब  कोट, मास्क, एप्रन, फेस शील्ड, वैद्यकीय उपकरणे, गीअर व इतर वैद्यकीय कपड्यांच्या वस्तूदेखील निर्जंतुकीकरण केल्या जात आहेत.  

अभिजीत पुढे म्हणाले की ते आता या यंत्रणेची कॉम्पॅक्ट आणि अधिक यूजर-फ्रेंडली अशी  दुसरी आवृत्ती घेऊन येत आहेत . “पीपीई किट्स मोठ्या आकारात असल्याने आम्हाला आमच्या यंत्रणेमध्ये त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी लागली. परंतु आता आम्ही ही प्रणाली कॉम्पॅक्ट बनविण्याची योजना आम्ही आखत आहोत. ” 

सौजन्य : पीआयबी  

Back to top button