CultureInternational

भारतीय नादसाधनेवर वैश्विक मान्यतेची मोहोर

भारतीय रागदारी संगीत हा आपला अतुल्य, अमूल्य वारसा आहे. आजही देशविदेशातील अनेक जण ही कला जोपासत आहेत, त्याची साधना करीत आहेत, आपली ही संस्कृती पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करत आहेत. तर काही जण त्यात आगळेवेगळे प्रयोग करून देशाच्या नावलौकिकात भर घालण्याचेही कार्य करीत आहे. असाच एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात रोवला गेला आहे तो संदीप रानडे या प्रयोगशील कलावंतामुळे.

नुकताच, जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित ऍपल डिझाईन पुरस्काराचा निकाल घोषित झाला. यातील ‘बेस्ट इनोव्हेशन’ श्रेणीतील पुरस्कार संदीप रानडे यांनी तयार केलेल्या ‘नादसाधना’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या मोबाईल ऍपला घोषित झाला आहे. भारतीय ऍप डेव्हलपरला दुसऱ्यांदा ऍपलचा हा पुरस्कार मिळाला असून नादसाधनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय संगीताशी संबंधित ऍपला हा पुरस्कार मिळाला आहे. ‘ऍप विथ ह्युमन टच’ हे त्यांच्या वेबसाईटवर उमटणारे पहिले वाक्यच ऍपच्या निर्मितीमागचे मर्म उलगडत जाते.

संदीप रानडे हे पेशाने सॉफ्टवेअर इंजीनिअर आणि जन्मजात कलावंत. वयाच्या चौथ्या वर्षीपासून रागदारीचे गायनाचे शिक्षण घेणाऱ्या संदीप यांना पुढे डॉ. शोभाताई अभ्यंकर आणि पं. जसराजजी यांची दीक्षा मिळाली. गाण्याची एवढी ओढ असताना इंजिनिअरिंगकडे कसे वळलात असे विचारल्यावर ते म्हणाले, मला संगीत आणि इंजिनिअरिंग हे फार वेगळं वाटतच नाही. दोन्हीतही शास्त्र आणि कला आहे. या दोन्ही समांतर जाणाऱ्या गोष्टी आहेत. याचाच उपयोग मला पुढे संशोधनात, मोबाईल ऍप्लिकेशन तयार करताना झाला.

अमेरिकेत गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर काही वर्षांपूर्वी संदीप रानडे पुण्यात परतले आणि पत्नी मेघना यांच्यासोबत ‘एण्डलेस एज्युकेशन’ नावाचे स्टार्ट अप सुरू केले. कॉर्पोरेट जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुणांचे प्रशिक्षण ते देतात. संगीत क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, गुरुकुल पद्धतीत ज्या प्रमाणे विद्यार्थ्याला गुरुकडून प्रत्यक्ष ज्ञान घेता येते ती परंपरा पुढे सुरू झाली पाहिजे, वेळ आणि तंत्रज्ञान या दोन्हीचा वापर करून गाणे टिकवण्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे असे संदीप यांना वाटत होते. त्यात सध्या कोरोनाच्या काळात संगीत शिकणे, साधना करणे हे अजून कठीण झाले आहे, अशा वेळी विद्यार्थ्याला चांगली साथ मिळाली पाहिजे असे त्यांचे मत होते. या सगळ्या विचारांची आणि साडेतीन वर्षांच्या कष्टांची फलश्रुती म्हणजे नादसाधना ऍप. यासाठी त्यांनी मदत घेतली ती आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची.

संदीप सांगत होते, “नादसाधना या ऍपमुळे गायकांना, वादकांना घरी एकट्याने रियाज करताना तानपुरा, तालवाद्यांपासून पियानोपर्यंत वेगवेगळ्या दहा वाद्यांची साथसंगत लयीनुसार, तालानुसार व पट्टीनुसार मिळत जाते. जुलै २०१८मध्ये सुरांची साथ करणारे एक व्हर्जन मी लाँच केले. त्याचा फायदा अनेक गायकांना झाला. त्यानंतर मी त्यात स्वरमंडल हे वाद्य जोडले. पुढे खरेखुरे वाटणारे तानपुरे मी त्या ऍपमध्ये जोडले. आताही बाजारात काही तानपुऱ्याची यंत्रे मिळतात पण त्यांचे सूर अत्यंत कृत्रिम वाटतात. भोपळा असणाऱ्या तानपुऱ्यात घुमणारा सूर आणि त्या यंत्रातून उमटणारा सूर यात फार अंतर आहे. गायकाला खराखुरा तानपुरा वापरून गायल्याची भावना मनात येईल अशी त्याची रचना केली. मी ट्यून केलेला तानपुरा पं. उल्हास कशाळकरांना ऐकवला. त्यांनीही ते अस्सल वाटत असल्याची ग्वाही दिली.”

त्यानंतरचे आव्हान होते ते तबल्याची रचना या ऍपमध्ये जोडण्याचे. ४,६,८ मेट्रोनोमप्रमाणेच ताल वाजवणारी तबलायंत्रे आज मिळतात. पण जो थेट तबला सादर करतो तो इतके यांत्रिक कधीच वाजवत नाही. तो त्यात स्वतःचा असा टच देतो. त्यात वेगळेपण दाखवताना थोडा बदल करतो. या यंत्रामुळे तोटा असा झाला आहे की, आज अनेक गायक केवळ ठराविक मीटरमध्येच वाजणाऱ्या तबल्यावर गाऊ शकतात. साथ करणाऱ्या तबलजीने जराही बदल केला की गाण्याची घडी विस्कटते. खरे तर गायक आणि तबलजी यांच्या कलासादरीकरणातील वेगळेपणातून, संवादातून एक वेगळेच चित्र रसिकांसमोर रंगविले जाते. पण कृत्रिमपणे वाजविण्याच्या या पद्धतीमुळे हा संवाद हरवत चालला आहे. संगीताच्या विकासासाठी हानीकारक असणारा हा प्रकार लक्षात आल्याने संदीप यांनी आपल्या ऍपमध्ये मानवी पद्धतीने वाजवल्या गेलेल्या तबल्याची रचना केली. तालयोगी पं. सुरेश तळवलकरांना हे दाखवले. त्यांनीही तो खराखुरा वाटत असल्याचे सांगितले.

“तबल्यानंतर मी पाश्चात्य संगीतासाठी उपयोगी ठरणाऱ्या काही हार्मनी तयार केल्या. हळूहळू तानपुरा, हार्मोनिअम, सूरपेटी, स्वरमंडल, तबला, व्हायोलिन, घुंगरू, पियानो, मंजिरा आणि शेकर अशा दहा वाद्यांचा समावेश या ऍपमध्ये झाला. त्यापुढे महत्त्वाचे ठरणार होते ते ही सगळी वाद्ये एकाच वेळी वाजल्यावर त्यांचे ट्युनिंग होणे. त्यासाठी एक कंडक्टर आर्टिफिशिअल इंटिलिजन्स तयार केला. मल्टिट्रॅक रेकॉर्डिंग त्यात तयार केले. या ऍपमुळे घरात बसून स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या दर्जाचे काम करता येऊ शकते”, संदीप रानडे सांगत होते.

या ऍपच्या आधारे प्रायोगिक तत्त्वावर स्वतःची काही रेकॉर्डींग केली व ती संगीतक्षेत्रातील नामवंतांना ऐकवली, पण ऍपबद्दल न सांगता. त्यांना त्याची सांगितिक रचना ही मूळ वाद्यांवर केल्यासारखीच वाटली. जेव्हा या ऍपबद्दल समजले तेव्हा ते अचंबित झाले इतकी ती मूळाबरहुकुम होती, अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. सध्या या ऍपमध्ये हिंदुस्थानी आणि कर्नाटकी पद्धतीचे १५० राग, अनेक ताल, उपरोक्त वाद्ये यांचा समावेश आहे.

ऍपलच्या निवडप्रक्रियेबद्दल विचारले असता ते म्हणाले, “काही लाख मोबाईल ऍप्लिकेशनची निवड ऍप्पल कंपनी स्वतः करते. त्यातून कल्पक अशा मोबाईल ऍप्सना पुरस्कार दिला जातो. नादसाधनामुळे दुसऱ्यांदा भारताला हा पुरस्कार मिळाला आहे. भारतीय संगीत क्षेत्राशी संबंधित ऍपला पहिल्यांदाच असा पुरस्कार मिळाला आहे.”

स्वतःचे स्टार्ट अप, जुळ्यांचे पालकत्व आणि व्यक्तिगत संगीत साधना अशा व्यस्त दिनक्रमातही कलेप्रती समर्पित होऊन संदीप रानडे यांनी केलेले हे संशोधन संगीताच्या प्रवासात मैलाचा दगड ठरू शकेल. गीत, वाद्य आणि नृत्य या तीनही संगीतसाधना अशा प्रयोगांमुळे अधिकाधिक समृद्ध होत जातील आणि भारताचे नाव जगाच्या पटलावर अधिक उंचावत जातील.
**

Back to top button