Opinion

बुद्धिमत्ता, रणनीती आणि दृढनिश्चय

निश्चयाचा महामेरू । बहुतजनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ||

एक उत्तम प्रशासक म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व योजना त्याही काळात नाविन्यपूर्ण, व्यावहारिक आणि आधुनिक म्हणाव्यात अशाच होत्या. अलौकिक बुद्धिमत्ता ही विधायक कामासाठी सत्कारणी लावणारे महाराज, त्यांच्या प्रशासकीय कल्पना एक उत्तम मूल्यांचा साक्षात्कार म्हणाव्यात अशा आहेत. उत्तम कार्य करणारे, कायद्यांची निर्मिती करणारे, आणि तेवढ्याच ताकदीने न्यायाची बाजू मांडणारे राजा कालस्य कारणम् असे छत्रपती.

पुन्हा पुन्हा त्यांचे चरित्र वाचताना आजही अनेक आश्चर्य आपल्यासमोर येतात. चैतन्य, कल्पनाशक्ती आणि प्रेरणा म्हणून शिवाजी महाराजांचा वारसा आपल्यासमोर आहे. शिवाजी महाराज होते म्हणून १७ व्या शतकात मुघल साम्राज्य मोडकळीस आले अन्यथा भारतीय इतिहास हा कदाचित वेगळा राहिला असता. आपण एक विनाशकारी मार्गाचे प्रवासी झालो असतो. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याला आत्मविश्वास दिला. अन्यथा युरोपातील व्यापाऱ्यांनी भारताचे अनेक तुकडे केले असते.

आजही शिवाजी महाराजांचे भारतीय इतिहासातील योगदान योग्य पद्धतीने अधोरेखित करण्याची गरज अजूनही आहे. १३ व्या ते १७ व्या शतकाच्या दरम्यान संत महात्म्यांनी आणि कवींनी मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागृती केली. मुहम्मद राजवटीतील असमानतेस आणि एक अर्थाने हिंदू धर्मावरील अन्यायास वाचा फोडली. या काळात सुफी, पीर आणि फकीर यांनी दक्षिणेत मोठ्या प्रमाणात सत्तेच्या साहाय्याने धर्मपरिवर्तन केले. याच काळात महाराष्ट्रात मोठी संतपरंपरा निर्माण झाली. महाराष्ट्राने संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत सेना न्हावी, संत कान्होपात्रा, संत चोखमेळा, संत जनार्दन स्वामी, संत तुकाराम आणि संत रामदास.या पार्श्वभूमीवर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा या अर्थाने हिंदू संरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जन्म झाला

नैतिक मूल्य आणि हिंदू संस्कृती परंपरा या दृष्टीने संतांचा अधिक सहभाग राहिला. सामाजिक आणि राजकीय जाणीव या दृष्टीने जागृती करणारे संत रामदास. शिवाजी महाराजांनी राजकीय जाणीव निर्माण केलीच पण मराठा स्वातंत्र्याच्या दिशेनं त्यांनी ताकदीच्या जोरावर पाऊल टाकले. शिवाजी महाराजांनी जनतेला स्वराज्याची विशाल दृष्टी दिली. हा काळच असा होता शिवाजी महाराजांना काही स्वकीयांनी विरोध केला. अध्यात्माच्या आणि पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या जनतेतून मावळे घडवणे तसे सोपे नव्हते. आणि त्यात मराठा स्वातंत्र्य ही मोठी भूमिका सर्वसामान्य माणसाला स्वीकारण्यासाठी पूरक असे वातावरण नव्हते.

अनेकदा मोठ्या हालचाली या छोट्या छोट्या घटनांनी सुरु होतात . म्हणून या काळाला हरी नारायण आपटे यांनी आपल्या कादंबरीला उषःकाल असे नाव दिले. आबाजी महादेव यांनी कल्याण सुभेदाराच्या सुनेला छाप्यानंतर दरबारात आणले असता महाराजांनी तातडीने मान सन्मानासहित त्यांना घरी पाठवले. ही गोष्ट म्हणून आपल्याला माहित आहे. मुघल इतिहासकार खाफी खान म्हणतो, मुघल स्रिया आणि मुले ताब्यात सापडल्यानंतर त्यांचा सन्मान राखण्यासाठी शिवाजी महाराज सावध असायचे. यासाठी त्यांचे निर्णय अतिशय कठोर होते आणि कुणी उल्लंघन केले तर त्याला तशी शिक्षा मिळायची. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर औरंगजेबाने नेताजी पालकरांना कुटुंबासहित अटक करून धर्मपरिवर्तन केले. मुस्लिम बनवले. मुघल सैन्यात काबुल येथे दहा वर्षे घातल्यानंतर नेताजी पालकर यांची महाराजांची भेट झाली. आणि पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला .

शिवाजी महाराजांचे साधेपण इतके की फ्रेंच राजदूत एम जर्मेन लढाईच्या दरम्यान शिवाजी महाराजांसाठी एक तंबू आणि एक सहकारी यांच्यासाठी एक असायचा. उलट औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी पाठवलेल्या महाबल खान यांच्याकडे दक्षिणेच्या स्वारीत काबुल आणि कंदाहार मधील ४०० हुन अधिक नृत्यांगना असायच्या.

१६ एप्रिल १६७३ शिवाजी महाराजांनी चिपळूण सैन्य दलातील जुमलेदार, हवालदार आणि कारकून यांना एक पत्र लिहलेले आहे. त्यात सामान्य शेतकऱ्याच्या भाकर, फाटे, भाजी याला हात लावत असेल तर रयतेला मुघल राज्य आहे असे वाटेल त्यामुळे आपली वर्तणूक नीती नियम यांना अनुसरून असणे आवश्यक आहे. रयतेची कोंडी होता कामा नये आणि आवश्यक गोष्टी स्वतः खरेदी कराव्यात अशी ताकीद दिली.

सामान्य माणसातून तानाजी मालुसरे, येसाजी कंक, जिव्हा महाला, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर अशी असामान्य नेतृत्व शिवाजी महाराजांनी घडवली. वयाच्या १५ व्या वर्षी रोहिरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याचे स्वप्न पाहणारे शिवाजी महाराज यांनी आपल्या साथीदारांच्या साहाय्याने शपथ घेतली. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे महत्व यासाठी बालवयात एक दृष्टीने त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि तसे ते जगले. एकेक पाऊल उचलत असताना त्यांना पुढचे पाऊल अधिक स्पष्ट झाले. जहागीरदारांना पराभूत केले, किल्ले सुरक्षित केले, आदिलशाहीचा पराभव केला, मोगलांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती घोषित केले.

राज्यभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची योजना केली ती जनतेच्या कल्याणासाठी. याचा व्यवस्थापकीय भाग राजव्यवहारकोश या नावाने तयार करण्यात आला. महापुरुषांच्या आयुष्यात चढ उतार असतात. शिवाजी महाराज एका पाठोपाठ आलेल्या अनेक संकटातून पुन्हा पुन्हा बाहेर पडत गेले. त्यामुळे एकत्रितरित्या त्यांनी पराभूत पण अनुभवले नाही. संकटांनी त्यांच्यामध्ये कडवटपणा सुद्धा निर्माण केला नाही. उलट शिवाजी महाराजांचे व्यापकपणे वाढत गेले. भीतीबरोबर त्यांनी द्वेष भावनेवर मात केली. म्हणून त्यांचे मोठेपण आपण अनुभवतो. महाराजांची बुद्धिमत्ता, रणनीती आणि दृढनिश्चय आणि स्वतःच्या ध्येयावरचा विश्वास आपल्याला प्रभावित करतो.

शिवाजी महाराजांनी सामान्य मनांच्या बळावर रयतेचे राज्य निर्माण केले. सामान्य घरातील पुरोहित असणारे मोरोपंत पिंगळे प्रधान मंत्री सामान्य हिशेबनीस आजी दत्तो राज्याचा आर्थिक कारभार पाहत होते. सोनाजी पंत डबीर यांनी वाटाघाटी केल्या . ३५ वर्षाच्या सततच्या कामामुळे महाराजांच्या आरोग्याची हानी झाली. महाराष्ट्राच्या मातीने अनुभवलेले शिवाजी महाराज आज त्यांचा वाढलेला विस्तार आपण जगतो आहोत. १९ व्या शतकाच्या दरम्यान इंग्रजांना मुख्य शत्रू मराठे होते. १७ वे शतक आपण मुघालंचे म्हणतो १९ वे ब्रिटिशांचे पण खऱ्या अर्थाने १८ वे शतक हे मराठयांचे राहिले आहे. शिवाजी महाराजांनी राष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली.

प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता |. शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||.

प्रतिपदेचा चंद्र कसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र, म्हणजे कल्याणकारी वाटते.’

संजय साळवे

Back to top button