National SecurityNaxalismNews

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी माओवादी फादर स्टॅन स्वामीचे निधन

मुंबई, दि. ५ जुलै : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी माओवादी फादर स्टॅन स्वामीचे (८४) निधन झाले. शहरी नक्षलवाद भडकवण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या स्टॅन स्वामीवर प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ मेपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु ५ जुलै रोजी आरोग्यविषयक गुंतागुंतीमुळे त्याचा मृत्यू झाला.

पुण्यात डिसेंबर २०१७ साली एल्गार परिषदेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या एल्गार परिषदेमध्ये फादर स्टॅन स्वामी ने केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे भीमा कोरेगावात दंगल उसळली, असा गंभीर आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला होता. त्यावेळी अनेक दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला होता. या घटनेप्रकरणी अनेकांना माओवाद्यांशी संपर्क असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती. त्यात स्टॅनचाही समावेश होता.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात एनआयएने असाही आरोप केला होता की, स्टॅन आणि त्याचे सहकारी बंदी घातलेल्या माकपा (माओवादी) या संघटनेच्या संपर्कात आहेत. एनआयएने प्रतिज्ञापत्र सादर करून स्टॅन याच्या जामिनाला विरोधही केला होता. दरम्यान. स्टॅन याच्या आजाराचा काहीही ठोस पुरावा नसून स्टॅन हा माओवादी आहे आणि देशात अशांतता निर्माण करण्यासाठी तो षडयंत्र रचत असल्याचा दावाही एनआयएने केला होता.

**

Back to top button