News

सावरकरांच्या विचारांचे स्मरण म्हणजेच विज्ञानवादाचे स्मरण – डॉ. गिरीश पिंपळे यांचे प्रतिपादन

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर हे कृतिशील विज्ञानवादी होते.  लोका सांगे ब्रह्मज्ञान… असे ते नव्हते. १९२४ ते १९३७ या काळात त्यांना रत्नागिरीत ब्रिटिश सरकारने स्थानबद्ध केले होते, तेव्हा तेथे त्यांनी समाजसुधारणा आणि विज्ञानवादाची चळवळच चालविली होती. सावरकरांनी मार्सेलिस बंदरात जाण्यासाठी बोटीतून उडी टाकली होती, त्याबाबत सर्व जगात त्यांची ती उडी गाजली, त्यामुळे ब्रिटिशांच्या अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधले गेले. मात्र या उडीबाबत सावरकर म्हणाले की, मी मारलेली उडी विसरलात तरी चालेल पण मी सांगितलेले समाजसुधारणेचे विचार विसरू नका. त्यांचे हे विचार विज्ञानवादातून आले आहेत, त्यांच्या विचाराचे स्मरण म्हणजेच विज्ञानवादाचे स्मरण आहे, असे असे प्रतिपादन डॉ. गिरीश पिंपळे यांनी बुधवारी केले.


मराठी विज्ञान परिषद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त आयोजनातून बुधवारी ७ जुलै २०२१ या दिवशी झूम संपर्क माध्यमाद्वारे ऑनलाइन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात डॉ. पिंपळे बोलत होते.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्रिखंडात गाजलेल्या ८ जुलैच्या साहस दिन म्हणजेच सावरकर यांच्या मार्सेलिस उडीला १११ वर्षे पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम झाला. यात विज्ञानवादी सावरकर या विषयावरील हे व्याख्यान आयोजित केले होते.


डॉ. पिंपळे यांनी आपल्या व्याख्यानात विज्ञानवाद म्हणजे काय हे सांगताना ते म्हणाले की, ते म्हणजे  तर विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. समाजात चालत आलेल्या रुढी, परंपरा या बुगद्धी आणि तर्काच्या निकषावर घासून त्या स्वीकाराव्यात अन्यथा त्या टाकून द्याव्यात. हा दृष्टिकोन म्हणजेच विज्ञानवाद आहे.


सावरकर हे कवि, साहित्यिक होते. देशभक्त , हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते होते. त्यांची अशी विविध रूपे उभी राहातात. मात्र त्यांचे व्यक्तिमत्त्व यापुरते मर्यादित नव्हते, त्यापलीकजे जाणारे होते. त्यांचे अनेक पैलू समाजापुढे आलेले नाहीत. त्यांचे द्रष्टेपण, विज्ञानवाद, समाजसुधारणा या बाबी लोकांसमोर आलेल्या नाहीत, असे ते म्हणाले.


त्यांनी सांगितले की, सावरकर हे कृतिशील विज्ञानवादी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूचे महत्त्व आगवेवेगळे आहेत ८०-९० वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत. ते कालबाह्य अजिबात झालेले नाही. कारण मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले तरी ५० वर्षे झाली तरी अंधश्रद्धा टिकून आहेत.  त्या संबंधात पिंपळे यांनी अलीकडेच नाशिकच्या कृषि उत्पन्न बाजार समितीचे उदाहरण दिले. तेथे अमावस्याला लिलाव होत नव्हते अजूनही होत नाहीत, मात्र कोरोनामुळे ते यावेळी झाले. इतकी अंधश्रद्धाही आहे त्यामुळे  समाजाने सावरकर यांच्या विचाराचे स्मरण करण्याची गरज आहे.

डॉ. पिंपळे यांनी सांगितले की, विज्ञानात एखादा सिद्धात मांडलेला असतो. त्यानुसार प्रयोग करून तो बरोबर आहे का ते पाहिले जाते. निरीक्षण करून निष्कर्ष काढले जातात. या विज्ञानातील पद्धतीमधील पायऱ्या सामाजिक जीवनातही वापरल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी सावरकरांनी आग्रह धरलेला होता. एकाबाजूला सावरकर कडवे हिंदुत्ववादी होते. तरी त्याचवेळेला त्यांनी हिंदुसमाजातील भ्रामक समजावर टीका केली. हिंदु धर्माचे अनुयायी होते. मात्र केवळ अनुयायी नव्हते तर डोळस अभिमानी आणि अनुयायी होते.    त्यांनी घातक गोष्टीवंर टीका केली. मात्र संपूर्ण धर्मावर त्यांनी टीका केलेली नाही तर धर्मातील काही परंपरांवर टीका केली.  भ्रामक समजुतींमागे लागल्याने समाजाचे नुकसान झाले, लढाया हरल्या,  हिंदु समाजाने दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी व्हावे व या तळमळीतून त्यांनी हे विचार मांडले. भूतकाळात जे नुकसान झाले ते वर्तमानात व भविष्यकाळात होऊ नये, अशी तळमळ त्यांना होती आणि त्यातून ही टीका. मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मातील बाबींवरही टीका केली. मात्र हिंदु समाजावर अधिक रोख होता. कारण आपला समाज बळकट व्हावा अशी त्यांची धारणा होती.


त्यांनी केलेल्या लेखनातील लेखांची शीर्षके पाहिली तर सावरकर यांच्या दृष्टीकोनाचा नक्कीच उलगडा होतो. असे सांगून डॉ. पिंपळे यांनी सावरकर यांच्या लेखांची शीर्षके सांगितली. त्यात  ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’, ‘इश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय’, ‘यज्ञाची कुळकथा’, ‘खरा सनातन धर्म कोणता’, ‘गोपालन हवे गोपूजन नको’,  ‘यंत्राने का बेकारी वाढते?’, ‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’, ‘धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल असे एकच बळ आहे, आणि ते म्हणजे विज्ञानबळ’ आदी शीर्षकांचा समावेश आहे. त्यांनी विविध लेख लिहिले, भाषणे दिली यातून यज्ञ, फलज्योतिष, अन्त्यसंस्काराची पद्धती आदी विविध रुढी कालबाह्य कशा झाल्या आहेत, ते समाजाला पटवून दिले.  


डॉ. पिंपळे म्हणाले की, सामान्य माणूस  परंपरा, रुढींना चिकटून तो त्यापासून बाजूला होत नाही. त्यामागे अभिमान, भीती असते.  रुढी आमचे पूर्वज हजारो वर्षे पाळत होते मग पूर्वज मूर्ख होते का, असे विचारतात. याबाबत सावरकर काय म्हणतात तर, मागच्या परिस्थितीत एखादी रुढी उपयुक्त असली किंवा त्याकाळच्या भौतिक ज्ञानाच्या मानाने सिद्धांत बरोबर वाटला तरी आजच्या काळात तो रुढी सिद्धांत अयोग्य वाटला वा त्याने काही हानी होत असेल तर त्याचा त्याग केला पाहिजे. प्रयोगाने तो अयशस्वी  असेल तर सोडून द्यावा. त्याने पूर्वजांचा काही अपमान होत नाही.


सावरकर यांच्या या भूमिकेतूनच त्यांचे महत्त्व लक्षात येते. त्याचप्रमाणे ते म्हणतात की, ५००० वर्षांपूर्वीच्या पोथ्यात सांगितलेली प्रत्यक गोष्ट आम्ही जर अद्ययावत विज्ञानाच्या कसोटीवर पारखली नाही, प्रत्यक्षनिष्ठ ज्ञानाच्या विरुद्ध जाताच किंवा आजच्या परिस्थितीत हिंदुराष्ट्राच्या हितासाठी हानीप्रद ठरताच तात्काळ ते टाकून दिले नाही तर तर  त्यामुळे हिंदुराष्ट्र आणि धर्मही मागासलेला राहील. वैज्ञानिक युगातील टकराटकरीत आपण टिकाव धरू शकणार नाही, असे सावरकर यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे डॉ. पिंपळे यांनी स्पष्ट केले.
अन्त्यसंस्कार संबंधात सावरकर यांनी  पर्यावरणपूर्वक विचार ८०-९० वर्षांपूर्वी मांडला. हिंदू व्यक्तींचे दहन लाकडे वापरून करून नका तर विद्युतदाहिनीत करा. यामुळे  ते आद्य पर्यावरणवाद आहेत असे म्हणावेसे वाटते.मृत्युपत्रातही त्यांनी विद्युतदाहिनीत आपल्या शरिराचे दहन करावे असे म्हटले होते, हे ही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.


फलज्योतिष. ग्रहण याबाबतही सांगताना सावरकर यांनी ग्रहांचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, मंगळ या ग्रहामध्ये कोणतेही अमंगळ नाही. ग्रहणात अशुभ असे काहीच नाही, असे स्पष्टपणे सांगत लोकांना विज्ञानवादी बनवण्याचाच प्रयत्न त्यांनी केला होता, असे डॉ. पिंपळे म्हणाले.


हिंदू समाजाला जखडून ठेवणाऱ्या सात बेड्यांबद्दल म्हणजेच सात बंद्यांबाबत सावरकर यांनी महत्त्वाचे काम केले त्या बेड्या तोडल्या. त्यामधील स्पर्शबंदी संबंधात ते म्हणाले की, ठरावीक जातीच्या लोकांना स्पर्श करू द्यायचा नाही. देवळात बंदी घालायची. मात्र हे लोक कुत्र्यामांजरांना ते शिवतात असा प्रकार मानवजातीचा कलंक आहे. ज्याने विटाळ होतो तो देवच नव्हे. रोटी बंदीबाबत ते म्हणाले होते की, खाणेपिणे हा वैद्यकशास्त्राचा प्रश्न आहे. वैद्यक दृष्टीने जे अन्न आरोग्य देते ते कोणत्याही मनुष्याबरोबर खायला हरकत नाही. त्यामुळे जात जात नाही, धर्म बुडत नाही, जात ही रक्तबीजात असते, भाताच्या पातेल्यात नाही,. धर्माचे स्थान हृदय असते पोट नव्हे. असे ते सांगतात. हे सांगणे ‘ विज्ञान सुभाषिता’सारखे आहे, असेही यावेळी डॉ. पिपंळे यांनी सांगितले.


दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणुबॉम्ब टाकला गेला आणि महायुद्ध संपले. त्यानंतर १९५३ मध्ये सावरकर म्हणाले की, भारतानेही अणुबॉम्ब बनवावा. इतकेच नव्हे तर हायड्रोजनबॉम्ब, ऑक्सिजनबॉम्ब, जंतु अस्त्रही तयार करण्याकडे लक्ष द्यावे. केसरीमध्येही त्यांनी त्यासंबंधात एक लेख लिहिला. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि चीनकडून १९६२ च्या युद्धात थपडा खाव्या लागल्या होत्या. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना यांनी अणुबॉम्बची चाचणी केली, म्हणजे सावरकर यांच्या सांगण्यानंतर या संबंधात तब्बल २१ वर्षे जावी लागली, असेही सांगत सावरकर यांचे द्रष्टेपण सांगितले. सावरकर हे अनादि आहेत, अनंत आहेत कारण त्यांचे विचार अनंत काळापर्यंत मार्गदर्शन असणारे आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


Back to top button