Opinion

पाश्चात्य देशांतील प्रसारमाध्यमांचा खोडसाळ पक्षपातीपणा

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) च्या वतीने नुकत्याच केलेल्या सर्वक्षणानुसार पाश्चात्य देशांतील प्रसारमाध्यमांनी भारतातील कोविड परिस्थितीबाबत अप्रामाणिक आणि पक्षपाती वार्तांकन केल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्या स्वार्थ भावनेने पाश्चात्य देशांतील प्रसारमाध्यमांनी या अयोग्य वार्तांकनामुळे जगात भारताची प्रतिमा भलेही मलीन केली आहे. तरीही जगातील अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अधिक प्रभावीपणे सामना केला. पण ही बाब जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमांवर कधीही दाखवण्यात आली नाही, हेही तितकेच खरे.

आयआयएमसीच्या वतीने जून २०२१ मध्ये ‘पाश्चात्य देशांतील प्रसारमाध्यमांद्वारे भारतातील कोविड-१९ महामारी वार्तांकनाचे अध्ययन’ या मथळ्याखाली करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून एका आठवड्यात ५२९ प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. ज्यामध्ये २१५ मीडिया स्कॉलर्स, २१० पत्रकार आणि १०४ मीडिया शिक्षकांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार ८२ टक्के भारतीय प्रसारमाध्यमे प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार पाश्चात्य देशांतील प्रसारमाध्यमांनी भारतातील कोविड परिस्थितीबाबत ‘अप्रामाणिक’ वार्तांकन केले असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याव्यतिरिक्त ६९ टक्के प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे असेही म्हणणे आहे की, या अप्रामाणिक वार्तांकनामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली गेली आहे. इतकेच नाही तर ५६ टक्के जणांचे असे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या वार्तांकनामुळे परदेशातील प्रवासी भारतीयांच्या मनात भारताबद्दल नकारात्मकता निर्माण झाली आहे.

पाश्चात्य देशांतील प्रसारमाध्यमांद्वारे सुरु करण्यात आलेले भारतातील कोविड-१९ महामारीचे वार्तांकनाबाबत नकारात्मक अभियान, हे भारत जेव्हा दुसऱ्या लाटेत कोरोना महामारीशी लढण्यात व्यस्त होता त्यावेळी सुरु करण्यात आले असल्याचे ३७ टक्के जणांचे म्हणणे होते. तर २५ टक्के जणांचे असे म्हणणे होते की, पहिल्या लाटेपासूनच हे नकारात्मक अभियान चालविण्यात आले. तर २१ टक्के जणांचे असे म्हणणे होते की, भारताने जेव्हा कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीच्या परिक्षणाची घोषणा केली, तेव्हापासून हे नकारात्मक अभियान चालविण्यात आले. तर १७ टक्के लोकांनी भारताने ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ सुरु केली तेव्हापासून हे नकारात्मक अभियान चालविण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

हे अयोग्य, नकारात्मक, अप्रामाणिक वार्तांकन करण्यामागील कारण काय, याचाही यावेळी मागोवा यावेळी घेण्यात आला. त्यानुसार असे लक्षात आले की, आंतरराष्ट्रीय राजकारण (५१%), भारतातील अंतर्गत राजकारण (४७%), फार्मा कंपन्यांचे स्वार्थ (३४%) आणि आशियातील क्षेत्रीय राजकारण आदी महत्वपूर्ण कारणांचा समावेश आहे.

पहिल्या लाटेच्या वेळी भारताने चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती. हे करत असतानाच जागतिक सार्वजनिक आरोग्य प्रदाता म्हणून भारताचा उदय झाला होता. तसेच कोरोनाची दुसरी लाट विक्रमी वेळेत भारताने थोपवून धरली. गेल्या काही महिन्यांमध्ये आपत्कालीन औषधे, पीपीई किट्स आणि लसीद्वारे भारत आपली आरोग्य यंत्रणा सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

समोर येणार्‍या आव्हानांचा सामना करत, यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न भारताकडून नेहमीच सातत्याने केला जातो. त्यात त्याला मिळणाऱ्या यशावर वक्रदृष्टी असणाऱ्यांची ही कुकर्मे जास्त काळ टिकणारी नाहीत. कारण कोरोनासारख्या महामारीत स्वतःच्या लस तयार करून भारताने स्वतःचे नाव सिद्ध करून दाखवले आहे. या लसींचा फायदा भारताच्या शेजारील राष्ट्रे आणि मित्र राष्ट्रे यांनाही झाला आहे. या जगात सर्वजण सुरक्षित राहावेत, ही भारताची भावना कधीच लोप पावली नव्हती. ती दिवसेंदिवस वाढतच गेली. याच पार्श्वभूमीवर भारताविषयी कितीही अप्रामाणिकपणे लिहिले गेले तरीही भारत जगाचे लक्ष सतत आपल्याकडे खेचून घेत राहील, आणि भारताची जागतिक नेतृत्व होण्याकडची वाटचाल अखंड चालू राहील यात तीळमात्र शंका नाही.

Back to top button