Opinion

हम किसीसे कम नही…

आज महिला चूल आणि मूल या परिघात न राहता  उंबरठ्याच्या बाहेर असलेली आपली स्वप्ने पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यास सामर्थ्यवान ठरल्या आहेत.   शिक्षण, नवे मार्ग आणि बदलणारे दृष्टिकोन यामुळे त्या आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.  सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहून संपूर्ण समाजासोबतच देशासाठीही अभिमान आणि कौतुकास्पद अशा भारताच्या सुकन्या ठरत आहेत. आज राजकारण, तंत्रज्ञान, संरक्षण समवेत ज्या ज्या क्षेत्रात त्या उतरल्या आहेत. त्या त्या क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. आपली कामगिरी सिद्ध करून दाखवली नाही, असे एकही क्षेत्र नाही त्यांनी सोडलेले नाही. यापैकीच  एक क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र.

क्रीडा स्पर्धांमध्ये टिकण्यासाठी,  यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारी  शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती खूप मोलाची कामगिरी बजावते.  शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महिलांची पुरुषांच्या तुलनेत कमी असते, हा पूर्वापार असलेला सर्वसाधारण समजही महिलांनी खोडून काढला. खेळ या  पुरुषप्रधान संस्कृतीतही भारतीय महिलांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात  पुरुष खेळाडूंइतकीच, काकणभर जास्त चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यांची प्रेरणा घेऊन इतर महिलाही मैदानात उतरत आहेत, स्वतःला सिद्ध करीत आहेत. आपल्या देशाची प्रतिमा उंचावत आहेत.

२३ जुलैपासून  सुरु  होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक २०२० साठी सज्ज झालेल्या बहुतांश रणरागिणी या लहान शहरे आणि ग्रामीण भागातील आहेत.  प्रत्येक खेळाडू महिलेचा स्वतःचा संघर्ष आहे, अनेक  वर्षांची मेहनत आहे.  केवळ स्वतःचेच नाही तर देशाचेही नाव उंचावण्यासाठी तयार असलेल्या, इतर महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणाऱ्या या रणरागिणींच्या कार्यक्षेत्राचा आढावा घेऊया…  

बॉक्सिंग हा खेळ मुळातच पुरुष खेळाडूंचे प्राबल्य असलेला खेळ. अशा खेळात भारतीय महिला सहसा भाग घेत नाहीत. मात्र बॉक्सर एम.सी.मेरी कोम हिने केवळ एकदा नव्हे तर पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवीत भारतीय महिलाही बॉक्सिंगमध्ये कारकीर्द करू शकतात हे दाखवून दिले आहे.  विलक्षण जिद्द, कठोर व अविरत परिश्रम, जबरदस्त आत्मविश्वास याचा सुरेख समन्वय साधणारी मेरी कोम ही जगातील अनेक सुपरमॉम महिला खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनली आहे. मेरी कोमसह आसाममधील लोवलिना बोरगोहैन,  पूजा राणी, सिमरनजीत कौर या आपापल्या वजनी गटातून टोकियो ऑलिम्पिक २०२० साठी सज्ज झाल्या आहेत.  

जिद्द म्हणजे काय आणि जिद्दीच्या जोरावर यशाला कशी गवसणी घालायची, याचे उत्तम उदाहरण म्हणून साईखोम मीराबाई चानू हिच्याकडे पाहता येईल. मीराबाईचा जन्म मणिपूर, इंफाळ येथील लहानशा गावात झाला. जागतिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून तिने जिद्दीचे दर्शन घडवले आहे. खरेतर रिओ ऑलिम्पिकमध्येच तिच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या, परंतु तिथे अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे ती निराश झाली होती. अपयशामुळे एखादा खेळाडू खचू शकतो, परंतु मीराबाई चानू खचली नाही, तर ते अपयश मागे टाकून नवे शिखर सर करण्यासाठी इरेला पेटली. जागतिक स्पर्धा ही तिच्यासाठी संधी होती. आणि सुवर्णपदक मिळवून तिने या संधीचे खरोखर सोने केले.  

हरयाणाच्या गोहानामधील मदिना या छोट्याशा गावात लहानाची मोठी झालेली  युवा कुस्तीपटू सोनम मलिक  65 किलो वजनी गटात भारताचे  प्रतिनिधीत्व करते. कझाकिस्तानमध्ये पार पडलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत तिने कझाकिस्तानच्या खेळाडूचा पराभव करून ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. यावेळीच तिला दुखापत झाली होती. जखमी असूनही गोल्ड मेडलसाठी ती दिवस-रात्र तयारी करत आहे.  भारतीय महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला हिने ५० किलो वजनी गटात टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. जागतिक ऑलिम्पिक कुस्ती पात्रता स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकचे तिकिट मिळवणारी सीमा ही दुसरी भारतीय ठरली आहे.

 राजस्थानमधील राजसामंड जिल्ह्यतील छोटय़ाशा कब्रा गावातील अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या भावना जाट हिने चालण्याच्या राष्ट्रीय शर्यतीत विक्रमासह सुवर्णयश मिळविले आणि टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवेशही निश्चित केला. २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीसाठी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भावना ही दुसरीच भारतीय महिला ठरली.

अंजली भागवत, तेजस्विनी सावंत यांच्यासारख्या खेळाडूंनी नेमबाजीत जागतिक स्तरावर अनेक विक्रम केले आहेत. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये नेमबाजीत कारकीर्द करू इच्छिणाऱ्या मुलींची संख्या वाढत चालली आहे.  यावर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणारी रांचीतील  महिला तिरंदाज दीपिका कुमारीने पॅरिसमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप तिरंदाजीत एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या प्रकारांत सुवर्णपदके जिंकली. ती जागतिक रँकिंगमध्येही अव्वल झाली. दीपिकाने आजवर मिळावलेल्या पदकांची संख्याही मोठी आहे. तिरंदाजीच्या विविध वर्ल्ड कपमध्ये तिने नऊ सुवर्ण, १२ रौप्य आणि सात ब्राँझपदकांची कमाई केली आहे. याशिवाय दोन राष्ट्रकुल सुवर्णपदके, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन रौप्यपदकेही तिने पटकावली आहेत. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या दीपिकाच्या आयुष्याचा प्रवासही चढउतारांनी भरलेला आहे.  

भारताची आघाडीची नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्राची कन्या राहीने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. क्रोएशिया येथे होत असलेल्या यंदाच्या नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच सुवर्णपदक ठरले. याआधी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळाली होती.  कोल्हापूरची दिग्गज नेमबाज तेजस्विनी सावंत  2010 मध्ये ती 50 मीटर्स रायफल प्रोन इव्हेंटमध्ये म्युनिच स्पर्धेत विश्वविक्रमी कामगिरीशी बरोबरी करत सुवर्णपदकाची मानकरी ठरली. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी त्यावेळी ती पहिली भारतीय महिला नेमबाजही ठरली होती.  

तमिळनाडूची सीए भवानी देवी ही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. तलवारबाजीसाठी भारतात पोषक असे  वातावरण नाही, सुविधा नाहीत, स्पर्धा नाही तरीसुध्दा या खेळात भवानीने आज स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. तिचे वडील सी. सुंदररामन हे पुजारी आहेत तर आई सी.ए.रामानी या गृहिणी. त्यांनी तलवारबाजीतले काहीच माहित नसले आणि हा खेळ लोकप्रिय नसला तरी भवानीला हा खेळ खेळता यावा यासाठी ते मेहनत घेत आहेत.  भवानीने आपल्या परिश्रम आणि दृढनिश्चयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून भारताला एक नवीन ओळख दिली आहे.

मिझोरामच्या कोलासिब गावातून आलेल्या लालरेमसियामीचे  वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे.  लालरेमसियामी ने वयाच्या १५व्या वर्षी  दिल्लीतील राष्ट्रीय हॉकी अकादमीत प्रवेश मिळाला, तर काहीच दिवसांत तिने १८ वर्षांखालील संघात स्थान मिळवत आशिया कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले. आपल्या क्षमतेवर विश्वास असणाऱ्या लालरेमसियामीने २०१८ च्या महिला हॉकी वर्ल्ड कपमध्ये  प्रभावी कामगिरी केली होती. २०१७मध्ये तिने भारतीय वरिष्ठ संघात बेलारुसविरुद्ध पदार्पण केले. कोरियाविरुद्ध २०१७मध्ये आणि २०१९मध्ये स्पेनविरुद्धच्या कसोटी मालिकेत ती सर्वाधिक गोल करणारी हॉकीपटू ठरली होती.  

पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरच्या पिंगलामध्ये राहणारी प्रणती नायक टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची एकमेव महिला जिम्नॅस्ट आहे. प्रणतीने उलांबटरमध्ये आयोजित २०१९ आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. प्रणतीचे वडील बस ड्राइव्हर असून आई गृहिणी आहे. पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरच्या पिंगलामध्ये राहणाऱ्या प्रणती नायक टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची एकमेव महिला जिम्नॅस्ट आहे. प्रणतीने उलांबटरमध्ये आयोजित २०१९ आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. प्रणतीचे वडील बस ड्राइव्हर असून आई गृहिणी आहे. सागरी जलतरणातही महिला चांगली कामगिरी करू शकतात हे  भारतीय जलतरणपटू माना पटेल ने सिद्ध करून दाखवले. माना पटेल  टोकियो ऑलिम्पिकसाठी  पात्र ठरणारी तिसरी भारतीय जलतरणपटू आहे आणि पहिली भारतीय महिला ठरली आहे.  माना  टोकियोमधील महिलांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये भाग घेणार आहे.

प्रत्येक स्त्रीने स्वत: च्या सन्मानासाठी  स्वाभिमानाने वागले पाहिजे. आपल्याला  जे काही करावेसे वाटत असेल आणि ते योग्य असेल तर त्या मार्गात येणाऱ्या या प्रत्येक अडचणींवर मात करत  स्वत:ला सिद्ध करायला हवे.  आपल्या प्रत्येक चांगल्या कामाची दखल ही घेतलीच जाते. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आजच्या युगातील स्त्रीला कोणतीच गोष्ट अशक्य नाही,हेच या रणरागिणी आपल्याला त्यांच्या कर्तृत्वावरून दाखवून देतात.   हम किसीसे कम नही… या आत्मविश्वासाने जगात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या रणरागिणींना  मनापासून शुभेच्छा!

Back to top button