Opinion

कोरोना काळात मातृशक्तीचे दर्शन

कोरोना काळातही महिलांमधील कुटुंब वत्सलता अधोरेखित

कोरोना काळातील एकत्र आणि विभक्त कुटुंबातील काही निरीक्षणे लक्षात घेता एकत्र कुटुंबातील महिला बाधित होवूनही विभक्तकुटुंबातीलबाधीतमहिलांपेक्षा त्यांना ताण कमी आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकत्र कुटुंबात सर्व जबाबदाऱ्यांचे स्वाभाविक विभाजन होत असल्यामुळे या कुटुंबातील महिलांना तीव्र ताण जाणवला नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि भारतीय नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये असलेली ‘कुटुंबवत्सलता’ कोरोना काळात अधोरेखित झाली आहे. कोरोनाबाधीत नोकरदार महिलांनीही नोकरी, कुटुंब आणि कर्तव्य याचा मोठ्या धीराने समन्वय साधला.


शारदा शक्तीने केलेल्या कोरोना बाधित महिलांचे सर्वेक्षण यातील वस्तुस्थिती दर्शवते. त्यात ४८ टक्के बाधित महिला या ४१ ते ५५ वयोगटातील होत्या. एकत्र कुटुंबातील ३४ टक्के तर विभक्त कुटुंबातील ५१ टक्के स्त्रिया बाधित होत्या. तर ४३ टक्के गृहिणी आणि ५७ टक्के महिला नोकरी – व्यवसाय करणाऱ्या आढळून आल्या. ६५ टक्के महिलांना सह्व्याधी नव्हत्या तर ३६ टक्के महिलांना सह्व्याधी होत्या. रुग्णालयात भरती झालेल्या महिलांची संख्या २७ टक्के होती कोविड केअर सेंटरमध्ये गेलेल्या महिलांची संख्या १५ टक्के तर गृह विलगीकरणात ५७ टक्के महिला होत्या.


स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. म्हणूनच स्त्री आजारी तर संपूर्ण कुटुंबच आजारी पडल्यासारखे होते असा अनुभव कोरोना महामारी काळात अनेक ठिकाणी आला. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील बारामती आणि मावळ तालुक्यातील सर्व आर्थिक स्तरातील २५ ते ६५ या वयोगटातील कोरोनाबाधित विवाहित महिलांचे नुकतेच ‘शारदा शक्ती’ या संस्थेने सर्वेक्षण केले आहे. याविषयी नुकताच सर्वेक्षण अहवाल अखिल भारतीय महिला समन्वय संयोजिका गीताताई गुंडे आणि विज्ञान भारतीचे अखिल भारतीय संघटन सचिव जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला.


महिला शक्तीचे संघटन करून त्यांच्या क्षमतांचा विनियोग राष्ट्राच्या उत्कर्षासाठी व्हावा तसेचमहिलांचा सामाजिक आर्थिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास व्हावा या उद्देशाने विज्ञान भारतीच्या प्रेरणेने २००३ मध्ये शक्तीची स्थापना झाली आहे. देशभर कार्यरत असणारी ही संस्था महाराष्ट्रात ‘शारदा शक्ती’ म्हणून कार्यरत आहे. सद्यस्थितीत संपूर्ण जगाला व्यापलेल्या कोरोना महामारीच्या काळात शारदा शक्तीने कोरोना बाधित महिलांविषयक सर्वेक्षण केले आहे. विविध क्षेत्रातील महिला शारदाशक्तीसाठी कार्यरत आहेत.

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेक नागरिक बाधित झाले असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.त्यात अनेक महिलांचाही समावेश होता. शारीरिक, मानसिक लक्षणे आणि परिणाम यांच्यासह छोट्यातल्या छोट्या बदलांना, समस्यांना महिलांना सामोरे जावे लागले. खूप वेळा महिला आपली दुखणी अंगावर काढतात. मात्र कोरोना झाल्यावर अनेक महिलांना ताप, सर्दी, खोकला, वास, चव नसणे, थंडी वाजून येणे अशा अनेक लक्षणांसह रुग्णालयात भरती व्हावे लागले. काही सौम्य लक्षणे असलेल्या महिला घरी विलगीकरण होवून बऱ्या झाल्या. त्यावेळी त्यांना आलेल्या सामाजिक अडचणी, नातेवाईक, घरातील माणसे, मित्रमंडळी, शारीरिक, मानसिक समस्या जाणून घेऊन पुढील कोरोनाग्रस्त होणाऱ्या महिलांना सजग करता यावे, अशा समस्या पुढील बाधित होणाऱ्या महिलांना येऊ नये यासाठी शारदा शक्तीने बाधित महिलांचे सर्वेक्षण करून काही अनुमान काढले आहेत. एक स्त्री वाचली तर संपूर्ण कुटुंब वाचेल हा त्यामागचा विचार आहे. तिसऱ्या लाटेपासून किमान स्वतःचा बचाव करता येईल का आणि कोरोना झालाच तर काय काय काळजी आणि खबरदारी घ्यावी यासाठी अभ्यासपूर्ण वैज्ञानिक दृष्टीकोनातून शारदा शक्तीने ३०० महिलांच्या दूरध्वनीद्वारे मुलाखती घेतल्या आहेत. महिलांना काही प्रश्न विचारून त्यातून त्यांना जाणवलेले प्रश्न, तब्येती विषयक बारीकसारीक तक्रारी, कुरबुरी, कदाचित आपण आजारी पडलो त्यामुळे येणारे नैराश्याची भावना, नकारात्मकता, न्यूनगंड, भयगंड या सगळ्यांना स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी शारदा शक्तीने महिलांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यातून त्या महिलांच्या समस्या सुटण्यास मदत तर झालीच परंतु इतर महिलांनाही बोध मिळाला आहे.


या सर्वेक्षणातून काही महत्त्वाच्या गोष्टी महिलांच्या आरोग्य बाबत लक्षात आल्या आहेत. त्यात बहुतांश महिला ४० ते ५५ वयोगटातील होत्या असे चित्र समोर आले. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांचेही प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त आहे. नोकरी, व्यवसायामुळे महिलांना घराबाहेर पडावे लागले,त्यांचा जास्त नागरिकांशी संपर्क आला, त्या महिलांमध्ये संक्रमणाची शक्यता अधिक दिसून आली.सर्वेक्षणामध्ये निम्नआर्थिकस्तर, मध्यमआर्थिकस्तर, उच्चमध्यम आर्थिकस्तर व उच्च आर्थिकस्तरातील महिलांचा समावेश होता.यामध्ये निम्नआर्थिकस्तरातील महिलांना या आजाराचा मानसिक ताण तुलनेने अधिक आला. कारण उत्पन्नाची साधने बंद होती. रोजचा घरखर्च आणि त्यात आजारपणाचा वाढीवखर्च याचा ताण या महिलांना आल्याचे दिसून आले.


बहुतांशमहिलांनी 15 दिवस विश्रांती घेतली आणि त्यानंतर घरातील- घराबाहेरील कामे सुरू केली. त्यातील निम्म्याहून कमी महिलांना ऑफीस सुरू केल्यानंतर शारीरिक त्रास जाणवला. थोड्या प्रमाणात भूक न लागणे,चव न लागणे, खूप झोप येणे असा त्रास जाणवला.अशक्तपणा, स्नायूंची ताकद कमी होणे हा त्रास महिलांना तुलनेने अधिक प्रमाणात जाणवला.याचे कारण या महिलांना कामाचा ताण आला असावा, या महिलांची विश्रांती पुरेशी झाली नसावी,कोरोनानंतर त्यांनी स्वतःची पुरेशी काळजी घेतली नसावी, कोरोनानंतर घेण्याच्या काळजीबाबत त्या जागरूक नसाव्या,व्याधीची तीव्रता,परिणाम अधिक असावा महिलांमध्ये प्रतिकारशक्ती कमीअसावी अशी अनेक कारणे दिसून आली आहेत.


मानसिक लक्षणे – निरीक्षणे


कोरोना झाल्याचे प्रथमतः जेव्हा समजले त्यावेळी अधिकाधिक ताण आला अशा महिलांची संख्या कमी आहे. मात्र स्वतःपेक्षा घरच्यांची – नवरा, मुले यांची काळजी, त्यांचे कसे होईल, घरात कोण करेल, आजाराचे गांभीर्य, मृत्यूचीभीती, ऑफिसची जबाबदारी आणि सतत सभोवताली नकारात्मक परिस्थिती अशी अनेक कारणे जाणवली.


परिस्थितीशी समायोजन

काही महिलांना अजिबात ताण आला नाही.या महिलांनी या आजारातून आपण लवकर बरे होऊ असा सकारात्मक विचार केलेला दिसून आला.
महिलांना कोरोनासंदर्भातील त्यांनी घेतलेल्या अनुचित अनुभवांच्या आठवणी येत राहिल्या, अशा महिलांची संख्या कमी आहे.कदाचित हा त्यांच्या स्वभावाचा भाग असू शकेल.
त्याबद्दल बातम्या, चर्चा टाळल्या. बहुसंख्य महिलांना मानसिक ताण त्रासदायक पातळीवर जाणवला नाही. ही त्यांना बरे करण्यासाठी निश्चितच जमेची बाजू ठरली, निसर्गतः महिलांना परिस्थितीशी जुळवून घेता येते याचा प्रत्यय इथे आल्याचे जाणवते.

विलगीकरणासंबंधी निरीक्षणे-

बहुसंख्य महिलांनी विलगीकरणासाठी घर हा पर्याय निवडला. या महिला मध्यम ते उच्च मध्यम आर्थिक स्तरातील होत्या. तर निम्न आर्थिक स्तरातील बहुसंख्य महिलांनी विलगीकरणासाठीकोविड सेंटर हा पर्याय निवडला. खूपच कमी महिला रुग्णालयात दाखल झाल्या. बहुसंख्य महिलांमध्ये मध्यम ते तीव्र लक्षणे दिसत असूनही त्यांनी घरीच विलगीकरणात राहणे पसंत केले.याचे मुख्य कारण महिलांमध्ये कुटुंबापासून दूर एकटे राहण्याची तयारी नसते असे जाणवले लग्नानंतर सर्वस्व आपले कुटुंब अशी धारणा आणि मानसिकता तयार झाल्याने भारतीय नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये असलेली कुटुंब वत्सलता यात दिसून आली.
कोरोना काळातील एकत्र आणि विभक्त कुटुंबातील काही निरीक्षणे लक्षात घेता एकत्र कुटुंबातील महिला बाधित होवूनही विभक्त कुटुंबातील बाधीत महिलांपेक्षा त्यांना ताण कमी आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकत्र कुटुंबात सर्व जबाबदाऱ्यांचे स्वाभाविक विभाजन होत असल्यामुळे या कुटुंबातील महिलांना तीव्र ताण जाणवला नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि भारतीय नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये असलेली ‘कुटुंबवत्सलता’ कोरोना काळात अधोरेखित झाली आहे. कोरोनाबाधीत नोकरदार महिलांनीही नोकरी, कुटुंब आणि कर्तव्य याचा मोठ्या धीराने समन्वय साधला.


कौटुंबिक – सामाजिक सहयोग


बहुतांश घरांमध्ये महिलांना कुटुंबातील सर्व सदस्यांचा संपूर्ण सहयोग मिळाला.या महिला आजारी असताना कुटुंबातील सर्वांनी त्यांची खूप काळजी घेतली.घरातील महिलेला ‘कोविड’ झाला आहे, हे समजल्यानंतर बहुसंख्य कुटुंबांमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांनी परिस्थितीचा सकारात्मक स्वीकार केला. या गोष्टीचा या आजारातून लवकर बरे होण्यासाठी व स्वतःची सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी महिलांना उपयोग झाला. आम्हाला कुटुंबाचेमहत्त्व समजले असे महिलांनी आवर्जून सांगितले.बहुसंख्य महिलांना शेजारी, मित्र परिवार, विशेष करून घरामध्ये दैनंदिन कामासाठी येणाऱ्या महिला या सर्वांकडून सामाजिक सहकार्य मिळाले.

महिलाशक्ती- मातृशक्तीचा मिलाफ
या अहवालात सांखिकी विश्लेषकांच्या अनुभवाचा समावेश केला.ज्या कार्यकर्त्यानी मुलाखती घेतल्या त्यातील काही कार्यकर्त्यांच्या अनुभवांचा ही या अहवालात समावेश केला. कोरोनाच्या काळात विविध क्षेत्रातील अनेक महिला अधिकाऱ्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदार्यांधचे पालन करत सामाजिक कर्तव्याचेही धीराने पालन केले. अशा वैद्यकीय, पोलीस अधिकारी, उद्योजिका, बँक अधिकारी, शिक्षणाधिकारी,घरेलू कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधी अशा प्रातिनिधिक क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांनीकोविड काळातील परिस्थिती विषयी अनुभव व कोविडचीही परिस्थिती त्यांनी कशी हाताळली या विषयी मनोगताचा अहवालात समावेश आहे, सामाजिक संकटाच्या काळात सर्व क्षेत्रातील महिलांनी आपापल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करून, प्रसंगी प्रयत्नपूर्वक आपल्या क्षमता वाढवून या संकटाचा प्रतिकार केला, असे चित्र समोर आले. यातून यापुढे ही अशा प्रकारची संकटे अचानक आली तर त्याचा प्रतिकार करण्याच्या महिलांच्या क्षमता वाढविण्यासाठी सर्व महिला संघटनांनी तसेच शासकीय संस्थांनी नियोजन पूर्वक पावले उचलावीत या दृष्टीने शारदा शक्तीने या अहवालात काही शिफारसी मांडल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी दिशादर्शक तसेच सामुहिक सकारात्मकता आणि महिलांच्या सजगतेसाठी असे सर्वेक्षण मैलाचा दगड ठरेल.

अंजली तागडे
संपादक, विश्व संवाद केंद्र,पुणे

Back to top button