News

योग, गोमूत्र, आयुर्वेदावर निष्ठा असणारे ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

नवी दिल्ली, दि. १४ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे मंगळुरूमध्ये निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. जुलैमध्ये योगा करत असताना पडल्यामुळे त्यांना डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ऑस्कर फर्नांडिस यांचा योग, गोमूत्र आणि आयुर्वेदावर पूर्ण विश्वास होता. योग आणि आयुर्वेदाचे अनेक फायदे असून त्यावर ते मनमोकळपणे इतरांशी संवाद साधत. याविषयी ते इतरांना आपला सल्लाही देत.

ऑस्कर फर्नांडिस यांनी राज्यसभेत गोमुत्राबाबत अनेक फायदे सांगत त्यांनी स्वतःला गोमुत्राचा आलेला अनुभवही यावेळी सांगितला. यामध्ये त्यांनी मेरठ मधील एका आश्रमात जाऊन तेथील गोमूत्राच्या उपचारात मी गोमूत्राचे सेवन केल्याने माझा कर्करोग ठीक झाल्याचा दावा केला होता. फर्नांडिस योग, आयुर्वेदिक उपचार आणि भारतीय उपचार पद्धतीचेही कौतुक करताना म्हणाले होते कि, त्यांना एकदा गुडघेदुखीमुळे प्रचंड वेदना होत होत्या, त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी गुडघे बदलण्याचा सल्ला दिला होता. यावेळी गुडघे बदलण्यास त्यांनी नकार देऊन ते पुढे म्हणाले, ”मी वज्रासन सुरु केले आणि आज मी कोणत्याही त्रासाशिवाय कुस्ती खेळू शकतो, ” फर्नांडिस पुढे म्हणाले, योग आपली संपदा आहे. योग केल्यास आपल्या आरोग्यावरील खर्च ५० टक्क्यांनी कमी होतो. योग हे आयुष्य जगण्याची पद्धत आहे.

Back to top button