EducationOpinion

व्यक्तिगत मूल्य ते सामाजिक मूल्ये

वर्ष सरत गेली की काही गोष्टी या म्हटल्या तर उशिरा लक्षात येतात. अनुभव पदरी पडत जातो. पुस्तक जितके सोपे वाटते तितके वास्तव सोपे नसते. आजच्या तरुणाईच्या आयुष्यातील घडामोडी पाहता महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर एकेक पाऊल पुढे टाकत असताना समोर आव्हाने उभी राहतात. एका बाजूला जगाचा वेग वाढला आहे. त्यातून मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. आज आहे तर उद्या नाही. आज जे समजलं आहे, उद्या पुन्हा ते नव्याने वेगळ्या भाषेत समजून घ्यायला लागेल. आज जे महाविद्यालयात शिकलो ते लगेच उपयोगी पडेल असे नाही. ज्या प्रमाणात बाहेरचे वातावरण बदलते आहे त्या प्रमाणात आमच्या अभ्यासक्रमात वर्षानुवर्षे बदल झालेला नसतो. थोडाफार बदल झालेला असतो असतो प्रवाहाच्या रेट्यामुळे. तोही इकडून तिकडे उचलूनच अधिक आणलेला असतो.

त्यामुळे सातत्याने नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी होणे या काळातील ही मोठी परीक्षा आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा झाला आहे त्याची फारशी कुणाला खंत नाही. एका बाजूला जग काही काळ थांबले होते असे आपण म्हणत होतो. पण त्याच्या गतीने पुढे पुढे सरकत होते याची कल्पना येत नव्हती. बोलता बोलता केव्हा जग ऑनलाईन झाले याची आपल्याला कल्पना आली नाही. त्याचे फायदे तोटे याची आपण गोळा बेरीज करू पाहत आहोत. त्यात नावीन्य होते, उत्सुकता होती पण हळूहळू आपण यंत्रवत होत चालल्याची साक्ष पटत होते. हातात मोबाइलला धरल्यामुळे मानेचे, पाठदुखीचा आजार ते मुलांच्या डोळ्यावर प्रमाण करणारे तासनतास चालणारे शिक्षण आरोग्याचे नवीन आव्हान आपल्यासमोर आणताहेत.

करिअरच्या वाट निवडताना पालकांची आणि मुलांची मोठी ओढाताण होते आहे. सगळेच जण भविष्याची चिंता करत आहोत. आजूबाजूची वाढते अनिश्चिततेचे प्रमाण तरुणाईसाठी अजून संशय निर्माण करणारे आहे. पण वेगाने बदलणाऱ्या गोष्टी यामुळे निर्माण झालेली आव्हाने पाहता तिथेही कस लागणारच आहे. ऑनलाइनच्या शिक्षणात स्वतंत्र पद्धतीने विचार करण्याची ताकद विद्यार्थी हरवून बसला आहे. शाळा ते पदव्युत्तर शिक्षणाचा टीव्ही झालेला आपण पाहिला आहे. वाटलं की चॅनेल बदलायचा. नाही आवडलं की बंद करायचा. समोर आता जे होते ते थोड्या वेळाने बदलले आहे. वेळ भरून काढायचा उपक्रम आहे हा बाकी काही नाही.

गुगल वर शोधता शोधता एखादी गोष्ट मुळापासून वाचायची असते, ती नीट समजून घ्यायची असते.याचा संस्कार हरवत चालला आहे. आजच्या तंत्रज्ञानातील बदलानुसार चारोळ्याचे ज्ञान कवितेतून बाहेर पडून आता ते दाराशी येऊ पाहते आहे. या चारोळ्या आता बहुपर्यायी प्रश्नाच्या रुते आपल्यासमोर आल्या आहेत. शिक्षकांचे फक्त प्रश्नांशी देणेघेणे आहे आणि विद्यार्थ्यांचे उत्तराशी. मधे ज्ञान नावाची गोष्ट असते याचा सोयीस्कर विसर पडल्यासारखा वाटतो. इंटरनेटच्या जगात वेगाने मिळणारी माहिती आहे. ती तुकड्यात उपलब्ध आहे. त्यातले संपूर्णपण हे विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळत नाही. मुलं हल्ली गुगल असिस्टंटशी संवाद साधताना दिसताहेत. त्याची सुरुवातीला गंमत वाटते. संवादातले भाव, भावना, अर्थ आणि अन्वयार्थ हरवले जात आहेत. माहिती नक्की मिळणार आहे पण कळतनकळत सृजनशीलतेला धक्का लागतो आहे.

अनेक बदल अनपेक्षितपणे समोर येत असल्यामुळे त्याची उत्तरे शोधण्यासाठी तेवढी पूर्वतयारी झालेली नसते. त्यामुळे त्याची कारणमीमांसा करणे अवघड जाते. अशा अस्थिरतेला तोंड देण्यासाठी मुलं आता अधिक सक्षम बनवायला हवी. छोटे मोठे बदल हे सतत स्वीकारून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. अनेकदा भूतकाळ आपल्याला बरेच काही सांगू पाहत असतो. वर्तमानकाळ शिकवत असतो. आणि भविष्य विचार करायला लावते. या त्रयीचा विचार करता अनिश्चितता कळेल. जग अधिकाधिक गुंतागुंतीचे झाले आहे. समाजात आजूबाजूला दिसणाऱ्या समस्या आणि त्याचे परिणाम याचे अनेक स्तर आहेत. यामुळे एकाच वेळी अनेक लढायांवर तुम्हाला स्वर व्हावे लागते. एखादी गोष्ट वेगवेगळ्या माणसांकडून वेगवगेळ्या दृष्टिकोनातून समजून घ्यावी लागते. आपण घेतलेले, त्याच्या उमटलेल्या प्रतिक्रिया आणि उडालेला गोंधळ याचा साकल्याने विचार करायला लागतो.

काल परवापर्यंत आपण एकच फुटपट्टी वापरत होतो. आजही वापरतो. पण शिक्षण म्हटलं तर प्रत्येक शिक्षक वेगळा आहे आणि विद्यार्थीसुद्धा. त्यामुळे त्याचे मूल्यमापन करताना सारख्याच फूटपट्ट्या वापरणे किती आवश्यक असा प्रश्न पडत जातो. आपला मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळा महाविद्यालयांची परीक्षा व्हायला हवी. सगळ्याच गोष्टी पूर्णपणे स्पष्ट होत असतात असे नाही. किमान आभासी जगातील आणि वास्तवातील विरोधाभास किमान दूर होईल. व्यक्तिगत मूल्य ते सामाजिक मूल्ये या पर्यंतचा प्रवास नेमकी शाळेत, घरात कसा घडत जातो याची चर्चा नीटशी व्हायला हवी. सतत जागरूक असण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यामुळे अस्थिरता, अनिश्चितता, जटिलता आणि अस्पष्टता असणाऱ्या जगात सतत नव्या दिशेचा शोध घ्यावा लागतो. नवे मार्ग सहजतेने स्वीकारता यायला हवे. आधुनिकतेशी नाळ जोडताना पुन्हा पुन्हा पारंपरिक मूल्य कालसुसंगत ठरतात याचे प्रत्यंतर आपल्याला वारंवार आले आहे. त्यामुळे परस्पर अनुकूल, परस्परपूरक आणि परस्परांशी संबंधित या पद्धतीने समोर असलेल्या आव्हानांची उत्तरे शोधायला हवी.

क्रमश:

  • संजय साळवे

Back to top button