Opinion

शिक्षणामुळे पोतराजचा घडला फार्मसिस्ट

पुणे – सहदेव भवाळ मूळचे नगर जिल्यातील कर्जतचे. त्यांच्या  घरी देवीचा कुळाचार होता. त्यातूनच घरच्यांनी त्यांना पोतराज बनवलं. पोटासाठी  त्या कुटूंबाला गाव सोडावे लागले.  ते पुण्यात आले. सुदैवाने शाळेत जायची  त्यांना संधी मिळाली आणि त्यांना सरस्वती प्रसन्न झाली.  भवाळ पोतराजाचा फार्मसिस्ट झाले. सरस्वती बरोबर लक्ष्मीही आली. जे हात पैसे मागण्यासाठी पुढे पसरायचो ते आता आशिर्वाद मागत आहेत. मोरे श्रमिक वसाहतीत राहणारे सहदेव भवाळ  यांनी नवरात्रीच्या निमित्ताने आपली जीवन कहाणी सांगितली. विद्येचे माहेरघर म्हणून पुणे परिचित आहे मी त्याचा अनुभव घेत घडत आहे पुण्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हल्ली पोतराज, वासुदेव, पिंगळा दारासमोर येणे खरेतर शहरी भागात दुरापास्त झाले आहे. पोतराज म्हणून काम केलेले भवाळ म्हणाले की, सुप व केरसुणी बनवण्याचा आमचा पारंपारिक व्यवसाय होता. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मी पोतराज होतो. घरोघरी जाऊन लक्ष्मीसाठी भिक्षा मागण्याचा दिनक्रम सुरु होता. शिक्षकांचा पाठींबा मिळाला म्हणून माझी भाग्यरेखा बदलली नाहीतर आज मी कोठे असतो या विचाराने सुध्दा अंगावर काटा येतो. सकाळी वृत्तपत्र, दुध टाकण्याची कामे करायचो. तर संध्याकाळी एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करायचो. त्यातूनच प्रेरणा मिळून फार्मसी करण्याची इच्छा निर्माण झाली. जिद्दीच्या बळावर परंपरेच्या जोखडातून बाहेर पडत शिक्षण घेतले. आता शिक्षणापासून वंचित असलेल्या समूहाला शिक्षणाचा लाभ मिळावा व भटकंती करणा-या जीवाला सुखाची, मानाची विसाव्याची जागा  मिळावी यासाठी आता मी काम करत आहे.

भवाळ यांनी फार्मसीची पदविका घेवून औषध विक्रेत्यांना औषध पुरवण्याचे काम सुरु केले. निसर्गोपचार, योगोपचार यांचे प्रशिक्षण घेवून गरजूंना आरोग्यविषयक सल्ला देण्याचे काम भवाळ करतात. घरात आर्थिक स्थैर्य आल्यावर पत्नीलाही शिक्षित करण्याचा प्रयत्न  त्यांनी केला असून  त्यांची पत्नी आता पीठाची गिरणी चालवते.

पिढीपरंपरेने आलेला शीघ्रकवीत्वाचा वारसा भवाळ यांनी जपला आहे. अबोली, रातराणी, नक्षत्रांची काव्य बाग, रेशीमगाठ ही त्यांनी लिहिलेल्या कवितांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शीघ्रकवी म्हणून त्यांना पुरस्कारही मिळाला. कवी भवाळ यांनी 24 तास एकाच जागेवर बसून सलग कविता केल्याच्या विक्रमही केला आहे. काव्यमित्र संस्थेच्यावतीने राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार,महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुरस्कार असे अनेक पुरस्कार भवाळ यांना मिळाले आहे.

बासरी व पिपाणी वाजवणारे सहदेवचे वडील गरीबीला कंटाळून पोटापाण्यासाठी कुटूंबासह पुण्यात कोथरुडला आले. मिळेल ते काम करु लागले. पोतराज असल्यामुळे लांब वाढलेल्या केसाची वेणी घालूनच सहदेव शाळेत जायचे  मुले वेणीवरुन चिडवायची. पण शिक्षकांनी सहदेवच्या जिद्दीला पाठींबा दिला आणि त्यांचे जीवन बदलले. शिक्षणामुळे पोतराजचा वैद्यक क्षेत्रात फार्मासिस्ट झाला.  औषधांचा जाणकार झाला. हे विशेष प्रेरणादायी आहे.

Back to top button