Opinion

एक अत्यावश्यक सिंहावलोकन “गोंय… एक जैत कथा”

घुमटावर घुमलेला ‘तरिकीटी’ चा नाद, त्याला असलेली शामेळाची साथ, सोबतीला ‘कासाळें’,‘ताशे’ आणि त्याच त्वेषाने ढोलावर पडलेली ‘तोणी’. ह्या वाद्यशृंगारात ‘होस्सय, होस्सय’ चा नाद म्हणजे गोवेकरांसाठी मेजवानीच, आणि याला दुप्पट शक्तीने साथ देणाऱ्या ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’, आणि ‘जय गोमंतक’ अश्या घोषणा; हे कला, संस्कृती आणि देशभक्तीने परिपूर्ण मिश्रण जेव्हा कानाच्या पडद्यावर पडते आणि डोळ्यांचे किनारे आनंदाश्रूंनी नकळत ओले होतात, तेव्हा  मन भरून येऊन एक अथांग मनः शांततेची लहर शरीरातून वाहते आणि टाळ्यांचा गडगडाटाने अवघा नाट्यगृह दणाणून जातो. हा थोडक्यात वर्णन केलेला “गोंय… एक जैत कथा” (म्हणजे, गोवा एक विजयगाथा) नाट्यप्रयोग बघताना असलेला अनुभव आहे. 

गोवामुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम करण्याची योजना फक्त गोवा राज्य सरकारने नव्हे तर गोव्यातील सर्व छोट्या मोठ्या व्यक्ती व संस्थांनी केली होती. पण ऐनवेळी कोरोना महामारीची नजर अख्या जगाला लागली आणि त्याला गोवा काही अपवाद नव्हता. पण छोट्याश्या गोव्यातली परिस्थिती अत्यंत कमी वेळेत मुठीत आल्याने सर्वसामान्य जीवन पुन्हा सुरु झाले आणि गोवामुक्तीचे हिरकमहोत्सवी वर्ष जोमाने साजरा करण्याचे वारे घुमू लागले. गोवा सरकारच्या कला आणि सांस्कृतिक खात्याचा “गोंय… एक जैत कथा” हा त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प. गोवा मुक्तिसंग्रामाची गाथा नाट्य स्वरूपात लोकांसमोर आणावी हेच त्यामागील ध्येय आणि नाटकाचा प्रयोग पाहिल्यावर कला आणि सांस्कृतिक खाते आपले ध्येय खूप प्रमाणात पूर्ण करण्यात यशस्वी झाले यात शंकाच नाही. 

गोव्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक श्री पुंडलिक नारायण नाईक ह्यांनी हि नाट्यसंहिता लिहिली आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी खूप जबाबदारीने पूर्ण केल्याचे दिसून येते. स्वतः त्यांचे वडील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते त्यामुळे एकाअर्थी ह्या संहितेची जवळीक त्यांच्या हृदयाशी आहे हे लिखाणातून दिसून येते. सहज सुंदर संवाद लेखन आणि संवादात सहजपणे मार्मिक सत्य गुंतणे हि त्यांची किमया. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकात हि छटा उठून दिसते आणि ह्या नाटकात तर ती प्रकर्षाने जाणवली. उदाहरण द्यायचे झाले तर जाती व्यवस्था व त्याला अनुसरून देवळातील पुजारी आणि कामगार यांच्यामधील असलेले संवाद त्याकाळच्या क्रूर वास्तव्याची जाणीव करून देते. या जातिव्यवस्थेच्या भिंतीमुळे दुरावलेले हिंदू आणि त्यांचे फसवून धर्मांतरण करणारे ख्रिश्चन मिशनरी यांच्यातील संवाद आजच्या परिस्थितीत देशभरात असलेल्या वर्तमान वास्तव्यासमोर आरसा ठेवताना दिसतात. 

कश्याप्रकारे पोर्तुगीजांनी समाजातील “नीच” म्हणून दूर केलेल्या घटकांचा आणि त्या घटकांच्या गरिबी आणि हतबलतेचा फायदा घेऊन हिंदूंनाच हिंदूंची मंदिरे तोडायला लावली, व अशी मंदिरे तोडताना त्या हिंदू माणसाच्या मनात येणारे विचार जेव्हा तो नाटकात स्वगत बोलतो तेव्हा ते संवाद काळजाच्या आरपार जातात. बाटलेल्या बहिणीला नदी पोहून पहाट फुटायच्या आधी भेटायला आलेला भाऊ व त्यांच्यामधील संवाद अक्षरशः काळीज पिळून टाकते. इन्क्विजीशन, त्यातून झालेले अत्याचार व धर्मांतरण, तसेच कश्याप्रकारे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंनी आपल्या ओव्या आणि गाण्यात हिंदू धर्माच्या आठवणी ओवून ठेवल्या ज्या आजपर्यंत जश्यास तश्याच आहेत याचे सुरेख वर्णन त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे केले आहे. गोवामुक्तीनंतर गोवा घटकराज्य म्हणून उदयास येणे व कोंकणी भाषेसाठी व प्रादेशिक अस्मितेसंदर्भात झालेल्या आंदोलनाचे चित्र सुद्धा या नाटकात दाखवले आहे. नाटकात भरपूर काव्ये आहे ज्यांची रचना ओव्या, फुगड्या व अन्य लोकगीतं आणि कलांच्या माध्यमातून गुंफली आहे. 

गाणी असली म्हणजे संगीत आलंच. श्री अजय नाईक यांनी उत्तम संगीताची बांधणी या नाटकासाठी केली आहे. प्रत्यक्ष गायक आणि वादक, लाईव्ह म्हणत व वाजवत होते त्यामुळे तो अनुभव वेगळाच होता. नाटकाचे शीर्षक गीत विविध कालखंडानुसार चाल बदलत होते व त्यातील मर्म नकळत मनामनात उमजत होते. जरी हे नाटक कोंकणीत असले तरीही समजा हे नाटक जगाच्या पाठीवर कुठेही खेळवले असते तरीही निव्वळ संगीताच्या बळावर ते कुठल्याही भाषेच्या व्यक्तीला समजले असते यात शंकाच नाही. शीर्षक गीताला साथ देते ते नाटकात गोफाप्रमाणे गुंफलेले गोव्यातील लोकसंगीत. घुमट, चौघडा, ढोल, ताशे त्याच बरोबर आधुनिक वाद्ये यांचा परिपूर्ण संगम नाटकातील संगीताची व एकूणच नाटकाची शोभा व पातळी वाढवते. 

तसं गोव्यातील कलाकारांना महानाट्य हा प्रकार काही नवल नाहीये. ‘जाणता राजा’ आणि ‘संभवामी युगे युगे’ सारख्या महत्वाकांक्षी नाट्य प्रयोगांनी फक्त गोव्यातच नव्हे तर संबंध देशात धूम माजवली होती. तसं बघितलं तर ह्या नाटकाचा प्रयोग महानाट्याच्या रूपाने पाहायला नक्कीच आवडला असता पण कदाचित कोरोना महामारीमुळे तो छोट्या नाट्यगृहाच्या रंगभूमीवर करण्याचा निर्णय घेतला असावा. पण या निर्णयामुळे दिग्दर्शक म्हणून नाटक खेळविण्याची भौतिक व्याप्ती कमी होते. पण श्री निलेश महाले यांनी मर्यादित जागेचा परिपूर्ण उपयोग करून या नाटकाला योग्य तो न्याय देण्यास ते सफल झाले. उत्तमोत्तम प्रकाश योजना आणि पडदे तसेच सावल्यांचा सर्जनशील उपयोग नाटकाची शोभा वाढवत होते. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या नाट्यगृहात जेव्हा प्रेक्षकांमधून मध्येच पोर्तुगीज सैनिक झालेले कलाकार प्रवेश घ्यायचे तेव्हा सगळेच अचंबित व्हायचे. रंगमंचाच्या सगळ्यात शेवटी लावलेला पडदा व त्यावर दाखवलेली चित्रे रंगमंचावर चाललेल्या दृश्याची पातळी नकळत वाढवत होते. 

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नाटकातील कलाकार. सर्वच्या सर्व कलाकारांनी जीव ओतून प्रयोग सफल केला ह्यात शंकाच नाही. तरुण कलाकारांना रंगरंगोटी करून म्हातारे व वयस्क न करता सर्व वयोगटाच्या कलाकारांचा व्यवस्थित उपयोग केल्याने नाटकाची शोभा वाढली आणि त्याची वास्तविकता प्रेक्षकांना भावली. स्वातंत्र्य सैनिकांवर झालेल्या अत्याचारांचे दृश्य डोळ्यांसमोर उभारणे आणि त्यांचे छिन्नविछिन्न शरीर अक्षरशः घरी आणून कचरा टाकल्या प्रमाणे कुटुंबीयांसमोर फेकून देणे व त्यावर असलेली आई, बायको, मुलगी यांची प्रतिक्रिया कलाकारांनी रंगमंचावर अक्षरशः जिवंत केली आणि रसिकवर्गाच्या डोळ्यात पाणी आणले. जवळ जवळ २०० कलाकार आणि तांत्रिक बाजू हाताळणाऱ्या कुशल कलाकारांनी डोळ्यांची पारणे फेडणारा हा असा सुरेख प्रयोग सादर केला. 

आता नाटक म्हटल्यावर त्रुटी असणारच. मुळात गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला आणि त्या मुक्तीला ६० वर्षे पूर्ण झाली त्यामुळे नाटकाचे कथानक पोर्तुगीज आल्यापासून म्हणजेच १५१० पासून नंतरच्या काळावर जास्त लक्ष केंद्रित करते. पोर्तुगीज येण्यापूर्वी ज्या १५ भारतीय राजवटीखाली गोवा होता त्या राजवटीचे फक्त एक-एक करून एका-एकाच ओळीत उल्लेख करणे काही मनाला पटले नाही. भारतीय राजांच्या राजवटीखाली गोवा कसा वैभवसंपन्न होता व पोर्तुगीज आल्यानंतर कशी त्याची राखरांगोळी झाली अश्या प्रवाहात जर कथानक असते तर कदाचित संहितेचे महत्व वाढले असते. कथानकाची पटकथा हळू हळू चढत्या क्रमाने विजयाची गाथा सांगणारी अशी केल्यामुळे, कालक्रमानुसार घटनाक्रम नाटकात दिसला नाही व ह्यामुळे अनेक प्रमुख घटना, व व्यक्तींचा उल्लेख राहून गेला. कदाचित कालक्रमानुसार जश्या घटना झाल्या त्या जश्यास तश्या क्रमाने नमूद केल्या असत्या तर प्रमुख घटनांचा क्रम आणि त्यामागे असलेल्या व्यक्तीच्या उल्लेख प्रेक्षकांच्या लक्षात राहिला असता. नाटकाचे नाव “गोंय… एक जैत कथा” असे आहे पण सांस्कृतिक आणि लोककलेच्या जास्त सादरीकरणामुळे शीर्षकाचा आशय गळून गेल्यासारखे भासते. कदाचित युवकांना व प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे स्वातंत्र्य घेतले असावे. पण तरीही कलाकारांच्या अभिनयाद्वारे मुक्तिसंग्रामाचे गांभीर्य पाय रोवून शेवटपर्यंत उभे राहते. 

दुर्देव म्हणजे नाटकात दाखवलेल्या अनेक सांस्कृतिक व ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख कुठल्याच शैक्षणिक अभ्यासक्रमात सापडत नाही आणि हे भयानक वास्तव्य आणि सत्य आहे. “१५१० मध्ये पोर्तुगीज आले, त्यांनी साडेचारशे वर्षे गोव्यावर राज्य केले आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला” अश्या ३ ओळीत गोव्याचा इतिहास आटोपला जातो आणि असे वारंवार सगळीकडेच होत असलेले पाहून अत्यंत वाईट दिसते. गोव्याच्या इतिहासाचे विस्तृत संकलन किंवा तसे संदर्भ सहजासहजी सापडत सुद्धा नाही त्यामुळे आवश्यक असलेले बाळकडू पाजले जात नाही या बद्दल खंत आहे. कदाचित या नाटकाच्या निमित्ताने सरकार व इतर व्यक्ती आणि संस्था यांकडून गोव्याचा खऱ्या इतिहास संकलन आणि प्रचारासाठी पावले उचलली जातील अशी आशा आहे.

गोव्यातील हिंदूंना बाटवून ख्रिश्चन बनवले होते, त्यांनी हिंदू धर्माचे, देवदेवतांचे उल्लेख गाणी व वागण्यामध्ये जिवंत ठेवले होते व त्यांचे वंशज आजही हे रीती रिवाज पाळतात याचे कारण त्यांचे पूर्वज हिंदू होते हे प्रकर्षाने जनमानसात पोचवले पाहिजे. गोव्याच्या मुक्तिसंग्रामात अनेक ख्रिश्चन क्रांतिकारी सुद्धा होते त्यांनी गोवेकर व भारतीय म्हणून पोर्तुगीजाविरुद्ध लढा दिला, हे मातृभूमीबद्दलचे प्रेम “पोर्तुगीज राजवट बरी होती” असे म्हणणाऱ्या सर्व धर्मीय अल्प समाजकंटकांना सांगायची गरज आहे. पोर्तुगीजां पूर्वी ज्या भारतीय राजांच्या राजवटीखाली गोवा फुलला तो प्राचीन इतिहास सर्वासमोर आणलाच पाहिजे. गोवेकरांनी फक्त अत्याचार सोसले व नंतर भारतीय सेनेने येऊन गोवा मुक्त केला असे नसून वेळोवेळी सशस्त्र उठाव करून पोर्तुगीजांविरुद्ध आपला लढा चालू ठेवला होता व आपले पूर्वज भ्याड नव्हते हे सत्य सांगायची गरज आहे. गोवा मुक्ती संग्रामात फक्त गोव्यातील नव्हे तर भारत भरातील लोकांनी आहुती दिली होती व अनेक जणांनी हौतात्म्य सुद्धा पत्करले होते हे प्रांतवादाचे ढोल बडविणाऱ्याना चपराक मारून सांगण्याची अशी हि एक सुवर्ण संधी आहे. प्रादेशिक अस्मिता जपणे हे गोव्यातील नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहेच पण त्याच बरोबर गोवा भारत देशाचा भाग आहे आणि आम्ही प्रथम भारतीय आहोत हे सुद्धा ध्यानात ठेवले पाहिजे. 

गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त आणि “गोंय… एक जैत कथा” या नाटकाच्या निमित्ताने सुरुवातील काही पावले आणि अखेरीस एक एक करून सर्व पावले सत्याच्या शोधार्थ वळतील असे चित्र दिसत आहे. नाटकाद्वारे समाजप्रबोधन अनेक वर्षांपासून चालू आहे आणि हे नाटक सुद्धा ह्या साखळीची एक कडी आहे. सादरीकरणाच्या पद्धतींमध्ये बदल झाले असतील पण मूलभूत सिद्धांत तोच आहे. आपण कुठे पोचलोय किव्वा आहोत ह्या वास्तवाचे भान ठेवून,आपण कुठे जातोय हे मनात पक्के असले पाहिजे , परंतु त्याच बरोबर आपण कुठून आलोय ह्याचा विसर पडत काम नये. सावरकरांनी म्हटले आहे कि “जे इतिहास विसरतात, त्यांचा भूगोल बदलतो” आणि हे सत्यात उतरताना आपण वारंवार पाहिले आहे. ह्या नाटकाचा सुंदर असा प्रयोग पाहिल्यावर आपण आज पूर्ण खात्रीने म्हणून शकतो कि “गोंय… एक जैत कथा” हे युवा पिढीसाठी आवश्यक असे बाळकडू आणि गोमंतकीय जनतेसाठी एक अत्यावश्यक सिंहावलोकन आहे. 

साौजन्य : वि.सं.केंद्र, गाोवा

Back to top button