Opinion

समजायला वेळ लागेल, समजले तर वेड लागेल

संजय साळवे

आंबेडकरांचे मोठेपण अमूल्य आहे. ते काही वारसा हक्काने, पद किंवा कुठल्याही पैशांनी पदरात नक्की पडलेले नाही. विपरीत परिस्थितीच्या विरोधात उभे राहून मिळवलेले हे मोठेपण आहे. आपल्या ध्येयापासून कुठेही विचलित न होताआपल्या अभ्यासाने, बुद्धीने आणि समाजाचे भलं करण्याची अग्निपरीक्षा आंबेडकरांना वारंवार द्यावी लागली.

आंबेडकरांचा खूप मोठा उंच पुतळा उभारून आणि त्याला विनम्र अभिवादन करून एक वेळ फोटोसाठी नाटक करता येईल पण त्यांच्या हातातील पुस्तकाचा विचार अंगीकारण्याची तयारी मन, मनगट आणि मेंदू ह्यांचा समन्वय करून करण्याची आवश्यकता आहे.

व्यक्तिगत आकांक्षांना वळसा घालून समाजाचा आणि राष्ट्राचा सातत्याने विचार केला असे आंबेडकर जो रस्ता निवडला त्यावर शेवटपर्यंत चालत राहिले. हा मार्ग काळाच्या आणि विचारांच्या कसोटीवर समाजाचा समस्यांचा विचार करणारा आणि देशभक्तीचा होता.

भविष्याचा वेध घेणारा विचार करणे तसे सोपे नाही आणि जेव्हा आपल्या प्रत्येक कृतीचा आणि विचाराचा काही एक परिणाम संपूर्ण समाजावर आणि राष्ट्रावर होणारा असतो. मग महाडची घटना असो, काळाराम मंदिराचा प्रवेश असो की येवल्यात केलेली धर्मांतराची घोषणा असो विपरीत परिस्थितीत असलेल्या अंध:काराशी लढून आंबेडकरांनी सर्वाना आत्मवालोकन करायला भाग पाडले.

कुणी ह्याला समतेचा जागर, आत्मसन्मानाचा जागर म्हणेल. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना म्हणजे जवळ जवळ पुरेसा कालावधी गेल्यानंतरही समाज मनात अजूनही द्वंद चालू आहे. हे निदान आज नाकारता येणार नाही.

घटना समितीत अखंड भारताची घोषणा करणारे आंबेडकर ह्यांची देशभक्ती इतिहासाच्या कसोटीवर आता पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची गरज निदान आता तरी उरली नाही. बुद्धिमत्ता, विद्वत्ता आणि कर्तृत्व ह्याच्या जोरावर पराक्रम करणारे आंबेडकर आजही अजून कुणाला फारसे कळले नाहीत.आंबेडकरांचा छळ काही कमी झाला नाही.

एका भाषणाला बैलगाडीने जात असताना जातीने महार आहे हे कळल्यावर त्यांना बैलगाडीतून उतरून दिले. त्यांनी तो वैयक्तिक अपमान सहन केला पण अस्पृश्यतेच्या विरोधात त्यांनी आपला लढा त्यांनी चालूच ठेवला. कुठलाही अभिनिवेश न बाळगता “मी” बाजूला ठेवून आंबेडकरांनी संपूर्ण समाजाची चिंता वाहिली आहे.

धर्मशास्रापासून ते घटनाशास्रापर्यंत त्यांनी अनेक विषयांचे गहन संशोधन केले. पण एखाद्या विषयाचे खोलवर संशोधन करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या एकूण बोलण्याला आणि कृतीला आकार देणारी ठरली. विद्वत्तेचे आणि व्यासंगाचे प्रतिबिंब त्यांच्या सर्व ग्रंथात सापडते. भाषणात आणि लिहिण्यात कसलीही भीती नाही, प्रचंड आत्मविश्वास ह्यातून उच्चार आणि विचाराला एक धार प्राप्त झालेली होती.

शरीराचा, बुद्धीचा आणि आत्म्याचा जास्तीत जास्त विकास कसा होईल ह्या चिंतेने ते धर्मांतराच्या वाटेने गेले. ही एका अर्थाने हिंदू धर्माच्या सुधारणेची चळवळ होती. स्वयंप्रज्ञा आणि पराक्रमाच्या जोरावर आंबेडकरांनी ढोंग करणाऱ्यांना आव्हान दिले. निर्जीव, नेभळट असे नेतृत्व समाजाला आकार देवू शकत नाही. त्यांना जे वाटले ते बोलायला ते कधीही घाबरले नाहीत.

समाजाच्या द्वेषाला आणि निंदेला बळी पडावे लागले तरीही त्यांनी आपल्या वाणीने आणि शब्दांनी देशभक्ती जागृत ठेवली. आंबेडकरांना अध्यात्मिक चिंतनाची आणि लेखनाची मुळापासून इच्छा होती. आज समतेच्या, समरसतेच्या वाटेवर ह्याची नितांत आवश्यकता आहे. आज ह्या चळवळीला खऱ्या अर्थाने गरज कशाची असेल ती अध्यात्मिक अधिष्ठानाची. ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या पातळीवर समतेचा प्रश्न सोडवू बघणारे आंबेडकर होते.

दगडाला एकदा शेंदूर लावला म्हणजे तो खरवडून काढणे अत्यंत कठीण असं आंबेडकर म्हणायचे. माणसामाणसातील चांगुलपणाला आवाहन करणारे त्याग, ज्ञान आणि सेवा ह्या चिरंतन मुल्यांना आधारभूत मानणारे आंबेडकरांनी समाजाची बौद्धिक आणि नैतिक उंची वाढावी म्हणून आचाराला अधिक महत्व दिले.

आज व्यवहारात हाच आचार योग्य प्रकारे निरुपणाच्या स्वरुपात पुन्हा पुन्हा समाजासमोर ठेवणे आवश्यक आहे. बुद्धधर्माची, तत्वज्ञानाची आणि संस्कृतीची दीक्षा अजूनही खोलवर नीटशी रुजली नाही. बुद्धाच्या वाटेवरून चालताना संपूर्ण समाज कवेत घेण्याचे प्रयत्न अनेक बाजूंनी होणे अपेक्षित आहे. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली अध्यात्मिक भावना सर्वाना सामावून घेणारी आहे. तिचा जागर आणि स्विकार निर्विकार मनाने सत्यापर्यंत जाऊन पोहचेल ह्यात शंका नाही.

विकासाचे बदलत चाललेले चक्र अनेक नविन संधी संधी सर्वांसाठी निर्माण करत आहेत. तशी मानवी मूल्यांविषयी चर्चा अधिक वेगाने होऊ पाहते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी धर्म आणि नैतिक आचरण ह्याची सांगड अभेद्य असण्याविषयी, धर्मामध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ह्या त्रयींचा अंतर्भाव करण्याविषयी आग्रह धरायचे. विकासाच्या वाटेवर विचार करणारे आंबेडकर दारिद्र्याची थोरवी गाणारे ह्याच्या विरोधात होते.

दारिद्र्य अनेकदा गुन्हेगारी आणि अनैतिक आचरणास उत्तेजन देत रहाते. अशावेळी सद्वर्तनाचा मार्ग सांगणारा धर्म समाजात खोलवर रुजवण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला प्रवृत्ती आहे, दुसऱ्या बाजूला संघर्ष आहे. अज्ञान, दारिद्र्य, भ्रष्टाचाराच्या विरोधात तितकीच सक्षम विकासाची यात्रा उभी करण्याची गरज आहे. ज्या ज्या ठिकाणी समाज मनात द्वंद आहे त्या त्या ठिकाणी माणसाची प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे.

आजही सामाजिक परिवर्तनाच्या अनुभवाच्या आधारावर काही चांगले प्रयत्न होत असतील तर ते नाकारण्याचे काही कारण नाही. देश आणि समाजाची एकता राखण्यासाठी हे सर्व प्रयत्न आवश्यक आहेत. आज अपेक्षा वाढत्या असतील पण प्रयत्न आणि मार्ग योग्य असतील त्यात शंका असण्याचे काही कारण नाही. हे सर्व प्रयत्न अधिक व्यापक होण्याची आजची काळाची गरज आहे. समाजच्या संपूर्णतेमध्ये ज्यांनी अनुभव घेतला आहे ते ह्याविषयी शंका व्यक्त करणार नाहीत.

आंबेडकरांची वाट सोपी नव्हती. पण त्यांनी मोकळ्या केलेल्या वाटेवरून चालताना सामाजिक आणि संवेदनशीलतेचे भान नक्की असायला हवे. मूळ शिकण्याचा, संघर्षाचा आणि एकजुटीचा मंत्र विसरून साजरे होणारे आंबेडकरांचे स्मरणाचे स्वरूप चिंता वाटावे असे आहे. मिरवणुकीच्या निमित्तापेक्षा विचारांची यात्रा समाजात घेवून जायला खरच काय हरकत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे नसून संपूर्ण राष्ट्राचे आहेत. तरीसुद्धा अनेकदा आंबेडकर आपापल्या सोयीने हवे असतात. हे त्यातील अधिक वास्तव आहे. आंबडेकर ह्यांचा विजय असो म्हटलं की त्याला बघणारे आणि प्रतिसाद देणारे एक रेघ ओढलेली जाणवते. सामाजिक समतेपेक्षा आरक्षणाच्या विरोधाची धार अधिक त्याला असते. आपल्या विरोधाच्या समर्थनार्थ आंबेडकर वाचून, रंग एकत्र आणले म्हणजे समाज एकत्र आणला असा त्याचा अर्थ नक्की होत नाही.

खरं तर आंबेडकरांनी न्यायावर आणि समतेवर आधारलेल्या धर्माची, तत्वज्ञानाची आणि संस्कृतीची दीक्षा दिली. पण आजचा आचार पाहता अजूनही आपला मार्ग नीट सापडला आहे की नाही असा प्रश्न पडावा. एकूण भारतीय समाजाच्या एकात्म भावाकडे पहाताना तिरस्कार आणि द्वेषाचे वातावरण देशाच्या ऐक्याला घातक आहे. अशा स्थितीत बुद्धाच्या वाटेवरून चालताना संपूर्ण समाज कवेत घेण्याचे प्रयत्न अनेक बाजूंनी होणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक अर्थ, प्रश्न आणि उत्तरे ह्याची चर्चा जनमानसात आणि माध्यमात झाली. उत्तर शोधणारे नेमकी कुठल्या वैचारिक भूमिकेतून ह्या प्रश्नाकडे पाहतात हे महत्वाचे आहे. सुज्ञ आणि सामाजिक जाण असलेले अनेक माणसे दुभंगलेली मन तयार होऊ नयेत म्हणून चिंतेत आहे. मनामनात कळतनकळत पेरलेले तिरस्कार आणि द्वेष येणाऱ्या काळात कुठल्याही छोटे घटनेने मोठे स्वरूप धारण करणार नाही ह्याची काळजी आहेच.

बऱ्याची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, वादळाची, मानाची आणि अपमानाची पर्वा न करता आंबेडकर झगडले ते उद्धारासाठी. आंबेडकरांच्या समर्थकांचे ऐक्य, सामर्थ्य आणि कडवेपणा हे निखाऱ्यावर भाजून निघाल्यानंतर वाट्याला आलेला वारसा आहे. आजचे अग्निदिव्य आहे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने समाजात अशांतता निर्माण होत असेल तर तिला थांबवण्याचे. समाजाचे स्थितीचे आणि समस्यांचे सिंहावलोकन करत भविष्याचा वेध घेत आणि खोलवर आत्मपरीक्षण करत आंबेडकरांनी आपला मार्ग दाखवून दिला आहे. भावनेपेक्षा वास्तवाच्या वाटेवर आंबेडकर समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

Back to top button