News

‘निरपेक्ष देशसेवा हीच अनामवीरांना खरी श्रद्धांजली’

पुणे, दि. ३१ : “देशाने मला काय दिले? असा विचार न करता मी देशासाठी काय करू शकतो? हा भाव मनात बाळगून निरपेक्षपणे देशसेवा करणे हीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या अनामवीरांना खरी श्रद्धांजली ठरेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वयंप्रेरणेतून काम करणाऱ्या या स्वातंत्र्य योद्ध्यांची कोणतीच वैयक्तिक आकांक्षा नव्हती, आपल्या नावाची कोणी दखल घ्यावी असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. त्यांच्या बलिदानात त्यांच्या परिजनांचे योगदान देखील खूप मोठे आणि न विसरता येण्यासारखे आहे. आपण आजपर्यंत त्यांची दखल घेतली नाही ही खंत या अनामवीरांचे स्मरण करताना आपण लक्षात घेतली पाहिजे, त्यांचे मोठेपण सांगत असताना या अनामवीरांबाबत असलेल्या कर्तव्यबोधाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि त्यातून आपण देशसेवेसाठी सक्रीय झाले पाहिजे, ही खरी आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या या वीरांना कायमच अनाम ठेवण्यासाठी नियोजनपूर्वक कोणी काम करत आहे का? याचाही विचार आपण केला पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रचार प्रमुख मा. प्रमोद बापट यांनी आज येथे केले.  

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘स्वराज्य – ७५: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील पहिले पुष्प गुंफताना मा. प्रमोद बापट बोलत होते. ‘अनामवीरा …!’ हा आजच्या व्याख्यानाचा विषय होता.

म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते. म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’च्या अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर हे ऑनलाईन माध्यमातून या व्याख्यानाला उपस्थित होते. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.  

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आरंभीचा काळ हा विविध क्षेत्रातील उभारणीचा होता, काही क्षेत्रात आपण अपेक्षित उंची देखील गाठली. परंतू त्याचबरोबर श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाली. त्यातूनच देशासाठी आहुती देणाऱ्या वीरांची नावे पुसण्याचा प्रयत्न झाला. पारतंत्र्याच्या काळात परदेशात राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेले अनेक देशभक्त स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातील देशामधील वातावरण बघून भयापोटी मायदेशी परत आले नाहीत. कलुषित दृष्टीने बघण्याचा वारसा ब्रिटीश मागे ठेवून गेले आहेत. त्यामुळे अनामवीरांची नावे दडपण्याचा प्रयत्न हेतूतः होत असेल तर त्यांची चरित्रे वाचून, त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुरेसे होणार नाही, हे अस्वाभाविक प्रयत्न आणि त्यामागील योजना समजून घेऊन ते उद्ध्वस्त केले पाहिजेत. त्याचे माध्यम शिक्षण हेच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अशा अनामवीरांनी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. मात्र, त्यांच्या परिजनांची जी परवड झाली त्याची दखल घेतली जात नाही, त्यांचे दुष्टचक्र थांबत नाही. स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशासाठी आपण काय करू शकतो? ही भावना होती, परंतू स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता देशाने आमच्यासाठी सर्व काही करायचे आहे असा विचार रूढ झाला. असे कशामुळे घडते? तर, अनामवीरांच्या बलिदानाचे स्मरण न ठेवल्याने हे होते. ते समाजाच्या हिताचे नाही. देशासाठी मी काय करू शकतो? हा कर्तव्यबोधाचा संस्कार या भूमीतला आहे. त्यातूनच डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी यवतमाळ येथे जंगल सत्याग्रह केला होता. पण आजदेखील त्याबाबत शंका उपस्थित केली जाते. अनामवीरांना प्रमाणपत्रांची गरज आहे का? हे आपण चालू देणार आहोत का? देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने याकडे लक्ष वेधले पाहिजे. देशाच्या विविध भागात राहणाऱ्या विविध समाज घटकांनी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या भाषेतून आपल्या लोककथा, लोकगीतांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत  ठेवली. स्वातंत्र्यानंतर या समाज घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रविरोधी शक्तींनी त्यांना आपलेसे केले आहे, हा देशासमोरील फार मोठा धोका आहे,” असे मा. प्रमोद बापट यांनी यावेळी सांगितले.  

कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’चे सदस्य डॉ. आनंद लेले यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वारसा संस्थेला लाभला आहे. कालानुरूप आणि अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देत असतानाच हा वारसा पुढे नेण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात देशबांधवांनी जी किंमत मोजली त्याची माहिती युवा वर्गाला करून देण्यासाठी संस्थेने व्याख्यानमालेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय संस्थेच्या शाखांमधून पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य यांनी केले. ‘अनामवीरा …!’ हे व्याख्यान राष्ट्रप्रेम, राष्ट्रचिंतन आणि राष्ट्रप्रेरणा निर्माण करणारे ठरेल. राष्ट्राच्या पुर्ननिर्माणात प्रत्येकाने योगदान द्यावे यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील प्रत्येक विभागाने स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि आता अमृत महोत्सव साजरा करण्याचे भाग्य मला आणि माझ्या पिढीला लाभले. परंतू स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी जो विचार मांडला गेला तोच आज पन्नास वर्षांनंतर देखील मांडला जातो आहे. याचे कारण स्वातंत्र्यानंतरच्या काळात अपेक्षित दिशेने आपल्या देशाची प्रगती झाली नाही. आपला हजारो वर्षांचा इतिहास लक्षात न घेता आपला देश ७५ वर्षांचाच आहे हे समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न होतो आहे. देशात भौतिक प्रगती होत राहिल. मात्र, स्वातंत्र्याच्या शताद्बी वर्षाकडे वाटचाल करताना आत्मिक प्रगती आणि संस्कारांच्या बाबतीत आपण कुठे आहोत? देशातील नागरिकांना मानसिक आणि वैचारिक स्वातंत्र्य मिळाले आहे का? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या भवितव्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे ही धारणा योग्य नाही. शिक्षण क्षेत्राला यापुढील काळात समाजाचे नेतृत्व करावे लागेल. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रणव कुलकर्णी यांनी केले.  प्रा. राधिका गंधे यांनी राष्ट्रगीत गायन केले.

Back to top button