OpinionRSS

आम्ही हिंदू आहोत आणि हे हिंदुराष्ट्र आहे, अशी भावना सर्वांमध्ये निर्माण करणारे डॉ. हेडगेवार

केशवा, अरे ए केशवा! – मित्राने आवाज दिला. आवाजाच्या पाठोपाठ घरात धावत आलेली दोन-तीन पोरं धापा टाकत केशवला शोधू लागली. “अरे केशव, वझे गुरुजी येऊन राहिले, लवकर बाहेर ये.” केशव मागोमाग धावत खड्ड्यातून बाहेर यायचा प्रयत्न करू लागला, बाहेरसुद्धा आला. आता खड्डा झाकुन त्यावर कपडा टाकायची आणि गुरुजी आत यायची एकच वेळ झाली. गुरुजींनी घरभर पसरलेली माती, आजूबाजूला पडलेली फावडी, कुदळ हे सगळं बघितलं आणि त्यांना आश्चर्यच झालं. “काय चाललंय रे, कसले उद्योग आरंभलेत?”, वझे गुरुजींनी जरा रागातच विचारलं. केशव घाबरत घाबरत पुढे होऊन बोलला, “ग ग गुरुजी, ते आम्ही..!” “आम्ही काय? खड्डे कसले करताय, तेही माझ्या घरात? अभ्यासाला जागा दिली ना तुम्हाला?” गुरुजी म्हणाले.”हो गुरुजी, पण आम्हाला त्या सीताबर्डी किल्ल्यावर असलेला तो इंग्रजांचा झेंडा बघवत नाही, तो झेंडा काढायचा आम्ही ठरवला, पण तिथे खुप गस्त आहे, म्हणून आम्ही ह्या भुयारी मार्गाने तिथवर जाऊन झेंडा काढणार. त्यासाठी भुयार खणत आहोत.” , केशव स्पष्ट बोलला. गुरुजींना कौतूकही वाटलं आणि त्यांनी मुलांना दोन समजुतीच्या गोष्टी सांगुन असं काही न करण्याबाबत बजावलं.

अगदीच लहानवयात पाळण्यात असे पाय दाखवणारा हा पोर म्हणजे मोठेपणी संघसंस्थापक म्हणुन प्रख्याती पावलेले डॉ केशव बळीराम हेडगेवार! आंध्रप्रदेश मधील कुंदकर्ती या गावातील वेदशास्त्रसंपन्न घरात केशवाचा जन्म हिंदू तिथीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि इंग्रजी दिनांकानुसार १ एप्रिल १८८९ रोजी झाला. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने त्यांनी संघस्थापनेआधी केलेलं चिंतन आणि एकुण हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी केलेलं हे संघटन याबाबतीत थोडेसे- खरं तर हिंदूंचा ज्ञात इतिहास शोधायचा तर वेदकाळापर्यंत मागे जाता येतं. महाभारताचा इतिहास हा साधारण 5000 वर्षे जुना धरल्यास त्याआधी रामायण आणि त्याही आधी वेदांचा काळ. म्हणजे एकुण इतिहास हा खुप जुना आहे हे आपल्या सहज लक्षात येऊ शकेल.

आपल्या जीवनात नेहमीच्या अनेक प्रथा-परंपरा ज्या आजही पालन केल्या जातात, त्यात अनेक प्राणी-पक्ष्यांच्याबाबतीत कृतज्ञता व्यक्त करणारे बैलपोळा, वसुबारस, नागपंचमी असे सण आपण अगदी उत्साहात साजरे करतो. ज्या संस्कृतीमध्ये प्राणिमात्रांच्याबाबतीत इतकी कृतज्ञता असेल त्या संस्कृतीमध्ये मानव तरी जातीपातीच्या भेदात कसा विभागलेला असेल? याचा विचार आपण कधी करतो का?

आपल्यावर इंग्रज आणि इस्लामिक आक्रमण झाली आणि आक्रमकांच्या “फोडा आणि राज्य करा” या नीतीमुळे आपल्यात कायमची दुही पेरली गेली. आत्मविस्मृतीत गेलेला हिंदू आणि इतिहास विसरलेला असंघटित हिंदू स्वतंत्र झाला तरी किती काळ स्वतंत्र राहील? त्यामुळे आम्ही एक आहोत, आम्ही हिंदू आहोत आणि होय हे हिंदुराष्ट्र आहे अशी एक भावना सर्वांमध्ये निर्माण करण्याचं कार्य डॉ हेडगेवारांनी संघाच्या माध्यमातून केलं.

संघ स्थापनेमागे डॉक्टरांनी केलेल्या चिंतनात आत्मविश्वास हरवलेला असंघटित हिंदू चारित्र्यवान, संघटित, आणि बलशाली करणं ही त्रिसूत्री महत्वाची असावी. अकबर बिरबलाच्या एका कथेत अकबराने बिरबलाला सांगितलं की मी मारलेली रेष तू हात न लावता लहान करून दाखवायचीस, हे ऐकून बिरबलाने त्याच्या बाजुला पटकन एक मोठी रेष ओढली. त्याचप्रमाणे भेद आणि अभाव कितीही असले तरी “हिंदव: सोदरा सर्वे” म्हणुन हिंदुत्वाची जी मोठी रेष केशवरावांनी ओढली ती रेष म्हणजे रा.स्व.संघ!डॉ प्रसन्न पाटील यांनी साप्ताहिक विवेकच्या संघमंत्राचे उद्गाते डॉ हेडगेवार या विशेषांकात लिहिलेल्या “संघ-राष्ट्रीय विश्वविद्यालय” या लेखात संघाचे महत्वाचे कर्तृत्व अतिशय कमी शब्दात पण प्रभावीपणे दिले आहे- “राष्ट्रीय आणि व्यक्तिगत चारित्र्यनिर्मिती करत राष्ट्राला बलवान करणारे शक्तिकेंद्र अशी सतत वर्धिष्णू राहिलेल्या या संघटनेची ओळख बनली आहे. पण हिंदुत्वाचा सामाजिक आशय दमदारपणे सतत मांडणे आणि त्यातील बंधुत्वाच्या आशयाचे प्रकटीकरण करणारे, समाजावर बंधुत्वाचे संस्कार करणारे कार्येक्रम सातत्याने करीत राहणे हेच संघाचे सर्वात महत्वाचे कर्तृत्व आहे.”

याच प्रमाणे संघ मागील शतकभर समाजात बंधुत्व वर्धमान करण्यासाठी आणि वृथा भेदभावांची जळमटे दूर करून समाजाला हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे सांगत संघटित करण्यात अहोरात्र कार्यरत आहे हे डॉक्टरांनी घडवलेल्या अनेक डॉक्टरांमुळेच! “संघ काय करतो ओ?”, अनेकदा आपल्याला आपल्या परिचित लोकांकडून असा प्रश्न येतोच. त्याचं उत्तर साधंसरळ आहे संघ व्यक्तिनिर्माण करतो. व्यक्तिनिर्माण करण्यासाठी संघात कार्यक्रमांची, संघाच्या शाखेची रचना आहे. पुढचा प्रश्न असतोच,”निर्माण झालेला व्यक्ती काय करतो?” त्याचं उत्तरपण आपल्याला अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक एका ओळीत देतात,” संघ कुछ नहीं करेगा, स्वयंसेवक कुछ नहीं छोडेगा.”त्यामुळे, संघाच्या रचनेत चारित्र्य, शरीर आणि मन तयार झालेला व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात जाओ, तो त्याच राष्ट्रीय भावनेने आपलं कर्तव्य करत असतो. या सगळ्या शाखातंत्राचं चिंतनसुद्धा डॉक्टरांनी त्यावेळी करून ठेवले असणार यात संशय नाही. त्यामुळे निर्माण झालेले व्यक्ती देशात लाखभर सेवाकार्य चालवू शकतात, आपदकाळात लवकरात लवकर मदतकार्य सुरू करू शकतात, काश्मीर युध्दापासून तर अगदी रशिया युक्रेन युद्धापर्यंत संघ स्वयंसेवकांनी केलेलं सेवाकार्य हे कुठल्याही हेडक्वार्टर च्या आदेशाने वगैरे सुरू होत नाही. हे सगळं स्वयंप्रेरित असतं हे विशेष! संघाच्या एका पद्यात स्वयंसेवक डॉक्टरांना म्हणतात,”तेजोमय प्रतिबिंब तुम्हारे स्वयंसिद्ध अगणित निकले है, आज तुम्हारी पुजा करने सेतू हिमालय संग मिले है” डॉक्टरांनी आपल्यासारखे अनेक डॉक्टर याचि देही घडविले, त्या सर्वांनी आपली जीवनं आहुतीत समर्पित करून हा संघयज्ञ शतकभर धगधगत ठेवला. आज अगदी शब्दश: सांगायचं तर केवळ सेतू हिमालय नाही तर जगभरात संघ स्वयंसेवक केशवरावांना मनाच्या एका कोपऱ्यात प्रेरणेचा स्रोत मानुन संघकार्यात कार्यरत असतात.

संदर्भ-१. संघमंत्राचे उद्गाते डॉ हेडगेवार- साप्ताहिक विवेक

२. सचित्र हेडगेवार चरित्र- डॉ शुभा साठे.

लेखक : शुभम क्षीरसागर, संभाजीनगर.© विश्व संवाद केंद्र, देवगिरी

Back to top button