EntertainmentOpinion

सौ. – सुप्त शब्दांची अव्यक्त गाथा

प्रयोग संपला. काही क्षण शांततेतच गेले. अजून काही बाकी आहे अशी अपेक्षा घेऊन प्रेक्षक जागेवरच बसून होते. हळू हळू रंगमंचावरील प्रकाश मंदावला, पडदा पडू लागला अन् नाट्यगृहातील दिवे लागले. ओलावलेल्या लोचनांनी, स्पुरलेल्या हृदयांनी तसेच अभिनंदनाची आणि अभिमानाची दाद देणाऱ्या टाळ्यांच्या कडकडाटात सबंध नाट्यगृह दणाणून उठला. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” च्या जयघोषाने त्या सुंदर क्षणावर सोन्याचा साज चढला. अथश्री फोंडा प्रस्तुत “सौ” ह्या नाटकाची जेवढी स्तुती करू तेवढी कमीच!

नाट्य समीक्षण म्हणून खूप काही लिहिता आले असते पण राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत “क्लीन स्वीप” केलेल्या नाटकाचे पुन्हा समीक्षण करावे म्हणजे परीक्षक आणि प्रेक्षकांचा प्रगल्भतेवर प्रश्न उभारल्यागत होईल. प्रकाशयोजना, नेपथ्य, अभिनय आणि अन्य सर्व तांत्रिक बाजूने नाटक सरसच आहे आणि याचा अनुभव प्रयोग बघताना येतोच. पण ह्या नाटकाचा गाभा म्हणजे त्याची संहिता, आणि गोमंतभुमित अश्या अविस्मरणीय नाट्यसंहितेची उत्पत्ती झाली ह्याचा अभिमान प्रत्येक गोमंतकीयाने बाळगला पाहिजे.

स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या अनेक क्रांतिकारकांच्या कथा आपण जाणतो, सावरकर हे त्यापैकीच एक. हिमालयाप्रमाणे उत्तुंग व्यक्तिमत्व आणि तेवढाच प्रगल्भ त्यांचा पुरुषार्थ. पण त्यांच्या बद्दल बोलताना, लिहिताना, विचार करताना त्यांची दुसरी बाजू सहजासहजी स्मरणात येत नाही आणि ती म्हणजे “माई”. अर्धांगिनीच्या समर्पणाच्या आणि त्यागाच्या उल्लेखाशिवाय, सावरकर जाणणे पूर्णत्वास येणे खूपच कठीण आणि ह्या नाट्यसंहितेतून डॉ. स्मिता जांभळे आणि आदित्य जांभळे या आई मुलाच्या जोडीने तात्यारावांची “माई” प्रभावीपणे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सावरकरांनी आपल्या लेखनात माई बद्दल लिहिले आहे खरे पण माईंच्या नजरेतून “माई” कधी कुणाला उमगल्याच नाही, परंतु हे नाटक माईंचा (आणि एकूणच सावरकर कुटुंबीयांचा) आत्मा प्रेक्षकांना समजावून सांगण्यात यशस्वी झाला आहे. खरं पाहिलं तर फक्त सावरकर कुटुंबीय नाही तर स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या समिधासम कुटुंबीयांची अव्यक्त गाथाच आहे.

पहिले प्रेम देश आणि नंतर बाकी सगळे अशी स्पष्ट मनशा असणाऱ्या सावरकर कुटुंबामध्ये सून म्हणून येणे, पोटचा पोर गमावणे, पती बरोबर कुटूंबातील सर्व पुरुष अंदमानच्या काळकोठडीत असताना खडतर आयुष्य जगणे, अश्या असंख्य यमयातना भोगून, स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्याच यातना नव्याने परत सहणारी स्त्री कशी सामान्य असू शकते? मग अश्या देवदुर्लभ “माईंना” जाणण्याची, समजून घेण्याची नितांत आवश्यकता कधीच कुणाला का वाटली नाही? अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर, त्यांच्या कुटुंबियांवर विस्तृत, सडेतोड, सत्य लेखन आजपर्यंत का झाले नाही? कारणं अनेक आहेत, पण त्या मालिकेला खंड पडल्याचा आनंद हे नाटक पाहून येतो.

मुळात हे नाटक असे वाटतच नाही, उलट आपण सिनेमा पाहतो आहे अशी अनुभूती येते. नाटकात पात्रे अभिनय करत आहे असे न वाटता प्रत्यक्ष ती सर्व ऐतिहासिक व्यक्तिमत्वे रंगमंचावर येऊन कुणा दुसऱ्याच्या शरीरातून आपली कथा सांगत आहे असे वाटते. या नाटकातील लेखनाचा, दिग्दर्शनाचा आणि त्यांच्या शैलीचा जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे. “पॉलिटिकल करेक्टनेस” च्या मोहपाशात न अडकता, संदर्भासहित, निर्भिडपणे सत्य लेखनाची सवय आणि सुरुवात, नवीन तसेच प्रस्थापित लेखकांनी केली पाहिजे. नाटकाकडे “फक्त स्पर्धेसाठी” अशी मानसिकता न ठेवता एक व्यापक दृष्टिकोन ठेवून नाटकाद्वारे आपण, आपला विषय आणि एकंदरीत आपली कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे असे ध्येय उराशी बाळगले पाहिजे. महत्त्वाकांक्षी विषय आणि उपक्रम घेऊन काम करण्याची गरज आहे आणि गोमंतभुमित ह्या नाटकाद्वारे या सगळ्याची नांदी झाली असे म्हणता येईल.

ह्या नाटकाची लेखन शैली आणि बांधणी पाहता ह्यावर एक चांगला चित्रपट होऊ शकतो असे मला वाटते. महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग होणार यात शंका नाही पण विविध भाषांमध्ये भाषांतरित होऊन सुध्दा सबंध देशभर या नाटकाचे प्रयोग झाले पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सहाय्याची अपेक्षा सरकारकडून न करता प्रेक्षकांनी स्वतः नाट्यगृह हाऊसफुल करून दिली पाहिजे, जेणेकरून या कृतीतून आवश्यक संदेश जनमानसात पोचवला जाईल. समाजात अश्या प्रकारच्या साहित्याची आणि कलाकृतींची नितांत गरज आहे. तेव्हा भविष्यात अश्या संहिता जेव्हा रंगभूमीवर उतरतील तेव्हा मायबाप प्रेक्षकांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला पाहिजे आणि आपण देणार अशी अपेक्षा आहे.  

सौजन्य : वि.सं.केंद्र, गोवा

Back to top button