Opinion

अवघ्या तेराव्या वर्षी अनेक विक्रम प्रस्थापित करणारी दिव्यांग जलतरणपटू – जिया राय

एलिफंटा वरून पोहताना ती एका कासवासोबत प्रॅक्टिस करत होती. जिया पोहताना त्या कासवासाठी थांबत होती तर ते कासव सुद्धा जिच्यासाठी थांबत होते. जणूकाही दोघेही एकमेकांची भाषा समजत होते. तिला जराही भीती वाटत नव्हती तर तिचे आई वडील मात्र त्या अवाढव्य कासवाला पाहून घाबरले होते.

ज्याच्या खोलीचा थांग लागत नाही, ज्याच्या गूढ निळाईत सतत असंख्य आवर्तनं उठत असतात अशा झंझावाती समुद्राला लांघून जाण्याचे धैर्य बाळगणारी एक १३ वर्षांची दिव्यांग मुलगी श्रीलंकेहून तमिलनाडपर्यंतचे अंतर १३ तासात पोहून येते ही कौतुकास्पद गोष्ट आहे. जिया ऑटिस्टिक आहे. ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर’ असलेल्या मुलांमधले गुण जर त्यांच्या आई बाबांनी वेळीच ओळखले तर ही इतिहास घडवू शकतात. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, हाताशी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी सिक्वेन्स मध्ये मांडणे, ही लक्षणे त्यांच्यात दिसून येतात.


मुलांचा सर्वांगीण विकास होत असताना पालकांचा तसेच समाजाचा फार मोठा प्रभाव मुलांवर पडत असतो. लहान मुले म्हणजे चालता बोलता व्हिडीओ कॅमेरा. मोठ्यांची एक एक गोष्ट ते चटकन टिपून घेतात. घरातल्या माणसांच्या वागण्यातूनच त्यांच्यावर संस्कार होत असतात. जियाच्या बाबतीत समाजाने तिला नाकारले पण तिच्या आईबाबांनी मात्र तिच्या विशेषत्वाचा एक आव्हान म्हणून स्वीकार केला. ऑटिझमचे निदान झाले आणि नातेवाईकांनी राय कुटुंबाला कोणत्याही कार्यक्रमाला आमंत्रण देणे बंद केले. तिच्यासोबत खेळणाऱ्या मुलांच्या पालकांनी आपापल्या मुलांना पार्कात जिया असताना खेळायला पाठवणे बंद केले. जियाची पाण्याकडे असलेली विशेष ओढ पाहून तिच्या वडिलांनी तिला पोहायला शिकवले. घरातील मिळतील त्या वस्तू पाण्यात नेऊन टाकणे आणि त्यातील जेवढ्या तरंगत त्याच वस्तूंशी खेळणारी जिया आता पाण्यात स्वतःचा तोल सावरू लागली. प्रशिक्षकांनी सांगितलेले तिला समजत नसे. मग तिच्या आई बाबांनी शक्कल लढवली. स्विमिंगच्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ त्यांनी तिला घरात मोठ्या स्क्रीनवर दाखवायला सुरुवात केली. ते व्हिडीओ पाहून ती नवीन स्ट्रोक शिकते आणि मग त्याची तालीम जलतरण तलावात करते.
जियाचा हा डिसऑर्डर सौम्य प्रकारात मोडतो. तिला व्यवस्थित बोलता येत नसले तरी तिला आई बाबांनी सांगितलेल्या सर्व सूचना समजतात. जेवणात अन्नाची चव बदलली असेल तरी तिला लगेच जाणवतं. ती चवीच्या बाबतीत आईला सूचनाही करते. चिकनसामोसा तिचा आवडीचा पदार्थ आहे. चिकन बनवताना त्यात तिखटाचे प्रमाण कमी जास्त झालेले तिला रुचत नाही. त्याबरोबरच तिला जेवण बनवायलासुद्धा आवडते. न्युडल्स तसेच इतर चिनी पदार्थ ती आवडीने बनवते. तिला समुद्री प्राणी आवडतात, त्यांच्याशी खेळायला आवडते. एलिफंटाजवळ पोहताना तिच्यापासून १०० मीटरवर डॉल्फिन्स पोहत होते. तिला सर्वच समुद्री मासे तसेच प्राणी आवडतात. अशावेळी जिया खुश होते. एलिफंटा वरून पोहताना ती एका कासवासोबत प्रॅक्टिस करत होती. जिया पोहताना त्या कासवासाठी थांबत होती तर ते कासव सुद्धा जिच्यासाठी थांबत होते. जणूकाही दोघेही एकमेकांची भाषा समजत होते. तिला जराही भीती वाटत नव्हती तर तिचे आई वडील मात्र त्या अवाढव्य कासवाला पाहून घाबरले होते.


जियाचे वडील मदन राय हे नौदलात आहेत. त्यांना आपल्या मुलीचे नाव शाळेत घालायचे होते. परंतु प्रशासनाने तिला पुढल्या वर्षी स्पेशल मुलांच्या शाळेत घालायचा सल्ला देत एका वर्षासाठी शाळेत दाखल करून घेतले. परंतु तिच्या जलतरण तलावातील विजयामुळे मुलांच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. दरवर्षी ती नवी नवी पारितोषिके मिळवू लागली. तिची लोकप्रियता वाढू लागली. हळू हळू तिने जलतरण तलावातून समुद्रात शिरकाव केला. तेव्हा असे लक्षात येऊ लागले की ती लांब पल्ल्याची जलतरणपटू होऊ शकते. तिने अर्नाळा किल्ल्यापासून वसईच्या किल्ल्यापर्यंत असलेला जुना विक्रम मोडून नवीन तयार केला. तसेच एलिफंटा बेटापासून मुंबईपर्यंत पोहून नवा विक्रम प्रस्थापित केला. तसेच सर्वात कठीण अशा मन्नारच्या आखातातूनसुद्धा तिने जलतरण केले आहे. मन्नारच्या आखातातून जलतरणासाठी सुरवात कारण्यापूर्वी समुद्रात वादळी वारे वाहत होते. समुद्राला उधाण आले होते पण अशाही परिस्थितीत आपल्या वेगावर कोणताच परिणाम होऊ न देता तिने मार्गक्रमण केले. यावेळी तिच्या डोळ्यांखाली जखमा झाल्या, रक्त येऊ लागले, पायाची कातडी पाण्याने बधिर झाली परंतु तिच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तिची आई म्हणते, तिच्याकडे किती स्टॅमिना आहे याचा थांग लागत नाही. ती फार थकली असेल तरीही तिला सांगितले अजून ५ किलोमीटर पोहायचे आहे अशावेळी ती तेवढे अंतर सहज पूर्ण करते. गेल्या महिन्यात श्रीलंका आणि भारताचे संबंध चांगले ठेवण्याच्या उद्देशाने आणि एक नवीन विक्रम करण्यासाठी श्रीलंकेतून तामिळ नाडूपर्यंतचे अंतर जियाने अवघ्या तेरा तासात पूर्ण केले.

तिला या १३ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते स्त्रीसन्मान पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळालेल्या ९ व्यक्तींपैकी तीच एकटी लहान मुलगी होती. तिला एक राष्ट्रीय पातळीवर बाल पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याच बरोबर उत्तर प्रदेशचाही पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातसुद्धा जियाचे कौतुक केले आहे. तिचे यश वाखाणण्याजोगे आहेच. ती यापुढेही अनेक विक्रम करत राहील अशा अनेक सदिच्छा साप्ताहिक विवेकच्या परिवाराकडून आहेत.

  • मृगा वर्तक

सौजन्य : सा. विवेक  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button